दुष्काळी भागाची मागणी
जत,(प्रतिनिधी)-
सध्या सांगली जिल्ह्याला महापुराचा धोका पोहचला असून शहरातील मारुती चौक आणि भाजी मंडई परिसरात कृष्णेच्या पुराचे पाणी पोहचले आहे. कोयनेतून पाण्याचा विसर्ग वाढला आहे. आलमअट्टी धरणाचे पाणी मागे येत आहे. त्यामुळे सांगली परिसराला महापुराचा आणखी धोका वाढला आहे,त्यामुळे हेच पुराचे पाणी सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागाला सोडण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
लोकसभा निवडणूक काळात राजकीय स्टंटबाजी करत जिल्ह्यातल्या जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, मिरज पूर्व भागाला कृष्णेचे म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले होते. याचा या दुष्काळी भागातील लोकांना लाभ झाला असला तरी ते पूर्ण क्षमतेने सोडण्यात आले नव्हते. निवडणूक झाल्यावर हे पाणी लगेच बंद करण्यात आले. त्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या ,शेतीच्या पाण्यासाठी अनंत समस्यांना तोंड द्यायला लागले. ऐन पावसाळ्यात सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी तालुक्यातल्या गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागला. सध्या अजूनही पावसाळ्यात 70 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी पाण्याचे टँकर सुरू आहेत. जनावरांसाठी अजूनही चारा छावण्या सुरू आहेत.
सगळीकडे दमदार पाऊस झाला असला तरी जिल्ह्यातल्या दुष्काळी भागात मोठा पाऊस झालाच नाही. त्यामुळे शंभर टक्के पेरण्या झाल्या नाहीत. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी त्या पावसाअभावी धोक्यात आल्या आहेत. पाऊस सगळीकडे तुफान होत असला तरी दुष्काळी भागात त्याची कृपा दिसत नाही. त्यामुळे महापुराचे पाणी वाया जात आहे. लोकांचे त्यामुळे नुकसान होत आहे. हेच पाणी म्हैसाळ, ताकारी योजनेच्या माध्यमातून दुष्काळी भागाला सोडल्यास कोरडे पडलेले तलाव पाण्याने भरून घेता येतील. किमान पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. त्यामुळे पुराचे वाया जाणारे पाणी दुष्काळी भागाला सोडण्यात यावे,अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment