जत,(प्रतिनिधी)-
सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक कारणांमुळे
निराधार म्हणून जगण्याची नामुष्की आलेले वृद्ध
तसेच विधवांच्या मानधनात भरीव वाढ करण्याची मागणी केल्या अनेक वर्षांपासून होत होती. वाढ करण्याचे आश्वासनही देण्यात आले नव्हते, मात्र आता शासनाने ही वाढ मनावर घेतली असून शासनाने मुक्तांचा तसा निर्णय जाहीर केला आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थीच्या मानधनात ६०० रु.वरून एक हजार रुपये इतकी वाढ करण्यात आली. तर एक अपत्य असणाऱ्या विधवांना ११०० रु., तर दोन अपत्ये असणाऱ्या विधवांना १२०० रु. दरमहा मानधन दिले जाणार आहे. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रतिवर्षी एक हजार ६४८ कोटींच्या वाढीव खर्चासही मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे.
इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थीचा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेत समावेश होतो. केंद्राकडून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेतंर्गत ६५ ते ७९ वर्षे वयोगटासाठी २०० रु. आणि ८० वर्षे व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्यांसाठी ५००रु.मानधन दिले जाते. याच लाभाथींना राज्य पुरस्कृत श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतून अनुक्रमे ४०० रु. आणि १०० रु. अर्थसहाय्य देण्यात येत होते. आजच्या निर्णयानुसार राज्य सरकारच्या अनुदानात प्रत्येकी ४०० रु. ची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थांना दरमहा एक हजार रु. निवृत्तीवेतन मिळणार आहे. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थीचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेत समावेश होतो. केंद्राकडून या लाभाथींना दरमहा ३०० रु. अर्थसहाय्य देण्यात येते. यापैकी अपत्य नसलेल्या विधवांना संजय गांधी निराधार अनुदान योजनेतून देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यात ४००रु., एक अपत्य असलेल्या विधवांना ५०० रु., तर दोन अपत्ये असलेल्यांना
६०० रु.ची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला
आहे. त्यामुळे आता या योजनेतून निराधार विधवा
लाभार्थीना दरमहा एक हजार रु., एक अपत्य
असणाऱ्या विधवांना ११०० रुपये आणि दोन अपत्ये
असणाऱ्यांना १२०० रुपये अनुदान मिळणार आहे.
संजय गांधी निराधार अनुदान योजना व अन्य विशेष सहाय्याच्या योजनांच्या अनुदानात वाढ करण्याच्या निर्णयाचा ३२ लाख लोकांना लाभ मिळणार आहे.
No comments:
Post a Comment