Sunday, August 4, 2019

आतातरी 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'चे महत्त्व समजा

जत,(प्रतिनिधी)-
जत शहरातील पाणीटंचाईवर सर्वत्र चिंता आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक व्यासपीठावरून भविष्याच्या पाणी नियोजनासंदर्भात जबाबदारी निश्‍चित केली जात आहे. मात्र, भूगर्भातील पाणी पातळीची वाढ करणार्‍या रेन वॉटर हार्वेस्टिंगवर चर्चा थंड आहे. नगरपालिकेनेही यासंदर्भातील गंभीरतेने विचार केला असता तर शहराच्या वाट्याला दुष्काळाचे बघावे लागले नसते. त्यामुळे आतातरी ही रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्त्व समजून पुढील पावसाळय़ाच्यापूर्वी शहरातील प्रत्येक घरी ही यंत्रणा कशी बसवता येईल, यावर कार्य करणे महत्त्वाचे आहे. तसे झाल्यास या शहराला कधीही पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही, अशी अपेक्षा केली जात आहे.

शहराला भविष्यात दुष्काळाच्या झळा जाणवू नये यासाठी पावसाच्या पाण्याचे पुनर्भरण (रेन वॉटर हार्वेस्टिंग) प्रत्येक इमारतधारकाला करणे बंधनकारक आहे. तरीही आजवर पालिकेने याकडे दुर्लक्ष केले. रेन वॉटर हार्वेस्टिंगसंदर्भात कायद्यातही तरतूद आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था केल्याशिवाय इमारधारकांना बांधकाम पूर्णत्त्वाचे प्रमाणपत्र देता येत नाही. तसे केल्यास दंड आकारण्याचीही तरतूद आहे. मात्र, पालिकेतील अधिकार्‍यांनी याकडे दुर्लक्ष केले.
शहरात इमारती तयार झाल्या परंतु, रेन वॉटर हार्वेस्टिंगची कामे झाली नाही. नगरपालिकेला देखील ही कामे होत आहे की नाही याची पाहाणी करण्याची आवश्यकता वाटली नाही. शहराला दुष्काळाचे चटके बसल्यानंतरही आता नगरपालिका रेन वॉटर हार्वेस्टिंग जलमय भूगर्भासाठी आवश्यक असल्याचे मानायला तयार नाही. सध्या शहराला आठवड्यातून एकच दिवस पाणी पुरवठा होत आहे. नगर पालिका अर्थसंकल्पात रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी भरीव आर्थिक तरतूद करण्याची गरज  आहे.
शहराला कमी दाबाने  होणारा आणि आठवड्यातून एकदा होणारा पाणी पुरवठा भविष्यात फारच गंभीर स्वरूप घेण्याची शक्यता आहे. नागरपालिकेने भविष्याचा विचार करून हार्वेस्टिंग बाबत वेळीच गंभीर व्हायला हवे. नुसतेच गंभीर होऊन काम होणार नाही तर जमिनीस्तरावर ही यंत्रणा घरोघरी लावण्याचे आव्हान नगर पालिकेपुढे आहे. याकडे पालिकेने लक्ष देण्याची गरज आहे.

काय आहे रेन वॉटर हार्वेस्टिंग?
छतावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी हे विहिरीत गोळा करून भूगर्भाची पाण्याची पातळी वाढविता येते. बहुतेक घरांमध्ये लावण्यात आलेल्या पाईपमधूनच हा प्रकल्प साकारता येणे शक्य आहे. रेन वॉटर हार्वेस्टिंग करणार्‍या नागरिकास हजार रुपये किमतीच्या आत उपलब्ध असणारे फिल्टर दिले जायाला हवे. म्हणजे नागरिकांना त्याचे आर्थिक ओझे वाटणार नाही. पाईपमधून निघणारे अशुद्ध पाणी या फिल्टर जोडणीनंतर शुद्ध हेऊन विहिरीत सोडता येते. विहिरीचे पाणी पिण्यासाठी वापरत असेल तर ही यंत्रणा बसविली जाते.

No comments:

Post a Comment