Tuesday, August 13, 2019

अंगणवाडी सेविका वाढीव मानधनाच्या प्रतीक्षेत

जत,(प्रतिनिधी)-
 देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २0१८ मध्ये अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दीड हजार वाढ जाहीर केली आहे.  पण अद्याप ही वाढ महाराष्ट्रातील सेविकांच्या खात्यावर झालेली नाही.  मानधन वाढीसाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली आहेत,मात्र अजूनही शासनाला पाझर फुटत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. साहजिकच मानधन वाढीसाठी अंगणवाडी सेविकांना प्रतिक्षाच करावी लागत आहे.

तीस वर्षांपूर्वीपासून अंगणवाडी सेविका महाराष्ट्रात  काम करीत आहेत. वाढीव मानधन व वेतनासाठी सातत्याने आंदोलनं करीत लढा देताहेत पण समाधानकारक मानधन वा वेतन त्यांना देण्यात येत नाही अशी त्यांची ओरड आहे. संघटना मंत्रालयापर्यंत जातात, कधीकाळी बैठकही ठरल्या आश्‍वासनं मिळाली. पण वाढ काही होताना दिसत नाही. अलिकडे मानधन वाढविण्यासंबंधीच्या बैठकीला मुख्यमंत्री हजर तर संबंधित मंत्री पंकजा  मुंडे या हजर झाल्या नव्हत्या. त्यामुळे चर्चा फिसकटली.
या महिन्यातच वृत्तपत्रांमधून पंकजा मुंडेनी वक्तव्यातून म्हटले होते की याच अधिवेशनात अंगणवाडी सेविकांना पंतप्रधानांनी केलेली वाढ व त्यांच्या निवृत्तीनंतर सेविकांना जीवन जगता यावे म्हणून सेवानिवृत्ती व त्याचा लाभ मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, वाढीव मानधन लवकरच त्यांना मिळावे म्हणून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी वृत्तपत्रामार्फत सांगितले होते. पुढे त्याची काहीच हालचाल नाही.
    अलिकडेच कोतवालांना रुपये पंधरा हजार वेतन व सेवानिवृत्तीवेतन देण्याचा महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे. अशाच प्रकारचा निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत होणे अत्यंत गरजेचं आहे.  पुर्वीपासून अल्प मानधनात राष्ट्रीय उपक्रमाला, योजनेला यशस्वी करीत मुलांचे कुपोषण थांबविण्याचे व मुलांवरती संस्कार तसेच मुलांच्या स्वास्थ्याविषयी, किशोरवयीन मुलींच्या जबाबदारीचे कार्य आणि गरोदर माता, स्तनदा माता यांना द्यावयाच्या सेवा त्या पार पाडताहेत. अंगणवाडीच्या मुलामुलींना खांद्यावर घेऊन त्याला आपल्या हाताने घास भरवतात. त्यांचं मनोरंजन करतात. शिकवितातही.
सकाळी ९.३0 वाजता अंगवणवाडी उघडायची आहे. लगेच अंगणवाडी सेविकेनी अंगणवाडी उघडल्याचे स्मार्टफोन क्लीक करायचे आहे. अकरा वाजून तीन मिनिटांनी मुलांच्या नाश्त्याच्या वेळी सेविकेनी अँपवर क्लीक करणे नंतर मुलांना भाषा विकास, कलाकौशल्ये, मुक्त चर्चांतर्गत सेविकांनी शिकवायचे असते. दुपारी एक तीसला मुलांना जेवन द्यायचे असते, त्यावेळी अँपकॉन केअर दक्ष कॅडेलवर पोषण भरणावर क्लीक करण्याचं काम त्या करतात, दोन वाजता दिवस भराचे काम सर्वर डाटाला पाठवितात. दोन तीन वाजेपर्यंत रेकॉर्डचे काम करतात. पुढे तीन ते चारपर्यंत गृहभेटी देऊन दोन वर्षाखालील बालक, गर्भवती स्तनदा मातांना मार्गादर्शन करून माहिती सरवरला पाठविणे अशा प्रकारची महत्त्वाची जबाबदारी अंगणवाडी सेविका पार पाडताहेत.
अंगणवाडी सेविका समान काम समान वेतन किमान वेतन मिळण्यापासून त्या वर्षानुवर्षापासून वंचितच आहेत. त्यांच्या जबाबदार्‍या त्याचे कामाचे तास लक्षात घेऊन त्यांना कमीतकमी वेतनश्रेणीचे वेतन देण्याची शासनाकडून गरज आहे. राज्य सरकार कर्मचार्‍याप्रमाणे, सेविकाही केंद्र व राज्यसरकारने निवडलेल्या कर्मचारी आहेत, तेव्हा जिल्हा परिषद, पंचायत समिती शासकीय अनुदान प्राप्त मंडळ व संस्थांतील कर्मचार्‍यांत व सेविकांमध्ये सरकारने भेदभाव टाळून न्याय वेतन इतर भत्ते, सवलत सेवानवृत्तीचे लाभ आणि मासिक सेवानवृत्ती वेतन देण्याचा शासन निर्णय घेण्याची गरज आहे, अशी मागणी होत आहे.

No comments:

Post a Comment