Sunday, August 4, 2019

मुलांनी खेळायचे कुठे?

 खेळासाठी मैदाने आरक्षित करण्याची गरज;,शासनाचा पुढाकार हवा
जत,(प्रतिनिधी)-
खेळ हा शालेय जीवनातील अविभाज्य अंग आहे. खेळाने विद्यार्थ्यांच्या बुद्धीवर व आरोग्यावरही मोठा परिणाम होतो. म्हणून तो प्रत्येक विद्यार्थ्यांनी खेळणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने पालकांनी आणि शाळांनीही काळजी घ्यायला हवी. पण आता शहरात तर सोडाच ग्रामीण भागात सुद्धा खेळायला मैदाने नाहीत, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे खेळासाठी मैदाने आरक्षित करण्याची आवश्यकता आहे.

खरे तर नर्सरीमध्ये मुलांना फक्त खेळच शिकवायला हवेत. अभ्यास नकोच. मोठय़ा मुलांसाठी खेळणे म्हणजे अधिकची ऊर्जा मिळविण्याचे चांगले माध्यम आहे. आधी खेळाचे भरपूर मैदाने असायचे. आता मात्र खेळांच्या मैदानावरही अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ज्यामुळे मध्यंतरी मैदानांसाठी आरक्षित भूखंडांमध्ये वापराबाबतच्या परिस्थितीत अन्य कोणत्याही कारणासाठी बदल केला जाऊ नये, असा आदेश  न्यायालयाने दिला आहे. शहरात मैदानेच शिल्लक राहिली नाही तर मुलांनी खेळायचे कुठे? मुले खेळली नाहीत तर त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतील. मुलांची शारीरिक क्षमता विकसित आणि बळकट होणार नाहीत. मुले करमणुकीसाठी संगणक-मोबाईल अशा उपकरणांकडे आकर्षित होत आहेत. ते प्रमाण वाढेल, असे मतही न्यायालयाने नोंदविले.
 मैदानांची अनुपलब्धता व आहेत त्या मैदानांवरील अन्य वापरासाठी अतिक्रमणे हा विषय फक्त एका शहरापूरता मर्यादित नाही. याशिवाय सरकारी अतिक्रमणेसुद्धा मैदाने व्यापत आहेत.
या मुद्याचा राज्याच्या पातळीवर विचार व्हायला हवा. मुलांचे आरोग्य व शारीरिक विकास हा विषय अभ्यासाइतकाच, किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचा आहे. शासन, पालक आणि शाळांचाही खेळाकडे बघण्याचा दृष्टिकोन अद्याप पुरेसा अनुकूल नाही. याला काही उदाहरणे अपवाद असतील, पण त्यांची संख्या बोटांवर मोजण्याइतकीसुद्धा नसेल. शहरे व ग्रामीण भागात शाळा वाढत आहेत, पण त्या तुलनेत मुलांना खेळण्यासाठी मैदान मात्र नाहीत. मैदानांची गरज संबंधित कुणीही लक्षात घेत नाही.
भूखंडांचे वाढते भाव त्यावरील आक्रमणे वाढवत आहेत. बालवाडी, नर्सरी, माँटेसरी आदी विविध नावांनी दीड-दोन वर्षांच्या चिमुकल्यांसाठीसुद्धा गल्लोगल्ली जेमतेम दोन खोल्यांच्या जागेत शाळा वाढत आहेत. त्याला बालवाडी म्हणावे की बालकांचे कोंडवाडे म्हणावे? केवळ पुस्तकी ज्ञान शिकविले व चिमुकल्यांच्या डोक्यात भरपूर ज्ञान कोंबल्याचे समाधान शाळाचालक व पालक मिळवत असतील, तथापि शारीरिक वाढीला पोषक वातावरणाअभावी बालकाच्या डोक्यात कोंबलेले सारे ज्ञान किती अर्थपूर्ण ठरेल? अलीकडच्या काळात विविध खेळांत भारतीय खेळाडू चांगली चमक दाखवत आहेत, पण ही चमक या पिढीपर्यंत निस्तेज होत जाणार का? अशी शंका पुरेशा मैदानांअभावी वाटू लागली तर नवल नव्हे. आज ज्या पद्धतीने लाइफस्टाइल विकसित झालीय, ती बघता वरील बाबींची किती तीव्र गरज आहे, हे लक्षात येईल.

No comments:

Post a Comment