निसर्गचक्र आणि परंपरा या दोन्ही दृष्टीने श्रावणाला महत्त्व आहे. श्रावण महिना म्हणजे 'सणांचा राजा' असे म्हटले जाते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा-रक्षाबंधन आणि गोपाळकाला या सणांपासून सार्याच उत्सवाची रेलचेल सुरू होते. याच महिन्यात आपल्या शेतीप्रधान भारत देशातील लोकांची शेतीची कामेही संपलेली असतात. त्यामुळे महिलांना कामातून थोडासा विसावाही मिळतो. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात या महिन्यात मंगळागौर खेळली जाते. 'एका फुलाच्या चार पाकळ्या, पुजिते मंगळा गौर, दिसाया जरी सार्या निराळ्य़ा एकाच रंगाचा सूर, पुजिता मंगळा गौर' ही मंगळागौर देवीच्या आरतीपासून मंगळागौरीच्या पूजेस सुरुवात केली जाते. पूर्वी आपल्याकडे लहान वयातच लग्न केली जात होती. शेतातील कामे संपल्यानंतर नागपंचमीनिमित्त भाऊ सासुरवाशिणीला माहेरी न्यावयास येई. त्यानंतर एकामागून एक येणार्या सणांमुळे त्या मुलीला १५ ते २0 दिवस माहेरी राहण्याची मुभाही मिळत असे. त्यावेळी हा मंगळागौर खेळ खेळला जात असे. तीच प्रथा आजही सुरू आहे. मात्र, हल्ली आपल्या मुली कामाला जाणार्या असतात. त्यांच्याकडे पाच वर्षे मंगळागौर खेळण्याएवढा वेळ आणि कामातून सुटीही मिळत नाही. त्यामुळे पहिल्याच वेळेस मंगळागौरीचे उद्यापनही केले जाते. मात्र, ते अतिशय उत्साहाने आणि दोन्ही घरच्या मंडळींसोबत केले जाते.
मंगळागौरीची पूजा ही अन्नपूर्णा देवीची पूजा म्हणूनच केली जाते. माहेरहून सासरी येताना जी अन्नपूर्णा देवी दिली जाते, त्या देवीची ही पूजा केली जाते. या देवीला अक्षतांवर बसविले जाते. तिला केळीचे खांब किंवा कर्दळीचे खांब लावले जातात. पिठाचे कानातले, गळ्य़ातले असे अलंकार केले जातात. ते सौभाग्य लेणे म्हणून देवीला चढविले जातात. पाच पक्वान्नांचा नैवेद्य दाखविला जातो व त्यापुढे मंगळागौरची आरती म्हणून खेळ सुरू केला जातो. एरवी मुलींना आपल्या माहेरच्या माणसांचे खूप कौतुक असते. त्याचेच गोडवे या मंगळागौरमध्येही गायले जातात.
महिलांसाठी तर श्रावण महिना खासच. विशेषत: नवविवाहितांच्या चेहर्यावर आनंद ओसंडून वाहत असतो. महिन्याभराच्या या आनंदोत्सवाची सुरुवात होते शिवामूठच्या व्रताने. दर सोमवारी तांदूळ, तीळ, मूग, जव आणि सातू अशा क्रमाने शंकराच्या पिंडीवर मुठीने धान्य वाहतात. नवविवाहित महिलांनी पाच वर्षांपर्यंत हे व्रत करण्याची परंपरा आहे. अशाच प्रकारे परंपरेने केल्या जाणार्या फासकी व्रतात पसाभर तांदूळ शंकराची पिंड आणि नंदीला वाहतात. सोमवारसारखाच मंगळवारही महिलांसाठी विशेष. नववधूसाठी तर खासच. संसारातील सौख्य-प्रेम कायम राहावं, या भावनेनं या दिवशी मंगळागौरीचं व्रत करतात. शुक्ल पक्षातील पंचमीला नागपंचमीचा सण येतो. नाग बिळातील उंदरांना नष्ट करणारा असल्याने तो शेतकर्यांचा मित्र असतो. म्हणून त्याची पूजा करतात. त्याला इजा होऊ नये म्हणून यादिवशी जमीन खणत नाही किंवा नांगर चालविला जात नाही. वारुळाला जाऊन नागाचे दर्शन घेण्याची प्रथा आहे. महिला या दिवसाला 'झोकापंचमी' म्हणूनही संबोधतात.
श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो. पिकाची राखण सुरू होते. गावातील मंदिरात सुरू झालेले श्रीगणेशाच्या आरतीचे स्वर शेताच्या बांधापर्यंत पोहोचतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतीक्षा सुरू होते. माहेरवाशीण मंगळागौर आटोपून सासरी परतते आणि गौरी गणपतीच्या तयारीला लागते. नव्या उत्सवाचे नवे रंग..आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे. आनंद देणं आणि घेणं हे तिचं मूळ आहे. वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात. ते माणसांना एक सूत्रात बांधतात. विविध रंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.
-मछिंद्र ऐनापुरे
श्रावण संपताना कणसात दाणा भरू लागतो. पिकाची राखण सुरू होते. गावातील मंदिरात सुरू झालेले श्रीगणेशाच्या आरतीचे स्वर शेताच्या बांधापर्यंत पोहोचतात आणि आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची प्रतीक्षा सुरू होते. माहेरवाशीण मंगळागौर आटोपून सासरी परतते आणि गौरी गणपतीच्या तयारीला लागते. नव्या उत्सवाचे नवे रंग..आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य हेच आहे. आनंद देणं आणि घेणं हे तिचं मूळ आहे. वेगवेगळे सण आणि उत्सव याचसाठी असतात. ते माणसांना एक सूत्रात बांधतात. विविध रंगाने नटलेला श्रावणही हाच संदेश देत आपला निरोप घेतो.
-मछिंद्र ऐनापुरे
No comments:
Post a Comment