Tuesday, August 27, 2019

राजे रामराव महाविद्यालयाने पूरग्रस्त ढवळी गावाला मदत

जत (प्रतिनिधी )-
वर्षानुवर्षे पडणारा भीषण दुष्काळ आणि या भागात राहणाऱ्या व मुलभूत सुविधेपासुनही कोसो दुर असणार्‍या जत तालुक्यातील जनता असे विदारक चित्र असताना याच तालुक्यातील एका वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र येऊन पूरग्रस्त  ढवळी या मिरज तालुक्यातील गावात जाऊन एकदिवसीय स्वच्छता अभियान राबविले व जीवनोपयोगी साहित्याचे वाटप आणि आर्थिक मदत करुन सामाजिक भान जपले. 

राजे रामराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनेच्या स्वंयसेवकांनी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्य व प्राध्यापकांनी ढवळी( ता.  मिरज ) येथे एकदिवसीय श्रमदान शिबीर आयोजित करून पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला. पूरग्रस्त ढवळी गावामध्ये महाविद्यालयाचे शंभर स्वयंसेवक आणि दहा प्राध्यापकांनी गावाची स्वच्छता केली. आर्थिक, साहित्यरुपी मदत केली व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात केले.  महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सुमारे 25,000 रू इतकी मदत गोळा करून यातुन ढवळी गावातील 130 पेक्षा जास्त बाधित कुटुंबाला जीवनोपयोगी साहित्य व चटई भेट दिल्या.  याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे म्हणाले, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागात गावांची अपरिमित हानी झाली असून यासाठी एक सामाजिक संवेदनशीलता जोपासण्याच्या भूमिकेतून जतसारख्या दुष्काळी भागातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी जमा केलेली आर्थिक मदत ढवळी गावास देऊन माणुसकीची भावना जपण्याचा प्रयत्न महाविद्यालयाने केला आहे. ज्याप्रमाणे महात्मा गांधी म्हणायचे,  "अश्रूभर्या प्रत्येक डोळ्यातील प्रत्येक अश्रु पुसण्याचे मी माझे काम मानतो." त्याचप्रमाणे महाविद्यालयाचे विद्यार्थी व प्राध्यापकांनी आपला खारीचा वाटा उचलुन, जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करुन गावची स्वच्छता केली.  हे स्वच्छता शिबीर आयोजित करण्यात मिरज पंचायत समितीचे कक्ष अधिकारी संजय शिंदे व  कृषी अधिकारी अण्णासाहेब बरावकर-यांचे बहुमोल मार्गदर्शन व सहकार्य मिळाले. या कामासाठी ते स्वतः आपल्या सहकार्‍यांसोबत उपस्थित होते.  त्यावेळी बोलताना ते म्हणाले, राजे रामराव महाविद्यालयाने पूरग्रस्त ढवळी गावास आर्थिक मदत करुन एक प्रकारचा स्तुत्य उपक्रम केला आहे.  भविष्यात येणार्‍या नैसर्गिक संकटांना महाविद्यालय पुढेही मदत करील अशी मला खात्री आहे.
यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा. डॉ. बी एम डहाळके, प्रा. आर डी करांडे,  प्रा. डॉ. व्ही एस जाधव, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख प्रा. पी ए सावंत तसेच प्रा. सी वाय मानेपाटील, प्रा. एच डी टोंगारे, प्रा. गोविंद साळुंखे, प्रा. पी जे चौधरी, प्रा. तुकाराम सन्नके, प्रा. निशाराणी देसाई,  आदिक घुगरे व विद्यार्थी विद्यार्थीनी उपस्थित होते.
फोटो ओळ (ढवळी ता. मिरज येथील पूरग्रस्त ग्रामस्थांना संसारोपयोगी साहित्य, आर्थिक मदत आणि स्वच्छता अभियान जतच्या महाविद्यालयाने राबवले.)

No comments:

Post a Comment