Thursday, August 1, 2019

मातंग समाजासाठी एक लाख घरे

अण्णाभाऊ साठे यांच्यावरील
टपाल तिकिटाचे प्रकाशन
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

बांद्रा येथील रंगशारदा सभागृह येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सामाजिक न्याय राज्यमंत्री अविनाश महातेकर, अण्णा भाऊ साठे स्मारक समितीचे उपाध्यक्ष मधुकर कांबळे, आ. सुधाकर भालेराव, भाई गिरकर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, पोस्ट मास्तर जनरल मुंबई क्षेत्राच्या स्वाती पांडे आदी मान्यवर उपस्थित होते. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या संकेतस्थळाचे उद््घाटन तसेच टपाल तिकीटाचे अनावरण, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेश वितरण कार्यक्रम, जन्मशताब्दी बोधचिन्हाचे अनावरण याप्रसंगी करण्यात आले. अण्णा भाऊ साठे यांनी ४९ वर्षांच्या खडतर आयुष्यात वंचित शोषितांच्या व्यथांना आपल्या साहित्यातून आवाज दिला, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले. अण्णा भाऊंची साहित्य निर्मिती जगासाठी आकर्षण बिंदू होती. त्यांचे साहित्य २७ भाषांमध्ये भाषांतरीत होण्याचा विक्रम आहे. यातच त्यांच्या साहित्याचे वैशिष्ट्ये दिसून येते. अण्णा भाऊंच्या या जन्मशताब्दी वर्षात त्यांचे विचार, साहित्य शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. मातंग समाजाच्या उत्थान आणि विकासासाठी शासन पूर्ण ताकदीनिशी योगदान देईल. मातंग समाजाला एक लाख घरे देण्यात येतील. चिरागनगर येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकाचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. पुणे येथे लहूजी साळवे यांच्या स्मारकासाठी पाच एकर जमीन आरक्षित करण्यात आली आहे. या स्मारकासाठीही आवश्यक तो निधी दिला आहे. अण्णा भाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट तयार करण्यात येईल. यासाठीही आवश्यक तो निधी देण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment