जत,(प्रतिनिधी)-
सांगलीला 2005 च्या महापुरापेक्षा मोठा तडाखा बसला आहे. या पुरामुळे सांगलीची अक्षरशः वाट लागली आहे. खूप मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. अनेकांचा उद्योग,व्यवसाय, रोजगार बुडाला आहे. अनेकांची घरं उदवस्त झाली आहे. धोके निर्माण झाले आहेत. सांगलीकरांना सावरायला वेळ लागणार आहे. सांगलीकरांना राज्य भरातून मदतीचा ओघ सुरू आहे, ही दिलासा देणारी बाब असली तरी महापुरात वैयक्तिक नुकसान झालेल्या पूरग्रस्त लोकांसाठी मोहीम उघडण्याची गरज आहे.
सांगली शहरासह पलूस, शिराळा, इस्लामपूर या तालुक्याचा पुराचा मोठा फटका बसला आहे. हा पूर दुःखाचा स्मरण कायम ठेवणारा आहे. विविध क्षेत्रात मोठे नुकसान झाले. सगळे मिळून एक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नदीच्या पुरामुळे 66 हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. यात ऊसाला मोठा दणका बसला आहे. 35 हेक्टर उसाचे क्षेत्र बाधित झाले आहे. यात वाळवा, पलूस, शिराळा आणि मिरज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचा समावेश आहे. शेतीबरोबरच पशुधनालाही मोठा दणका बसला आहे. राज्यात महापुराच्या तडाख्यात आठ हजार जनावरे बेपत्ता झाली आहेत. यात सांगली जिल्ह्यातील 4 हजार 250 जनावरांचा समावेश आहे. त्याखालोखाल कोल्हापुराचा (3 हजार 500) समावेश आहे.
सांगलीची हळद प्रसिद्ध आहे. पण ही हळद साठवून ठेवणारी सांगली जवळील हरिपूर येथील पेवे या पुरामुळे उदवस्त झाली आहेत. 60-70 वर्षात सांगलीचा हळदीची पेठ म्हणून देशात लौकिक झाला. यात हरिपूरचे योगदान मोठे आहे. या गावात चार हजार हळद साठवण्याची पेवे आहेत. एका पेवात 20 ते अडीचशे हळदीची पेवे साठवली जातात. आता या पुराणे ही पेवे इतिहास जमा होण्यास मदत झाली आहे.
जिल्ह्यात महावितरणला सुमारे 47 कोटींचा आर्थिक फटका बसला आहे. हा प्राथमिक अंदाज आहे. हा आकडा वाढू शकतो. शहरातल्या व्यावसायिकांना, उद्योगांनाही मोठा दणका बसला आहे,यातून अनेकजण सावरू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. एका हॉटेल चालकाने आत्महत्या केली आहे.
सांगली शहरातील आणि वाळवा, पलूस परिसरातील लोकांच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले आहे. टीव्ही,फ्रीज, अनेकांना फेकून देण्याशिवाय पर्याय राहिला नाही. दुचाकी, मोटारगाड्या यांनाही मिस्त्री दाखवावा लागणार आहे. वाचन चळवळ चालवणाऱ्या सांगलीतल्या जिल्हा नगर वाचनालयातील तळ मजल्यावर सहा फूट पाणी गेल्याने वाचनालयातील तब्बल साठ हजार पुस्तके भिजली आहेत. 2005 मध्ये या वाचनालयाला काही फटका बसला नव्हता. या ठिकाणी अनेक दुर्मिळ पुस्तके आहेत. या महापुराने मुख्य पोस्ट कार्यालयाचेही नुकसान झाले आहे. जुने रेकॉर्ड भिजले आहे. काहींचे आधार कार्ड भिजले आहेत. महापुराने टपाल सेवा दोन आठवडे बंदच राहिली आहे.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बस आणि रेल्वे यंत्रणा कोमात गेली आहे. पुराच्या काळात म्हणजे 12 दिवस एसटी चे विविध मार्ग बंद होते. या कालावधीत 42 लाखांचा फटका बसला आहे.
No comments:
Post a Comment