Thursday, January 9, 2020

प्रेमभंगातून रोज चार मुलांची आत्महत्या

प्रेमात अपेक्षाभंग होऊन आत्महत्या करण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याबाबतची एक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. कारण १८ पेक्षा कमी वयात प्रेमभंग झाल्याने आत्महत्या केल्याच्या घटनांची संख्या हादरवणारी आहे. २0१८ मध्ये तब्बल १ हजार १३0 तरुणांनी प्रेमातील अडचणींमुळे आत्महत्या केल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून समोर आले आहे.
प्रेमभंगामुळे ४६६ अल्पवयीन मुलांनी आत्महत्या केली आहे. तर याच कारणामुळे आत्महत्या केलेल्या अल्पवयीन मुलींची संख्या तब्बल ६६५ इतकी आहे. प्रेमभंगामुळे आत्महत्या केल्याच्या देशभरात ५३४२ तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत. ज्यातील २0 टक्क्यांहून अधिक जण अल्पवयीन आहेत.

अल्पवयीन मुलांमध्ये प्रेमाबद्दल आकर्षण निर्माण करण्यात सगळ्यात मोठा वाटा चित्रपट आणि टीव्ही मालिकांचा आहे. शाळा आणि कॉलेजमधील मुलांची प्रेमकहाणी हा सिनेमांमध्ये वर्षानुवर्ष दाखवला जाणारा विषय आहे. असे चित्रपटच मुलांमध्ये प्रेमाच्या जगात उथळपणे वावरण्याची भावना निर्माण करतात. कोणत्याच शाळेमध्ये आयुष्य जगण्याची पद्धत आणि जबाबदारी याबद्दल शिकवले जात नाही, असे बालहक्क कार्यकर्ते अच्युत राव यांनी म्हटले आहे. अल्पवयीन मुलांमध्ये प्रेम नव्हे तर केवळ आकर्षण निर्माण होते आणि त्यात भांडणे होताच मुले आत्महत्येचा पर्याय निवडतात, असे राव यांनी म्हटले आहे. ३0 व्या वर्षांनंतर प्रेमात आत्महत्या करणार्‍या व्यक्तींची संख्या कमी होत असल्याचे नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीतून दिसते. २0१८ मध्ये ३0 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या ६५४ लोकांनी प्रेमात आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. ४५ वर्षे वयानंतर तर हा आकडा आणखीनच कमी होत जातो. त्यामुळे कमी वयातील मुलांना आयुष्याबद्दल योग्य मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सांगण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment