दर्पण या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे, इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्च विद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे बाळशास्त्री जांभेकर होत. १९ व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचा मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा १८३२ ते १८४६ या काळात उमटवला.
जेम्स ऑगस्टस हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट'च्या आगमनानंतर तब्बल अध्र्या दशकाने म्हणजेच ५२ वर्षांनी ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानाने 'दर्पण' च्या रुपाने पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले. मुंबईत जांभेकरांनी 'दर्पण'च्या माध्यमातून सुरू केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमीत रुजण्यास सुरुवात झाली.
एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व असलेल्या जांभेकरांना आपण दर्पणकार म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा सर्मथपणे वाहिली. भविष्यकाळातील माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकीय सत्तेला उलथून टाकायचे असेल तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही, हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री हे कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला. मराठी वृत्तपत्रविश्वात नवी पहाट उगवली. दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्यावेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते. दर्पणचा पहिला अंक ६ जानेवारी १८३२ रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे.
No comments:
Post a Comment