Sunday, January 12, 2020

बार्शीच्या संशोधकाला सीताफळाच्या नव्या जातीचे पेटंट


स्थानिक भागातील सीताफळाचे मिळणारे उत्पादन, उत्पन्नापेक्षा अधिक उत्पादन तसेच उत्पन्न देणार्‍या सीताफळाच्या एनएमके -१ गोल्डन सीताफळाच्या या नव्या जातीला केंद्र सरकारने पेटंट जाहीर केले आहे. यामुळे टिकाऊ, निर्यात योग्य सीताफळामुळे शेतकर्‍यांचा फायदा होत असल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. बार्शी तालुक्यातील गोरमाळे येथील शेती संशोधक डॉ. नवनाथ मल्हारी कसपटे यांनी सीताफळाच्या शोधून काढलेल्या या एनएमके-१ गोल्डन या जातीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. सरकारकडून त्याची नोंदणी करण्यात आली आहे.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा २00१ अंतर्गत प्राधिकरणाकडून त्यांना नोंदणीपत्र बहाल करण्यात आले आहे. सीताफळाची अधिकृतपणे नोंदणी करणारे ते देशातील पहिले शेतकरी ठरल्याचा दावा करण्यात आला आहे.
स्थानिक भागातील सीताफळाच्या विविध जातीपेक्षा एनएमके -१ गोल्डन या जातीच्या सीताफळ वाणाची चव, रंग, देखणेपणा अधिक असून टिकाऊपणा आहे. कमी बिया, कमी पाण्यात तग धरणारे, जमिनीच्या विविधतेत आणि विविध वातावरणाचा धोका नसलेले फळझाड म्हणून ही जात ओळखली जात आहे. हजारो शेतकर्‍यांनी मार्गदर्शन घेतल्यानंतर एनएमके -१ गोल्डन जातीच्या सीताफळाची लागवड केली आहे.
दहा वर्षानंतर यश - डॉ. कसपटे
१९८६ पासून सीताफळाची शेती करीत आहोत. सीताफळाच्या सध्या ४२ प्रकारच्या जाती आपल्याकडे आहेत. एनएमके -१ गोल्डन या सीताफळाचे २00१ मध्ये संशोधन केले. त्याला २0११ मध्ये यश आले. त्यावेळी ही जात जाहीर करण्यात आली. पेटंटसाठी केंद्राकडे पत्रव्यवहार केला. मात्र, या जातीची कोणतीच माहिती नसल्याने केंद्राने दोन वर्ष याचा अभ्यास केला. त्यानंतर या जातीची नोंद होऊन त्याला पेंटट मिळाले, अशी माहिती संशोधक डॉ. नवनाथ कसपटे यांनी दिली.

No comments:

Post a Comment