Friday, January 24, 2020

परवीन बाबीच्या आयुष्याची शोकांतिका

परवीन बाबी हे नाव समोर उच्चारले की आपल्यासमोर येतो तिचा ग्लॅमरस अंदाज. बॉलिवूडची दिवा असं तिला म्हटलं जायचं. तिचं 'जवानी जानेमन हे गाणं' असो किंवा 'प्यार करनेवाले प्यार करते हैं शान से' हे गाणं असो किंवा अगदी खुद्दार सिनेमातलं 'मच गया शोर सारी नगरी रे' असो आजही तिची गाणी लोकांच्या लक्षात आहेत. मनावर रुंजी घालत आहेत. मात्र या परवीन बाबीचा मृत्यू झाला ते तीन दिवसांनी समजलं होतं. तिला जाऊन १५ वर्षे झाली आहेत. मात्र तिच्या अनेक चित्रपटांमुळे आणि एकाहून एक सरस गाण्यांमुळे ती आजही सिनेरसिकांच्या स्मरणात आहे आणि यापुढेही राहिल.

परवीन बाबीचा जन्म गुजरातच्या जुनागढमध्ये झाला होता. ती सुरुवातीला मॉडेल होती आणि नंतर अभिनेत्री झाली. १९७२ ते १९७३ या काळात परवीन मॉडेलिंग करत होती. तर १९७३ ते १९८३ हा या काळात परवीन बाबी हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत होती. दिवार, शान, ३६ घंटे, द बनिर्ंग ट्रेन, अमर अकबर अँथनी. क्रांती, खुद्दार, कालिया, नमकहलाल या आणि अशा अनेक सिनेमांमध्ये परवीन बाबीने केलेल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत. 'अमर अकबर अँथनी' सिनेमातली तिने साकारलेली जेनीची भूमिका आणि 'दीवार'मधली अनिता या दोन भूमिका तिच्या सिनेकरिअरमधल्या लक्षवेधी भूमिका ठरल्या. इरादा हा तिचा शेवटचा सिनेमा ठरला.
अमिताभ बच्चनने आपली फसवणूक केली आहे. प्रेमात त्याने दगा दिला आहे असा आरोपही परवीन बाबीने केला होता. मात्र परवीन बाबीने हे सगळे डिप्रेशनमध्ये केल्याची बाब समोर आली होती. एवढंच नाही तर परवीन बाबीने काही अभिनेते माझी हत्या करू इच्छितात, असेही म्हटलं होतं. परवीन बाबी कमालीची नैराश्यग्रस्त झाली होती. या काळात दिग्दर्शक महेश भट यांनी तिला आधार दिला.
अखेरच्या दिवसांमध्ये परवीनला मानसिक आजारांनी ग्रासलं होतं. ती कधी कधी तिच्या घरात हातात सुरी घेऊनही बसायची. तिने हिंदी सिनेसृष्टीत अभिनेत्रींचा वापर आय कँडी म्हणून होतो असाही आरोप केला होता. ती १९८३ मध्ये कॅलिफोर्नियाला गेली होती. तिथून जेव्हा ती परतली तेव्हा ती जाड झाली होती. त्यानंतर तिला मधुमेहानेही ग्रासले होते. अखेरची काही वर्षे ती एकटीच राहात असे. तिच्या पायाला गँगरीनही झाले होते. स्क्रिझोफेनिया हा आजारही परवीन बाबीला जडला होता. विविध अवयव निकामी झाल्याने आणि भुकेमुळे तिचा अंत झाला.
२00६ मध्ये परवीन बाबीच्या आयुष्यावर बेतलेला एक सिनेमाही आला होता. त्याचं नाव होतं 'वो लम्हे'. या सिनेमात कंगना राणावत आणि शायनी आहुजा यांच्या भूमिका होत्या. या सिनेमात कंगनाचं नाव सना अझीम असं असतं. यामध्ये परवीनच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. मात्र हा सिनेमा तिच्याच आयुष्यावर आधारित होता असं म्हटलं जातं. या सिनेमाची कथा महेश भट यांनी लिहिली होती. दिग्दर्शन मोहीत सुरीने केलं होतं.
२0 जानेवारी २00५ ला जुहू येथील राहत्या घरीच परवीन बाबी बिछान्यावर मरून पडली होती. तिचा मृत्यू झाला ही बाब २२ जानेवारी रोजी लक्षात आली. तोपयर्ंत तिच्या घराबाहेर असलेली वर्तमानपत्रं आणि दूधही उचलण्यात आलेलं नव्हतं. तिच्या मृतदेहाचा वास पसरू लागल्याने शेजार्‍यांनी याबाबत पोलिसांना कळवलं. त्यानंतर पोलिसांनी तिच्या घराचा दरवाजा तोडला. आतमध्ये गेल्यावर पोलिसांना परवीन बाबी मृतावस्थेत आढळली. हिंदी सिनेसृष्टीचा एक काळ जिवंत करणारी एक अभिनेत्री अशाप्रकारे गेली हे खरोखरच दुर्दैवी होते. तिने सिनेमांमध्ये केलेल्या भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहेत यात शंका नाही. मात्र तिचा अंत ज्या प्रकारे झाला ती बाब मात्र सगळ्यांनाच अस्वस्थ करुन गेली. जुहू येथील मुस्लिम स्मशानभूमीत तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments:

Post a Comment