जगामध्ये दोन छत्रपती तयार करणार्या राजमाता जिजाऊ यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ ला झाला. जिजाऊंच्या माहेरच्या लोकांचे नाव काय? सासरच्या लोकांचे नाव काय? यापेक्षा महत्त्वाचे आहे राजमाता जिजाऊ यांनी काय कार्य केले. जिजाऊंची ख्याती जगभर कशी पसरली. मुळात जाधव घराने कणखर बाणी व विज्ञानवादी होते. म्हणून जाधव घराण्यात १२ जानेवारीला जिजाऊंचा जन्म झाला आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले. जिजाऊंचा जन्मदिवस हा सन उत्सवाप्रमाणे साजरा करण्यात आला. हत्तीवरून साखर वाटण्यात आली. थोडक्यात जिजाऊंच्या जन्मानेच रयतेसोबतच ही जमीन सुद्धा धन्य झाली.
१२ जानेवारी १५९८ ला मुलगी जन्माला येते आणि हत्ती वरून साखर वाटण्यात येते ही बाब आजच्या सुशिक्षित समजणार्या व जन्माआधी मुलींचे जीवन नष्ट करणार्या नराधमांना चपराक आहे. जिजाऊ लहानपणापासूनच निडर, मुसद्दी, हळव्या व कणखर होत्या. जिजाऊंची मानसिकता एवढी मजबूत होती की सत्य आणि असत्यामधील फरक करून सत्य स्विकारण्याची धमक या राजमातेमध्ये होती. जी धमक आज नामशेष होत चालली आहे. सत्याच्या मार्गाने जाण्याचा व असत्य लबाडांचा नायनाट करायचा हात उद्देश डोळ्यासमोर ठेवून जिजाऊंनी अनेक स्वप्ने बघितली. घोड्यावर बसून वेगवान स्वारी करणे, तलवार चालवणे जिजाऊंचा आवडता छंद होत. अन्यायाचा अंत करण्यासाठी आणि लोकांना न्याय देण्यासाठी जिजाऊ वाटेल ते करायला तयार होत्या. जाती धर्माची बंधने जिजाऊ ने तर जन्मापासूनच तोडले होते. आणि जाती आधारित समाजव्यवस्था नष्ट करून समतावादी व्यवस्था निर्माण करण्याचा चंगच राजमाता जिजाऊंनी बांधला. छत्रपती शिवराय जिजांऊच्या पोटामध्ये असतानाच जन्माला येणारे मूल येथे समतावादी रयतेचे राज्य निर्माण करेल असे संकल्प जिजाऊ करत होत्या थोडक्यात स्वराज्य निर्माण करायचे आणि त्यासाठीच आपला जन्म होतोय याचे धडे जिजाऊंनी शिवरायांना पोटामध्ये असतानाच दिले. शुरता, बहादूरता, प्रामाणिकपणाची रूजवण छत्रपती शिवरायांच्या डोक्यात पोटामध्येच झाली. म्हणून एक आदर्श राजा आपल्याला मिळू शकला. आम्हाला शिवराय मिळाले यामागे जिजाऊंच योगदान आहे हे आम्ही विसरून चालणार नाही. छत्रपती शिवराय फक्त आठ वर्षाचे होते घोड्यावर बसून स्वारी कशी करायची याचे प्रशिक्षण जिजाऊ छत्रपती शिवरायांना देत होत्या. प्रशिक्षणा दरम्यान शिवराय घोड्यावरून खाली पडतात, खाली पडलेले शिवराय मावळ्यांना दिसताच मावळे छत्रपतीच्या दिशेने मदतीसाठी धावायच्या बेतात असतात तोच जिजाऊ त्यांना थांबवते. शिवरायांना मदत करू देत नाही. घोड्यावरून पडलेल्या शिवरायांना मार लागलेला असतो. डोक्यातून रक्त येत असते. आठ वर्षाच्या शिवरायांना काहीच कळत नाही. मावळे माझ्या मदतीला येत असताना आईने अडवले आणि आईने स्वत: देखील काही मदत केली नाही म्हणून शिवराय स्वत:च्या आईला विचारतात. मावळे मदतीला येत असताना तू अडवले आणि तू पण आली नाही. असे का? त्यावर जिजाऊंनी उत्तर दिले जर पडल्यानंतर उठण्यासाठी दुसर्याची मदत लागत असेल तर ती व्यक्ती आपले अस्तित्व निर्माण करू शकत नाही आणि तुम्ही राजे आहात तुम्हाला तुमचे अस्तित्व कायम ठेवायचे आहे. अशा प्रकारे शिवरायांचे मनोबल वाढवून छत्रपतीना मजबूत करण्याचे काम राजमाता जिजाऊंनी केले. लेकराच्या हातात खेळणे देऊन खेळवायच्या वयात याच मातेने हातात तलवार देऊन घोड्यावर बसवून पळवले. म्हणून छत्रपती शिवराय घडले. आजच्या आईने जिजाऊंना वाचणे आवश्यक आहे. आज डोक्यात जिजाऊ नाही म्हणून घरात शिवाजी जन्म घेत नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे छत्रपती शिवरायांनी जन्माला यावे पण शेजारांच्या घरात. याचे कारणही तसेच आहे जिजाऊ आणि शिवराय होणे वाटते तेवढे सोपे नाही, म्हणून आमच्या घरात शिवराय जन्माला घालण्याची आमची लायकी नाही म्हणून शेजार्याकडून अपेक्षा करतो. जिजाऊ बनायचे तर सर्वस्व त्यागून समतेसाठी उभे राहावे लागते. आज प्रत्येक घरात मुलांवर संस्कार घालताना जातीची जाणीव करून दिली जाते म्हणून प्रत्येक घरात जातीचे मूल घडतात. जिजाऊने असे संस्कार घातले. शिवराय जातीचे नाही मातीचे झाले आणि जात नष्ट करण्यासाठी आणि सर्वांना एक समान ओळख असावी म्हणून मावळे नाव तयार झाले. मावळे शब्द जरी उच्चारले तरी जातीव्यवस्थेची उतरंड पडून जाते आणि समतेची व्यवस्था निर्माण होते आणि हे जिजाऊंनी शक्य करून दाखवले.
जिजाऊ प्रचंड विज्ञानवादी होत्या याचा पुरावा म्हणजे अमावास्येच्या रात्री शिव ओलांडून जाऊ नये अशी प्रथा असताना जिजाऊंनी शिवरायांवर असे संस्कार घातले की याच अमावास्येच्या रात्री शिवरायांनी शत्रूचा खात्मा करून समतावादी राज व्यवस्था निर्माण केली. हजारो वर्षे कायम राहील असे जिजाऊंचे कार्य आहे. जिजाऊंचे कार्य एका लेखात, भाषणात सांगणे अशक्य आहे. पुरुषांना लाजवेल असे कार्य करून रयतेचे स्वराज्य निर्माण करणार्या या मातेस जयंतीनिमित्त कोटी कोटी अभिवादन.
No comments:
Post a Comment