जत,(प्रतिनिधी)-
तालुक्यात चारा छावण्या सुरू होऊन अडीच महिने झाले आहेत. मात्र अद्याप बिले मिळालेली नाहीत, यामुळे बहुसंख्य छावणीचालक आर्थिक अडचणीत आले आहेत.
दुष्काळात छावण्या सुरू झाल्याने पशुपालकांना दिलासा मिळाला. परंतु दुष्काळी परिस्थितीमुळे छावणीचालकांना दैनंदिन चारा, पशुखाद्य खर्च भागवणे मुश्कील झाले आहे.
आता तातडीने बिले द्या, अन्यथा चारा छावण्या बंद करू, अशी भूमिका घेण्याची वेळ या छावणीचालकांवर आली आहे.
लोहगाव, दरीबडची, सालेकिरी, पाच्छापूर, बेवनूर, वायफळ, अचकनहळ्ळी, जालिहाळ बुद्रुक, बनाळी, अमृतवाडी, उमदी, कोसारी, टोणेवाडी, शिंगणापूर, अंतराळ, करेवाडी, तिकोंडी, व्हसपेठ, बेवनूर, शेगाव, जत, वाळेखिंडी, दरीबडची, बिरनाळ, येळवी, बिळूर, निगडी खुर्द, मुचंडी, बाज येथे छावण्या सुरू आहेत.
तालुक्यातील बत्तीस चारा छावण्यांत लहान-मोठी एकोणीस हजार जनावरे दाखल आहेत. टोणेवाडी येथील चारा छावणीत सर्वाधिक म्हणजे 1547 जनावरे आहेत.
दरम्यान, वेळेत बिले न मिळाल्याने छावणी चालकांची आर्थिक कोंडी झाली आहे. दुष्काळी भागातील छावणी चालक संस्थादेखील सक्षम नाहीत. त्यात शासनाने अनामत घेतली आहे. अद्यापही बिले न मिळाल्याने व्याजाने किंवा मित्रमंडळी व नातलगांकडून उसनवार पैसे घेऊन छावण्या चालवण्याची वेळ आली आहे.
पाण्याअभावी तालुक्यातील ऊस होरपळला आहे. कर्नाटकातील ऊस आणला जात आहे. दरम्यान, अहवाल पडताळणी करून बिले देण्याचा निर्णय टंचाई निवारण शाखेने घेतला आहे.
बीले वेळेत न मिळाल्याने चारा छावणीचालक मेटाकुटीला आले आहेत. दैनंदिन अहवाल जिओ-टॅगिंग, आठवडा अहवाल यांचा मेळ बसणे कठीण झाले आहे. अनुदान कमी आहे. ही रक्कम वाढवावी. बिले वेळेत आदा करावीत, अशी मागणी आहे.
- ह.भ.प. तुकाराम महाराज छावणी मालक
मेअखेर अठरा चारा छावणी चालकांनी बिले सादर केली आहेत. त्या बिलाची सर्व पडताळणी करून वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवली आहे. बिले सादर होतील तसे जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करीत आहे.
- सचिन पाटील,
तहसीलदार, जत
No comments:
Post a Comment