Thursday, July 18, 2019

सांगली जिल्ह्यात पावसाने दिली उघडीप

जत,(प्रतिनिधी)-
सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप तर दिली आहेच पण काही ठिकाणी शेतकरी अन्य कारणाने संकटात सापडला आहे. जतसह पाच तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे तर काही ठिकाणी  मक्यावर लष्करी अळी  आणि सोयाबीनवर गोगलगायचा हल्ला झाल्याने येथील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले आहे.

सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 1647 मिलिमीटर पाऊस झाला आहे.  यात सर्वाधिक पाऊस शिराळ्यात झाला आहे. हा भाग कोकण पट्टीवर येत असल्याने याठिकाणी आतापर्यंत 529 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मिरजेला 170, कडेगाव 166, इस्लामपूर 190,पलूस 128 मिलिमीटर पाऊस झाला आहे. दुष्काळी तालुके असलेल्या  जतला 76, विटा 74, आटपाडी 95, कवठेमहांकाळ 84 आणि तासगावला 131 मिलिमीटर पाऊस झाला आहे. आता साध्याला गेल्या आठ दिवसांपासून चक्क पावसाची उघडीप आहे. त्यामुळे या तालुक्यांमध्ये अनेक संकटांना शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे.
 जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात 1 लाख 66 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत.  जिल्ह्यात एकूण खरीपाचे 2 लाख 777 हजार 680 हेक्टर क्षेत्र आहे. मात्र पावसाने उघडीप दिल्याने दुष्काळी भागात दुबार पेरण्यांचे संकट उभारले आहे. मुळात जिल्ह्यात पावसाळा उशिरा सुरुवात झाल्याने पेरण्या उशिराने सुरू झाल्या.  शिराळा तालुक्यात धुळवाफेवर 100 टक्के भाताची पेरणी झाली आहे. याठिकाणी पिके जोमात आहेत. मात्र दुष्काळी टप्प्यात मात्र पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे.
मुळात या भागात पिण्याच्या पाण्याचे संकट आहे. पाऊस झाला नसल्याने इथे अजूनही पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यापेक्षा पिण्याच्या पाण्याची गरज अधिक आहे. शिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नदेखील सुटला नाही.

No comments:

Post a Comment