जत,(प्रतिनिधी)-
जत तहसिल कार्यालय परिसरातील शौचालय व जत पंचायत समिती कार्यालय आवारातील मुतारीची दुरावस्था झाल्याने कामानिमित्त आलेल्या लोकांना उघड्यावर लघुशंका उरकावी लागत आहे. शौचालये तर वापर करण्यायोग्यतेचे नाहीत. त्यामुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे.
गेल्या कित्येक वर्षांपासून तहसील प्रशासन आणि पंचायत समिती प्रशासन दुर्लक्ष करत आल्याने नागरिकांतून प्रशासनाच्या कारभाराविषयी तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जत तहसिल कार्यालय परिसरातील पश्चिम बाजूस तत्कालीन आमदार व विद्यमान सामाजिक न्यायमंत्री ना.सुरेश (भाऊ) खाडे यांच्या स्थानिक विकास निधितून शौचालये बांधण्यात आली आहेत. सुरुवातीपासूनच या शौचालयाच्या स्वच्छतेकडे तहसिल कार्यालय प्रशासनाने व जत नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने या शौचालयाची अवस्था नरकसमान झाली आहे. या शौचालयाचे दरवाजे ही जागेवर नाहीत. त्यामुळे तालुक्यातील पंचायत समिती व तहसिल कार्यालयात कामानिमित्त आलेल्या लोकांना उघड्यावर लघुशंका करावी लागते. तर काही वेळेला नाईलाज शौचास बसावे लागते. तसेच महिलांसाठी तर सोयच नाही. या परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांना या परिसरातून फिरताना नाकाला रुमाल लावून फिरावे लागत आहे. अशीच अवस्था जत पंचायत समिती कार्यालय आवारात सभागृहाच्या उत्तर बाजूस बांधण्यात आलेल्या मुतारीची झाली असून ती मुतारी निकृष्ठ बांधकामामुळे पडली आहे. या परिसरात मुतारीची दुसरी कोणतीच सुविधा नसल्याने पक्षकारांना उघड्यावरच लघुशंका करावी लागत आहे. त्यामुळे हा परिसर दुर्गंधीने व्यापला आहे.
जत तहसिल कार्यालय परिसरातील शौचालयाची व पंचायत समिती कार्यालय आवारातील मुतारीची दुरूस्ती करावी अशी मागणी नागरिकांनी प्रशासनाकडे वारंवार करून देखील प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे नागरिकांतून प्रशासनाच्या कारभाराविषयी तिव्र संताप व्यक्त करण्यात येत असून. या परिसरातील शौचालयाची व मुतारीची त्वरित दुरूस्ती करावी अशी मागणी पक्षकारांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment