Sunday, July 28, 2019

जत तालुक्यात खरीप पेरण्या खोळंबल्या

जत,(प्रतिनिधी)-
 मान्सूनपूर्व आणि मान्सूनचा असा दोन्ही पाऊस जिल्ह्यात बरसलाच नसल्यामुळे जिल्ह्यातील दुष्काळी भागातील तलाव आणि विहिरी कोरड्या ठणठणीत आहेत. ऐन पावसाळ्यात दुष्काळी भागामध्ये सध्या २५० च्यावर टँकर चालू आहेत. खरीप पेरणीच्या पिकांनी मात्र माना टाकल्याचे दुष्काळी तालुक्यातील चित्र आहे.

सांगली जिल्ह्यातल्या सांगली परिसरासह इस्लामपूर, शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पण जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यात पाऊस नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. पश्चिम भागातील
जिल्ह्यात सर्वसाधारणपणे दि. १ जून ते १५ आॅगस्ट या कालावधित बऱ्यापैकी पाऊस होतो. शिराळा, वाळवा पट्यात तर याच कालावधित धो धो पाऊस कोसळत असतो. यावर्षीचे चित्र पूर्णत: वेगळे असल्याचे दिसत आहे. दरवर्षी साधारणपणे दि. २६ जुलैपर्यंत चांदोली धरण शंभर टक्के भरलेले असते. यावर्षी पावसाळा संपण्यास वीस दिवसांचा कालावधी शिल्लक असताना चांदोली धरण केवळ ६० ते ६५ टक्केच भरलेले आहे. जत, आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठेमहांकाळ, कडेगाव तालुक्यांसह मिरज पूर्व भागातील तलाव आणि विहिरी सध्या कोरड्या ठणठणीत आहेत. दि. १ जून ते २६ जुलैपर्यंत गेल्यावर्षी १२५.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. त्या तुलनेत यावर्षी १३.६ मिलिमीटर पाऊस कमी झाला आहे, असे शासकीय आकडेवारीवरुन दिसत आहे.
दि. १ जून ते २६ जुलै २०१९ यावर्षी मिरज तालुक्यात १४१ टक्के, जत १२५ टक्के, वाळवा ९३ टक्के, तासगाव १११ टक्के, शिराळा १०० टक्के, आटपाडी १२३ टक्के, कवठेमहांकाळ १५९ टक्के, पलूस ८५ टक्के, कडेगाव ११५ टक्के आणि सर्वात कमी खानापूर तालुक्यात ७० टक्के पाऊस झाल्याची नोंद पाटबंधारे विभाग आणि महसूल विभागाकडील पर्जन्यमापकावर झाली आहे. प्रत्यक्षात दुष्काळी भागाकडे पाहिल्यानंतर मात्र पावसाच्या आकडेवारीबद्दल शेतकऱ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले आहे. पाऊस पडला तर त्याचे पाणी कुठे गेले, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहे. कारण, आजही दुष्काळी भागातील तलाव कोरडे असून विहिरी आणि विंधन विहिरींनी तळ गाठला आहे. खरिपाची पेरणी जिल्ह्यात जवळपास ९० टक्केहून जास्त झाली आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्यामुळे खरिपाची कोवळी पिके कोमेजू लागली आहेत.

No comments:

Post a Comment