Saturday, July 6, 2019

पावसाळा आला,तब्येत सांभाळा

जत,(प्रतिनिधी)-
पावसाळ्यात होणार्‍या अनेक आजारांपासून बचाव करणे प्रत्येकाला फार आवश्यक असते. त्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. बाहेरचे अन्नपदार्थ खाऊ नयेत. हात स्वच्छ धुवावेत. घर आणि परिसरात घाण साचू देऊ नये. बाहेर जाताना छत्री, रेनकोटचा वापर करावा. असे काही खबरदारीचे उपाय करता येतील, असे डॉक्टर सांगतात.

पावसाळ्यात होणार्‍या गॅस्ट्रोएंटरायटिस या आजारात विषाणू, जीवाणू किंवा परजीवीमुळे आतड्यांना सूज येते. त्यामुळे अतिसार आणि उलट्या होतात. जीवाणू किंवा व्हायरल टमी बगमुळे हा आजार होतो. पावसाळ्यात गॅस्ट्रोएंटरायटिस आणि अन्नातून विषबाधा होणे मोठ्या प्रमाणावर आढळते. अचानक जुलाब सुरू होणे, अशक्त वाटणे, उलट्या होणे, हलका ताप येणे, भूक मंदावणे, पोट बिघडणे, हाता-पायांत वेदना होणे आणि डोकेदुखी ही या आजाराची लक्षणे आहेत. डिहायड्रेशन आणि ताप कमी करण्यासाठी मुख्यत: उपचार करण्यात येतात. रुग्णाच्या परिस्थितीनुसार प्रतिजैविके देण्यात येतात.
प्रतिबंधक उपाय : हायड्रेटेड राहा आणि सकस आहार घ्या, ज्यात दही आणि केळे व सफरचंदासारख्या फळांचा समावेश असेल. सॅलड खाणे टाळा. कारण, त्यातील भाज्या धुतलेल्या आहेत, स्वच्छ केलेल्या आहेत आणि योग्य तापमानात ठेवलेल्या आहेत, हे समजण्याचा काही मार्ग नसतो. रस्त्यांवर मिळणारे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करा. कारण, त्यात दूषित पाणी असू शकते आणि अतिसाराची सुरुवात होऊन परिस्थिती गंभीर होऊ शकते.
टायफॉईड : सॅल्मोनेला टायफी या जीवाणूमुळे होणारा हा आजार होतो. या आजारात खूप ताप येतो, अतिसार होतो आणि उलट्या होतात. दूषित रक्त आणि पाण्यावाटे या आजाराचे संक्रमण होते. ज्या ठिकाणी हात धुण्याची सवय नसते, त्या ठिकाणी या आजाराचे प्रमाण अधिक असते. आपल्याला या जीवाणूची लागण झाली आहे, हे माहीत नसलेल्यांकडूनही या आजाराचा फैलाव होऊ शकतो. अशक्तपणा, पोटात वेदना होणे, बद्धकोष्ठता आणि डोकेदुखी ही टायफॉईडची लक्षणे आहेत. तुमचे डॉक्टर तुम्हाला प्रतिजैविके देऊ शकतात.
प्रतिबंधक उपाय : शुद्ध पाणी प्या, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता राखा आणि हात नियमितपणे धुवून स्वच्छ ठेवा.
जीवाणूचा फैलाव होऊ नये म्हणून वेगवेगळे टॉवेल वापरावेत. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोंडावर रुमाल ठेवावा. फंगल स्किन इन्फेक्शन (बुरशीमुळे होणारा संसर्ग) होऊ नये, यासाठी कपडे कोरडे ठेवावेत. पावसाळ्यात घरी तयार केलेले ताजे अन्न खावे आणि रस्त्यावर मिळणारे पदार्थ वज्र्य करावेत. चित्रपटगृहे किंवा प्रदर्शनासारखी गदीर्ची ठिकाणे टाळावीत आणि हँड सॅनिटायझर्सनचा नियमित वापर करावा. महत्त्वाचे म्हणजे बाहेर जाताना छत्री ,रेनकोट सोबत बाळगा. पावसात भिजल्याने आजाराला निमंत्रण मिळू शकते.

No comments:

Post a Comment