जत,(प्रतिनिधी)-
आजची शिक्षण पद्धती गुणांवरच अडकली आहे. त्यामुळे आजच्या शिक्षण पद्धतीचा आजच्या पिढीला उपयोगच होत नाही. शिक्षणाचा मूळ उद्देश आम्ही समजून घ्यायला हवा. खरंच शिक्षण नेमकं कशासाठी हा प्रश्न विचारला की नोकरीसाठी, काम मिळण्यासाठी, व्यवसाय कला शिकण्यासाठी, समाजात कसं वागावं हे कळण्यासाठी,वाचन, लेखन यावं यासाठी. अशी अनेक उत्तरे व्यक्तिपरत्वे भिन्न भिन्न असू शकतात.
खरंच आज या प्रश्नाचे उत्तर शिक्षण हे ज्ञान मिळवण्यासाठी असावं. केवळ लिहिता वाचता आलं तर केवळ माहिती स्मृती पटलावर कोरुन ठेवणं सोपं होईल, प्राप्त ज्ञानाचा वापर करून जीवन आनंदमय जगण्याची कला यावी यासाठी शिक्षणाचा उपयोग व्हावा पण आजची शिक्षणपद्धती व व्यवस्था गुणपत्रकावरील टक्क्यांमध्ये अडकल्याचे दिसून येते मग ते मिळवण्यासाठी वाट्टेल तो खटाटोप व धडपड चाललेली असते. शाळा, क्लास, व्यक्तिमत्त्व विकासाचे नानाविध छंदवर्ग, तसेच खेळांचे क्लब्स असे सारे प्रकार चाललेले असतात. सारासार विचार केल्यास स्पष्टपणे हाती फारसं काही लागताना दिसत नाही.
मुलांच्या पिढ्यान्पिढ्याचे लोंढे येत आहेत इतकंच नव्हे तर बहिस्थ शिक्षण माध्यमातून शिक्षण घेणाºयांची संख्याही तुलनेने अधिक दिसत आहेत केवळ पदव्यांनी पोट भरत नाही तर सोबत व्यवहार कुशलता ही जोपासण्याचं शिक्षण घ्यावे लागेल. पाठ्यपुस्तकातील विविध विषय, त्यातील संकल्पना या मुळातून समजून घ्याव्या लागतील. शब्दाशब्दांचे अर्थ जाणून घ्यावे लागतील. मुळापासून सारं केवळ विद्यार्थी न बनता ज्ञानार्थ बनून घेतलेलं शिक्षणच आम्हाला उपयोगी पडू शकतं. डॉ. जयंत नारळीकरांसारख्या अनेक महान लोकांनी मातृभाषेतून शिक्षण घेतले म्हणून बाकी कुठेही अडथळा येत नाही तर मुलांच्या संकल्पना मातृभाषेतून अधिक स्पष्ट होतात, असंच अनेक विद्वानांनी विषद केलेले आहे. तरीही इंग्रजी सारख्या माध्यमातून शिक्षणाचा अट्टाहास करणं आजही प्रतिष्ठेचा मानलं जाते.
केवळ पुस्तकी टक्केवारीने १००% माणूस घडण्याची अपेक्षा करणं पूर्णत: चुकीचं आहे. ज्ञानाला संस्काराची जोड कुटुंंबातून मिळणं गरजेचं आहे. नवी जीवनपद्धती क्षणिक आनंददायी बनवते. चिरंतन आनंदासाठी सातत्याने ज्ञान मिळवणे व जीवनात सार्थ उपयोजन करणं म्हणजे खरं शिक्षणं हे जाणीवपूर्वक कळावे यासाठी आज शिक्षणाची गरज आहे. जीवनात अनेकदा अनेक समस्या येऊ शकतात, प्रतिकूलता येऊ शकते अशावेळी तणावाचं व्यवस्थापन करताना उपयोगी व्हावं यासाठी शिक्षण घेण्याची गरज आहे.
जीवन जगण्याची कला शिकण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. गुणात्मक विकासासोबत गुणवत्तापूर्ण जीवन जगता यावं यासाठी शिक्षणाची गरज आहे. कर्तव्याला सेवेच्या पावित्र्याची सद्बुद्धी मिळण्यासाठी आज शिक्षणाची गरज आहे. व्यवहाराला नैतिकतेचा सुगंध लाभावा यासाठी शिक्षण हाच मूळ उद्देश शिक्षणाचा असायला हवा आहे. सेवाभाव असणारी माणसं तयार होण्यासाठी शिक्षणाची गरज आहे.
No comments:
Post a Comment