Saturday, December 10, 2022

सांगली जिल्ह्यात ३८ गावचे सरपंच बिनविरोध

सरपंचपदासाठी ११२०, सदस्यांसाठी ८६०४ निवडणूकीच्या रिंगणात

सांगली,(न्यूज नेटवर्क):

 सांगली जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले आहेत. अनेक  ग्रामपंचायतीमधील ५७० सदस्य बिनविरोध झाले आहेत. सांगली  जिल्‍ह्यातील सरपंच पदाच्या ४०९ जागांसाठी १ हजार १२० तर ४ हजार १४६ सदस्य पदांसाठी तब्बल ८ हजार ६०४ उमेदवार निवडणुकीच्या  मैदानात आहेत. दरम्यान सरपंच पदाचे १ हजार ३०२ व सदस्य पदासाठीच्या ५ हजार ५६६ जणांनी निवडणुकीतून माघार घेतली. उर्वरित ग्रामपंचायतसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साम, दाम आणि दंड या भेदाचाही काही ठिकाणी वापर करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक पहायला मिळाली. बहुतांशी ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

जिल्ह्यातील ४४७  ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत रंग भरू लागला आहे. यंदाच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात इच्छुक उतरल्याने विक्रमी संख्येने अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे बंडखोर इच्छुकांची समजूत काढून त्यांचे अर्ज माघार घेता-घेता नेत्यांची चांगलीच दमछाक झाली. निवडणुकीसाठी सरपंच आणि सरदस्यपदांच्या एकूण ४७१६ जागा आहेत. त्यासाठी तब्बल १६ हजार ६५ उमेदवारांचे १६ हजार ४४२ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सरपंचपदाच्या ४४७ जागांसाठी दोन हजार ४५१ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३८ सरपंचांची बिनविरोध निवड झाली. उर्वरित ४०९ जागांसाठी एक हजार १२० उमेदवार रिंगणात आहेत, सदस्यपदाच्या चार हजार ६९ जागांसाठी १४ हजार ३३० इच्छुकांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी पाच हजार ५६६ जणांनी माघार घेतली, सदस्यांच्या ५७० जागा बिनविरोध झाल्या. उर्वरित ३ हजार ६९९ जागांसाठी आठ हजार ६०४ उमेदवार मैदानात उतरले आहेत. म्हणजेच सरपंच आणि सदस्य पदांच्या एकूण ४५५५ जागांसाठी ९७२४ जण निवडणुकीच्या रिंगणात उरले आहेत. बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

निवडणूक लागलेल्या ४४७ ग्रामपंचायतीपैकी ३८ ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध झाले. येलूर, कोळे, धोत्रेवाडी, गौडवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडीच्या सरपंचासह सदस्य बिनविरोध झाले. याशिवाय तांदूळवाडी आणि बनेवाडीचे सरपंचही बिनविरोध निवडून गेले. शिराळा तालुक्यातील कोकरुड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुपिरेचे सरपंच आणि चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी आणि शिंदेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. तासगाव तालुक्यातील चिंचणी आणि आरेवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. कडेगाव तालुक्यातील विहापूर, येवलेवाडी, खानापूर तालुक्यातील गार्डी, ढवलेश्वर, माधळमुठी, वासुंबे, धोंडेवाडी, मिरज तालुक्यातील सावळवाडी, जत तालुक्यातील रेवनाळ, शिंगणापूर तर पलूस तालुक्यातील पुणदीवाडी आणि हजारवाडी ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात स्थानिक नेत्यांना यश आले. 

शासनाने ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी वित्त आयोगाचा निधी थेटदेण्यास  सुरवात केली आहे. त्यामुळे आता थेट  शासनाकडूनच निधी आपल्याकडे येणार असल्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी  इच्छुकांची संख्या वाढली आहे. अगदी पंचायत समिती, जिल्हा परिषदेपेक्षा ग्रामपंचायत सदस्य चांगला, असे कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र इच्छुकांची भाऊगर्दी झाल्यामुळे स्थानिक नेत्यांसमोर डोकेदुखी वाढली आहे. 


No comments:

Post a Comment