जत,(जत न्यूज नेटवर्क) -
आधुनिक जीवनशैलीचा अंगिकार केल्याने चुकीच्या आहाराचे सेवन केले जात आहे. त्यामुळे विविध आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. निरोगी प्रकृती राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व फळभाज्यांचा समावेश आवश्यक आहे असे प्रतिपादन डॉ. विनोद शिंपले यांनी केले. डॉ. शिंपले जत येथील राजे रामराव महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित "औषधी रानभाज्या प्रदर्शन व पाककला स्पर्धा" यांच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश पाटील होते.
डॉ. शिंपले मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, जगातील सतरा देश जैवविविधतेने अत्यंत समृद्ध आहेत. त्यात भारताचा समावेश आहे. आपल्या देशातील उत्तर-पूर्व हिमालय भूप्रदेश (ईशान्य भारत), पश्चिम घाट परिसर, उत्तर-पश्चिम हिमालय भूप्रदेश व अंदमान-निकोबार बेटांचा परिसर येथे सुमारे 48 हजार वनस्पती प्रजातींची नोंद करण्यात आली असून, यापैकी 17500 प्रजाती सपुष्प वनस्पतींच्या आहेत. भारतात आठ हजार औषधी वनस्पतींच्या प्रजाती आहेत, तर गवतांच्या 1200 प्रजाती आहेत. जगातील एकूण जैवविविधतेच्या 6.7 टक्के जैवविविधता भारतात आढळते. जगभरातील एकूण वनस्पती संपदेपैकी 7.1 टक्के वनस्पती, तर एकूण प्राणी प्रजातींपैकी 6.7 टक्के प्राणी प्रजाती आपल्या देशात वास्तव्य करतात. तसेच जैवविविधतेच्या दृष्टीने भूतलावरील 35 भूप्रदेश 'अती संवेदनशील' प्रदेशांपैकी आपल्या देशातील उत्तरपूर्व हिमालय भूप्रदेश व पश्चिम घाट परिसर 'जागतिक हॉट स्पॉट रिजीनस' म्हणून ओळखले जातात.
महाराष्ट्रातील पश्चिम घाट परिसरात म्हणजेच सह्याद्री परिसरात महाराष्ट्रातील 12 जिल्हे व 62 तालुके समाविष्ट आहेत व येथे अत्यंत समृद्ध जैवविविधता आहे. निसर्गातील वनस्पती विविधता मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मानवी जीवनक्रमात माणसाचा प्रत्येकक्षणी वनस्पतींशी संबंध येतो. शेतीप्रधान भारतात विविध पिकांच्या सुमारे 166 प्रमुख प्रजाती आहेत आणि सुमारे 320 प्रजाती या पिकांच्या जाती आहेत.
मानवी आहारात प्रामुख्याने वनस्पतींचा समावेश असतो. धान्य, कडधान्य यांच्यानंतर मानवी आहारातील प्रमुख घटक म्हणजे भाजी. वनस्पतींचे विविध भाग माणसाच्या आहारात भाजी म्हणून वापरले जातात. खोड, पाने, फळे, बिया, कंद, मुळे, फुले यांचा भाजी म्हणून वापर केला जातो. भारतात भाज्यांच्या सुमारे 55 प्रजाती आहेत. बटाटा, मिरची, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाजींच्या अनेक प्रजाती विदेशी असून विविध देशांतून या प्रजाती अनेक वर्षांपूर्वी भारतात आल्या आहेत. भाजीसाठी वापरल्या जाणाच्या बहुतांश वनस्पतींची शेतात लागवड केली जाते.
अलीकडील काळात बाजारपेठेत भाज्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे भाजी उत्पादनात वाढ करण्यासाठी आज अमर्यादित प्रमाणात रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा वापर शेतकरी करीत आहेत. यामुळे भाजी उत्पादनात, भाज्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे, पण त्यांची नैसर्गिक चव, प्रतिकार शक्ती कमी होत चालली आहे. यामुळे भाज्यांवर जीवाणू, विषाणू, बुरशी व कीटकजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. या रोगांना आटोक्यात आणण्यासाठी भाजींच्या पिकांवर शेतकरी मोठ्या प्रमाणात विषारी रासायनिक जीवाणू-विषाणूनाशके, बुरशीनाशके, कीटकनाशके फवारतात. अशा भाज्यांच्या वापरामुळे माणसांमध्ये सांधेदुखी, कॅन्सर, अल्सर, पशांचे, पोटाचे विकार इ. रोग होऊ लागले आहेत. यासाठी सर्वांनी पारंपरिक भाजी पिकांना एक पर्याय म्हणून रानभाज्यांचा विचार अवश्य केला पाहिजे. आपल्या सभोवताली शेतात, ओसाड जमिनीवर, बागेत, परसात, जंगलात अनेक वनस्पती आहेत, काही तणे आहेत. यातील काहींचा आपणास रानभाज्या म्हणून वापर करता येतो. आपल्या सभोवताली असणान्या वनस्पतींची ओळख व त्यांचा उपयोग याबाबतची प्राथमिक स्वरूपाची माहिती खेड्यात, वनात राहणाऱयांना ग्रामीण भागातील महिलांना, ग्रामस्थांना असते. ते पारंपरिक पद्धतीने अशा वनस्पतींचा आपल्या आहारात भाजी म्हणून सर्रास वापर करतात. अशा रानभाज्यांची सर्वांना ओळख व्हावी यासाठी आयोजित केलेल्या प्रदर्शनाचे व पाककला स्पर्धेचे त्यांनी कौतुक केले.
मानवी आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण, भाज्यांमध्ये अनेक घटक असतात. पालेभाज्यांतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे तंतूमय पदार्थ जे पालेभाज्यांची पाने, शिरा, देठे, फळांची साल, तसेच खोडांत मोठ्या प्रमाणात असतात. भाज्यांमध्ये जीवनसत्वे व खनिजे (मिनरल्स) प्रमाणात असतात ती यांद्वारे शोषली जातात. त्यामुळे शरीरातील सप्तधातूंची कार्ये चांगल्या पद्धतीने चालतात. तंतूमय पदार्थ लहान आतडयांत शोषले जात नाहीत, त्यामुळे ते जसेच्या तसे मोठ्या आतड्यात येतात. त्यामुळे मलाचे प्रमाण वाढते, त्यास मऊपणा येतो आणि मलविर्सजनास मदत होते. यामुळे बद्धकोष्ठता, मूळव्याध, अपेंडिसायटीस, कोलायटीस किंवा इतर आतड्याचे विकार होत नाहीत. मोठ्या आतड्यात जंतूपासून निर्माण होणारे हानिकारक द्रव्य तसेच इतर सेंद्रीय पदार्थ तंतू शोषून घेतात आणि शरीराबाहेर टाकण्यास महत्त्वाची मदत करतात. प्रकृती निरोगी राहण्यासाठी आहारात पालेभाज्या व इतर भाज्या अत्यंत आवश्यक आहेत. पालेभाज्या "सारक' असतात, म्हणूनच स्थूल शरीर असणाऱ्यांनी तसेच मधुमेह, बद्धकोष्ठ, अपचनांचे विकार असणान्यांनी अधिक प्रमाणात पालेभाज्या खाव्यात. पालेभाज्यांत तंतूप्रमाणेच पाणीही जास्त प्रमाणात असते. कर्बोदके, प्रथिने व स्निग्ध पदार्थ प्रत्येक पालेभाजीत व इतर भाज्यांत कमी अधिक प्रमाणात असतात.
आधुनिक जीवनशैलीमुळे बैठे काम, व्यायामाचा अभाव, वेळी अवेळी खाणे, यामुळे शौचास साफ न होणे, बद्धकोष्ठता, मूळव्याध अल्सर, पित्ताचा त्रास आदि विकारांचा त्रास जाणवू लागला आहे. त्यामुळे खानावळीतील जेवण न खाता घरी बनविलेल्या रानभाज्यांचा आरोग्य टिकविण्यासाठी आहारात वापर करावा असे शेवटी डॉ. शिंपले यांनी आवाहन केले. सदर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांनी विविध रानभाज्यांचे प्रदर्शन करून माहिती दिली. तसेच रानभाज्यांची पाककला सादर केली.
स्वागत व प्रास्ताविक डॉ. राजेंद्र लवटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. शंकर सौदागर यांनी तर आभार प्रा. मल्लाप्पा सज्जन यांनी मानले. यावेळी डॉ. सचिन पाटील, प्रा. महादेव करेन्नवार, प्रा. कृष्णा रानगर, प्रा. शिवाजी कुलाळ, प्रा. निर्मला मोरे, प्रा. संगीता देशमुख, प्रा. ललीता सपताळ व विद्यार्थी उपस्थित होते.
Nice sir 👍🥳
ReplyDelete