Friday, December 16, 2022

राज्यात वर्षभरात ८५८ तरुणींचे घरातून पलायन

 देशात सर्वाधिक प्रमाण; राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाची आकडेवारी

सांगली, (न्यूज नेटवर्क)-

 प्रेमसंबंध, अनैतिक नातेसंबंध किंवा विविध आमिषांना बळी पडून घरातून पळून जाणाऱ्या तरुणींची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक असून गेल्या वर्षभरात ८५८ तरुणी घरातून पळून गेल्या आहेत. त्याचबरोबर पळून गेलेल्या मुलींचा शोध घेण्यात देशात महाराष्ट्र पोलीसच अव्वल आहेत. घरातून पळून जाणाऱ्या तरुणींची माहिती राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालातील आकडेवारीतून उजेडात आली आहे. या अहवालानुसार घरातून पळून जाणाऱ्या तरुणींच्या संख्येच्या बाबतीत महाराष्ट्रापाठोपाठ ओदिशाचा क्रमांक लागतो. ओदिशात गेल्या वर्षभरात ७३५ तरुणी घर सोडून गेल्या आहेत.

अल्पवयीन मुलींसह तरुणी-महिला घरातून पळून जाण्याच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासाठी अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये प्रेमसंबंध, लग्नाचे आमिष किंवा अनैतिक संबंध, लिव्ह इन रिलेशन या कारणांमुळे सर्वाधिक तरुणी-महिला घरातून पळून जात आहेत. प्रेमसंबंध किंवा अनैतिक संबंधाला कुटुंबीयांकडून होणारा विरोध बघता अनेक तरुणी, महिला घरातून प्रियकराबरोबर पळून जातात. तसेच शाळकरी मुलीसुद्धा प्रेम या शब्दाचा अर्थ कळण्यापूर्वीच प्रियकरासोबत संसार थाटण्याचे स्वप्न बघत घरातून निघून जातात. काही तरुणी नोकरी करण्यासाठी, चित्रपटात काम करण्यासाठी किंवा कामाच्या शोधात घर सोडतात. काही तरुणी घरातल्यांकडून होणाऱ्या त्रासामुळेही घरातून पळून जातात. शरीरविक्री, आलिशान जीवन जगण्याची ओढ आदी कारणांमुळेही तरुणी घर सोडतात, असे सांगितले जाते.

शोध घेण्यात महाराष्ट्र पोलीस अग्रेसर

महाराष्ट्र सरकारने मानवी तस्करी विरोधी पथकाची स्थापना (एएचटीयू) केली आहे. त्यामुळे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणि पोलीस आयुक्तालयात एएचटीयूचे पथक कार्यरत आहे. अपहरण झालेल्या, पळून गेलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेण्याचे काम हे पथक करते. गेल्या वर्षभरात एएचटीयूने सर्वाधिक मुलींचा शोध घेऊन त्यांना कुटुंबीयांच्या स्वाधीन केले आहे.

महाराष्ट्रातून 858 तरुणी हरवल्याची नोंद आहे. त्यातील 819 तरुणी सापडल्या. ओडीसामधून 735 तरुणी बेपत्ता झाल्या, त्यातील 389 सापडल्या. तेलंगणा राज्यातून 659 तरुणी बेपत्ता झाल्या, त्यापैकी 574 सापडल्या. आंध्रप्रदेश मधून 308 बेपत्ता झाल्या त्यापैकी 267 सापडल्या. आसाममधून 298 मुली बेपत्ता झाल्या, त्यापैकी 141 सापडल्या. 

No comments:

Post a Comment