माहिती जाणून घ्या
सर्वाधिक जत तालुक्यातील 26 ग्रामपंचायतींना स्वतंत्र इमारती नाहीत
सांगली जिल्ह्याची स्थापना 1961 साली झाली. जिल्ह्यात दहा तालुके आहेत. या तालुक्यांमध्ये मिळून एकूण 699 ग्रामपंचायती आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या आता तीस लाखांहून अधिक झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींची लोकसंख्याही वाढली आहे. जिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतींना स्वतःची इमारती नाहीत. यांपैकी सर्वाधिक 26 ग्रामपंचायती जत तालुक्यातील आहेत. जत तालुका सांगली जिल्ह्यातला सर्वात मोठा तालुका आहे. 120 गावांचा तालुका आहे. यामध्ये ऐतिहासिक उमराणी गावासह कोंतेव बोबलाद, बालगाव, अंकलगी या मोठ्या गावांचाही समावेश आहे. प्रतापराव गुजर आणि बहलोल खान यांच्यातील घनघोर युद्ध उमराणी येथे झाले होते. अशा या शिवकालीन , प्रसिद्ध गावची लोकसंख्या सहा हजारांहून अधिक आहे. मात्र तरीही या गावाला अद्याप ग्रामपंचायतीची स्वतःची इमारत नाही. जिल्ह्यात स्वतःचे कार्यालय नसलेल्या 71 ग्रामपंचायतींची लोकसंख्या आता सरासरी दोन हजारांच्या घरात आहे. यातील 16 गावांची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार हजारांच्या आतच आहे. मात्र उर्वरित गावची लोकसंख्या अधिक असूनही त्यांना स्वतःची इमारत नाही. इमारती नसलेल्या तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या पुढीलप्रमाणे: तासगाव 6, कवठेमहांकाळ2, आटपाडी4, कडेगाव 4, पलूस 2, मिरज 4, शिराळा 8, खानापूर7, वाळवा 8
No comments:
Post a Comment