विसुभाऊ बापटांचं 'कुटुंब रंगलय काव्यात' हा हटके कार्यक्रम. सादरीकरणाच्या वेगळेपणामुळं रसिकांनी डोक्यावर घेतल्याचं त्याच्या तीन हजारांवर पार प्रयोगामुळं दिसून येतं. विसुभाऊ बापट मूळचे सांगली जिल्ह्यातील विट्याचे! इथल्या महात्मा गांधी विद्यामंदिरात शिकले. लहानपणापासून कविता आणि गाण्यांची आवड असलेल्या विसुभाऊ बापटांचा पुढे छंदच झाला. त्यांच्या तोंडातून ओघवत्या शैलीत एक से बढकर एक कविता बाहेर पडू लागल्या आणि जन्माला आला 'कुटुंब रंगलय काव्यात' हा कार्यक्रम.
विसुभाऊ बापटांचं 'कुटुंब रंगलय काव्यात' हा प्रेक्षक रसिकांनी नावाजलेला हटके कार्यक्रम आहे. एकादी साधीशी गोष्टही काव्यात्मक पद्धतीने सांगण्याची हातोटी लाभलेल्या विसुभाऊंनी 'वाक्यं रसात्मक काव्यं' या उक्तीप्रमाणे वाक्यांत रसपूर्ण काव्य करून टाकलं आहे. ओंकारसाधना, मुंबईनिर्मित 'कुटुंब रंगलय काव्यात' या एकपात्री काव्यनाट्यानुभवाच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कवितेचं बीज नव्यानं रोवलं आहे. प्रस्थापित तसेच नवोदित कवींच्या कवितांचा संच घेऊन ते गेली चार दशकांहून अधिक काळ रसिकांना आनंद देत आहेत. रसिक त्यांच्या या काव्यात्मक कार्यक्रमात अक्षरशः न्हाऊन निघत आहेत.
दोन -तीन वर्षांपूर्वी 'कुटुंब रंगलय काव्यात' या सलग 15 तास चाललेल्या काव्य सादरीकरणाची दखल वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाने घेतली. या अगोदर वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्ड्समध्ये या कार्यक्रमाची नोंद झाली आहे. 1981 पासून याचे प्रयोग सादर केले जात आहेत. आता 'कुटुंब रंगलय काव्यात'ला 41 वर्षे पूर्ण झाली आहेत. बापट त्यांच्या शब्द आणि सुरांच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांना कवितेच्या अद्भुत जगाची सफर घडवून आणत आहेत. 'जे न देखे रवी ते देखे कवी' असे म्हटले जाते, त्यामुळे निरनिराळ्या कवींच्या दृष्टिकोनातून हे जग जाणण्यासाठी तसेच कवितेच्या या जगाची एक झलक 'कुटुंब रंगलय काव्यात' या कार्यक्रमातून अनुभवता येते.
महाराष्ट्रातील असा एकही ख्यातनाम कवी नसेल की ज्याची कविता विसुभाऊंना पाठ नसेल. अफाट पाठांतर आणि हार्मोनियम वाजवत अफलातून सादरीकरण हे वैशिष्ट्य. त्यांच्या भात्यातून एक ना अनेक कविता जेव्हा बाहेर पडतात तेव्हा परिसर मंत्रमुग्ध होतो. बोबड्या बाळाच्या तोंडच्या शब्दापासून म्हाताऱ्या -कोताऱ्याची बोली ,एकादी हळुवार प्रेमकविता असो किंवा शौर्य रसातील ओळी, विसुभाऊ डोळ्यांतून कधी आसू तर चेहऱ्यावर कधी हसू निर्माण करतात, हे कळतच नाही. वऱ्हाडी, कोकणी, आगरी अशा विविध कवितांचा त्यात समावेश असतो. महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षक रसिकांनीच फक्त डोक्यावर घेतले नाही तर महाराष्ट्राबाहेर आणि जगभरातही त्यांच्या कार्यक्रमांना भरभरून प्रतिसाद मिळाला आहे.
No comments:
Post a Comment