Sunday, December 11, 2022

दिशाभूल करणाऱ्या शासनाच्या निषेधार्थ १४ डिसेंबर रोजी जत बंदची हाक

संजय कांबळे: विद्यमान व पूर्वीच्या सरकारकडून दिशाभूल

सांगली, (मच्छिंद्र ऐनापुरे) :

महाविकास आघाडीचे  तत्कालीन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी वर्षभरात पाणी देऊ, असे सांगितले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विस्तारित म्हैसाळ योजनेला  दोन हजार कोटी रुपये देऊ म्हणतात. मुळात या योजनेला प्रशासकीय मान्यता नाही. मग दोन हजार कोटी कसे देणार, याचा पत्ता नाही. यानिमित्ताने केवळ जत तालुक्याच्या जनतेची दिशाभूल चालवली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या १४ डिसेंबरला जत तालुंका बंद ठेवून निषेध करू, अशी माहिती रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. 

जत बंद इशाऱ्याची शासनाने दखल घेतली नाही  तर तालुक्‍यातील ग्रामपंचायतींच्या मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा त्यांनी दिला आहे. जत तालुक्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तालुक्‍यातील १० गावांत आणि ९१ वाड्या-वस्त्यांवर मराठी प्राथमिक शाळा नाहीत. तालुक्याला रस्त्याचा अनुशेष पूर्ण क्षमतेने दिला जात नाही. जत शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक ते महावितरण कार्यालयापर्यंतचा रस्ता कित्येक वर्षे झाली दुरुस्त होत नाही. तालुका विभाजन होत नाही.  तातडीने उमदी व माडग्याळ तालुका करून या ठिकाणी पंचतारांकित एमआयडीसी व्हावी. जत शहरासाठी ६४ कोटींची पाणी योजना मंजुर करावी, अशा अनेक मागण्या श्री. कांबळे यांनी मांडल्या. यापूर्वी रिपब्लिकन पक्षाने जनतेच्या अनेक प्रश्‍नांसाठी आंदोलन केले. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही हे दुर्दैव आहे. जिल्हा नियोजन समितीवर प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य नियुक्त व्हावेत. मुचंडी, कोटटलगीसह अन्य रस्त्यांच्या कामांची चौकशी झाली पाहिजे,'' अशी मागणी जिल्हाध्यक्ष कांबळे यांनी केली. यावेळी संजय कांबळे-पाटील, सुभाष कांबळे, हेमंत चौगुले, विकास साबळे, शंकर वाघमारे, विलास बाबर आदी उपस्थित होते. 


No comments:

Post a Comment