Sunday, December 18, 2022

पारंपरिक शाहिरी गीतप्रकारांमधून इतिहासाचे पाठ


शालेय विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागावी म्हणून डॉ. गंगाधर बापू रासगे यांनी अभ्यासक्रमातील पाठांवर आधारित गाण्यांचा वापर सुरू केला. शाहिरी गीत प्रकारांमधील पोवाडा, फटका, सवालजबाब याचबरोबर लोकसंगीताच्या धर्तीवर भारुड, लावणी आदी व जानपद गीतांतील ओव्या, पाळणा यांची रचना केली आहे. ऐतिहासिक घटना गद्यात शिकवण्याबरोबरच ती पारंपारिक गीतांच्या चालींतून सादर केल्यास मुले - मुली अध्यापनात रस घेतात. इतिहास विषय त्यांना आवडू लागतो. रासगे म्हणाले, “इतिहास हा विषय विद्यार्थीदशेत अनेकांना रुक्ष, कंटाळवाणा वाटू शकतो. मी अनेक वर्षे दिवसाच्या व रात्रीच्या शाळेतही इतिहास शिकवतो. एकतीस वर्षांपासून पुस्तकातील घटना, मजकूर यांवर आधारित गाणी रचून इतिहासाचा पाठ अधिक रंजक करण्याची युक्‍ती मी वापरत आहे. लहानपणी आईकडून जात्यावरील ओव्या ऐकल्या. इयत्ता ६ वीत असताना घोगरेगुरुजींनी मला पोवाडा गायला शिकवले होते. त्या चालींमध्ये पाठातील शब्द भरले." 

रासगे यांनी स्पष्ट केलं की, इतिहास हा विषय पाठांतराचा असू नये. तो किचकट व कंटाळवाणा वाटू नये. लक्ष देऊन ऐकल्यास लक्षात रहावा, यासाठी मी गीतरचनांचा केलेला हा प्रयोग उपयुक्त ठरला. अनेक शाळा व शिक्षकांच्या प्रशिक्षणवर्गात प्रात्यक्षिकाची संधी मिळाली. गीतांचे प्रकार वाढले. अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाचा 'पाळणा', फ्रेंच राज्यक्रांतीसाठी 'सवाल जबाब', रशियन राज्यक्रांतीसाठी कव्वाली, औद्योगिक क्रांतीवरील 'भारुड, भारतातील १८५७ च्या बंडावर 'पोवाडा' हे प्रयोग सफल झाले. शिवाय सामाजिक वाहतूक नियंत्रणासारख्या प्रबोधनपर विषयावर ''फटका"' लिहिला. यामुळे मला अनेक संधी, पुरस्कार व सन्मान मिळत गेले. डॉ. कल्याणी हर्डीकर यांच्या प्रोत्साहनामुळेच मी 'पोवाडा या काव्यप्रकाराचा समग्र अभ्यास' या विषयात पोएच.डी. साठी संशोधन केले आहे. - नीला शर्मा 


No comments:

Post a Comment