Monday, December 19, 2022

सांगलीकरांना ड्रायपोर्ट व द्राक्ष संशोधन केंद्राची प्रतीक्षा

सांगलीला मोठ्या उद्योगांची गरज: बेरोजगारांच्या संख्येत वाढ

सांगली,(मच्छिंद्र ऐनापुरे)-

औद्योगिक, कृषी पंढरी म्हणून ओळख असलेल्या सांगली जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत एकही मोठा उद्योग, प्रकल्प आलेला नाही. कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथील ड्रायपोर्टचे घोंगडे गेल्या पाच- सहा वर्षांपासून भिजत पडले आहे. ड्रायपोर्ट सुरू झाल्यास द्राक्ष, डाळींब, बेदाणा, हळदीसह अन्य शेतीमालाची वाहतूक करणे सोपे जाईल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र अजूनही त्याची प्रतिक्षाच आहे. हीच अवस्था द्राक्ष संशोधन केंद्राची आहे.  त्याचीही अजून सुरुवात झालेली नाही. यासाठी यशस्वी राजकीय पाठपुराव्याची गरज आहे. 

जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातल्या रांजणी  गावाच्या हद्दीत ड्रायपोर्टची घोषणा करण्यात आली. आता त्याला पाच- सहा वर्षे झाली.  सुरुवातीला रांजणी येथील शेळी- मेंढी विकास महामंडळाच्या जागेवर ड्रायपोर्ट उभारणीचा प्रस्ताव होता. जागेच्या भू- संपादनास महामंडळाने परवानगी दिली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव बारगळला. यानंतर रांजणी येथील गट क्रमांक 1815 ते 1827, 1830 अ व ब आणि 1831 मधील एकूण 107 एकर क्षेत्रावर ड्रायपोर्ट उभारणीचा  निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याबाबतही प्रत्यक्षात प्रशासनाकडून कार्यवाही होताना दिसत नाही. ड्रायपोर्ट झाल्यास द्राक्ष, डाळींब, बेदाणा, हळदीसह अन्य शेतमालाची वाहतूक करणे सोपे जाणार आहे. शिवाय हजारो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे. या माध्यमातून जिल्ह्याचा विकास गतीने होईल अशी अपेक्षा आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणांचा ढिसाळपणा, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे ड्रायपोर्टचे काम रखडले आहे. या मागणीला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण झाला तरी ड्रायपोर्टला मुहूर्त मिळत नसल्याने या प्रकल्पाचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. प्रकल्प  होणार की नाही, अशी शंका आता व्यक्त केली जाऊ लागली आहे.  

हीच अवस्था द्राक्ष संशोधन केंद्राची आहे. सांगली जिल्हा द्राक्ष व बेदाण्यांसाठी प्रसिद्ध  आहे. देशातील एकूण बेदाणा उत्पादनात 80 टक्के वाटा हा सांगली जिल्ह्याचा आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, पलूस, कडेगाव, 'आटपाडी, कवठेमहांकाळ ही बेदाणा उत्पादक केंद्रे आहेत. सांगलीत बेदाण्याचे अंदाजे वार्षिक उत्पादन 1.25 लाख टन असून त्यातील 30-40 टक्के निर्यात होते. सुमारे  900 पेक्षा जास्त व्यापारी केंद्रे आणि 70 शीतगृहे असलेल्या तासगावमध्ये  1994 मध्ये जिल्हा लिलाव बाजार सुरू  झाला.  बेदाणा  उत्पादनासाठी थॉमसन, सीडलेस, माणिकचमन,  सोनाका आणि तास-ए- गणेश या बिया नसलेल्या   द्राक्षांचा जातींना प्राधान्य दिले जाते. नवीन क्षेत्रामध्ये द्राक्षांचा आर्क विस्तार आणि संवर्धनासाठी जिल्ह्याला वाव आहे. ज्याकरिता नियमित संशोधन आणि विकास समर्थन आवश्यक आहे. द्राक्ष हे उच्च मूल्याचे पीक आहे. परंतु अलिकडे जास्त उत्पादनांची मागणी आहे. हवामानाच्या घटकांमधील स्केसोनल फरकामुळे, प्रदेश नियमित पूर, जैविक आणि अजैविक तणावाच्या उच्च घटनांनी ग्रस्त आहे. यामुळे उत्पादन. खर्चात वाढ होते आणि जिल्ह्यातील बेदाणा उत्पादनात अडथळे येतात आणि जिल्ह्याची क्षमता लक्षात घेऊन भविष्यातील उत्पादन टिकून राहिले पाहिजे.यासाठी संशोधनाची गरज आहे.  या भागातील द्राक्ष उद्योगाची गरज पूर्ण करण्यासाठी व या क्षेत्राचा सर्वांगीण विकास होणेसाठी सांगली  जिल्ह्यात द्राक्ष संशोधन केंद्राची  स्थापना करावी, अशी मागणी खासदार पाटील यांनी केंद्रिय कृषीमंत्र्यांच्याकडे केली आहे. मात्र याबाबतही अद्यापपर्यंत  कोणतीही हालचाल दिसून येत नाही.


No comments:

Post a Comment