Sunday, December 25, 2022

द्राक्षबागांसाठी राबताहेत बिहारचे 30 हजारांवर मजूर

सांगली, (मच्छिंद्र ऐनापुरे)-

बागायती पिकांसाठी मजुरांची उपलब्धता सध्या चिंतेचा विषय ठरतो आहे. जिल्ह्यात द्राक्षक्षेत्रातील वाढीमुळे स्थानिक मजुरांकडून कामे करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. मागील दहा-बारा वर्षांपासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बिहारी मजूर कामांसाठी आले. यंदा द्राक्ष फळछाटणीसाठी जिल्ह्यात ३० हजारांवर मजूर काम करीत आहेत. त्यांना द्राक्षबाग कामाचे प्रशिक्षणही दिले जाते. कमी मजुरी, दिवसभर काम करण्याच्या क्षमतेमुळे जिल्ह्यातील पाच तालुक्यांत द्राक्षबागा बिहारी मजुरांच्या जोरावर जोपासल्या आहेत. 

१५० ते ५०० मजुरांसाठी एक मुकादम काम करतो. जिल्ह्यात द्राक्षबागांचे क्षेत्र सव्वा लाख एकरावर आहे. सर्वसाधारणपणे फळछाटणीच्या हंगामात एकराला एक मजूर लागतो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर स्थानिक मजूर मिळणे अवघड होत असल्यामुळे बिहारमधून प्रतिवर्षी येणाऱ्या मजुरांची नव्याने भरच पडत आहे. गेल्या सात आठ वर्षांपासून तर मजुरांचा आलेख वाढतोच आहे. यंदा मोजक्याच क्षेत्रावर द्राक्षबागांची नव्याने लागण झाली आहे. पाला काढणी, छाटणी, पिस्ट, खोड - ओलांडा बांधणे, काडी बांधणी , विरळणी,डिपिंग, खते टाकणे, थिनिंग आदी कामे मजुरांकडून ठरवून घेऊन केली जातात.

द्राक्षबागांमध्ये मजुरिचा कालावधी  हा एप्रिल, मे, जून,  सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये आहे. द्राक्षपट्ट्यातील तासगाव, मिरज, पलूस तालुक्यांत द्राक्षाचे क्षेत्र मोठे असल्याने येथे मजुरांची संख्या अधिक आहे. हे मजूर शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये राहतात. या तालुक्‍यानंतर सध्या कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्‍यांतही मजुरांना कामानिमित्त मागणी वाढली आहे. बिहारचे शेतमजूर शेतावरच शेतकऱ्यांच्या तयार केलेल्या शेडमध्ये राहतात. शेतमालकांकडून त्यांना शेडबरोबर वीज, पिण्याचे पाणी, स्वयंपाकासाठी गॅस द्यावा लागतो. हे मजूर ४-५ पासून २०-२५ मजुरांच्या संख्येने एका शेतकऱ्याकडे राहतात.

सर्वसाधारण चार-पाच  एकरांपासून २५ ते ३० एकरांसाठी २५ बिहारी काम करतात. तसेच स्वतः स्वयंपाक करून खातात. हंगामात स्थानिक पुरुष मजूर सकाळी आठ ते दुपारी तीन अशा सात तासांसाठी ४००, तर महिला ३०० रुपये घेतात. बिहारी मजूर स्थानिक मजुरांच्या तुलनेत थोडी कमी मजुरी म्हणजे ४०० रुपये घेऊन सकाळी आठ ते सायंकाळी पाचपर्यंत काम करतात, अनेक शेतकऱ्यांनी बिहारी 

मजुरांच्या टोळ्याच आणल्या आहेत, स्थानिक मजुरांपेक्षा एकरी १५ हजार रुपयांची बचत होते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या परवडते. 


No comments:

Post a Comment