Sunday, December 4, 2022

नूलमध्ये अभ्यासासाठी टीव्ही, मोबाईलला 'ब्रेक'


सांगली ,(जत न्यूज नेटवर्क)-

मोबाईल व टीव्हीच्या अतिरेकामुळे होणारे मुलांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील नूलमधील (ता. गडहिंग्लज) पालकांनी रोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत गावातील सर्व टीव्ही ब मोबाइल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सरपंच प्रियांका यादव यांच्या पुढाकाराने न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झालेल्या महिला पालक मेळाव्यात हा निर्धार केला आहे. यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहित्यांचे वडगाव आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकुरवाडी या गावांनीदेखील असा उपक्रम सुरू केला आहे. 

सरपंच यादव यांच्या पुढाकाराने प्राचार्य जे. डी. वडर यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा आयोजित केला होता. सरपंच यादव म्हणाल्या, “मुलांना जबाबदार नागरिक घडविण्यासाठी काही गोष्टींचे स्वातंत्र देण्याबरोबरच काही गोष्टींवर निर्बंधही घालावे लागतील. त्यासाठी रोज सायंकाळी ७ ते ८.३० या वेळेत सर्व पालकांनी आपल्या घरातील टीव्ही व मोबाईल बंद ठेवून मुलांचा अभ्यास घ्यावा. सरपंच यादव यांच्या या आवाहनाला सर्व महिलांनी हात उंचावून संमती देत ठराव केला. 

मुले तास-तास मोबाइलला चिकटून असतात. त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिकांत गुंतून जातात. या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या अभ्यासावर होतो.  दररोज नित्यनियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्यासाठी आठवण करून देण्यासाठी अनेक ग्रामपंचायतीवर लाऊडस्पीकर लावण्यात आला आहे. तसेच या वेळेत मुलं घराबाहेर पडणार नाहीत, याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आहे.  ठराविक वेळेत मोबाईल बंद करण्याच्या निर्णयाने विद्यार्थ्यांचा  स्क्रीन टाइम कमी होईल. सुरवातीला या प्रयोगाच्या  अंमलबजावणीत अडचणी येतील. पण त्यातून एक चांगला संस्कारही मुलांवर होईल, पुढे ही मुले स्वतःहून मोबाईल वापरणार नाहीत. 

No comments:

Post a Comment