Tuesday, October 18, 2022

'डॉल्फिन नेचर'तर्फे 19 लाखांवर बियांचे संकलन आणि वाटप


(मच्छिंद्र ऐनापुरे)

सांगली : पर्यावरण संरक्षणासाठी समाजातील विविध संस्था-व्यक्ती आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. त्यामध्ये सांगलीतील डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुप संस्थेने अविरत प्रयत्न कायम ठेवले आहेत. या संस्थेच्या अनेक उपक्रमांपैकी बिया संकलन आणि या बियाणांचे पश्‍चिम घाटात  रोपण हा उपक्रम वैशिष्टयपूर्ण असा आहे. तब्बल 20 वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. आत्तापर्यंत 19 लाखांवर बियाण्यांचे संकलन आणि वाटप झाले आहे. 

 देशी उपयुक्त झाडांच्या बियांचा रोपनिर्मितीसाठी, वनाच्छादनासाठी, तसेच भेट देऊन पर्यावरण संवर्धनात त्या-त्या वर्षी उपयोग केला गेला. पर्यावण अभ्यासक व 'डॉल्फिन'चे संस्थापक प्रा. शशिकांत ऐनापुरे यांनी 2003 मध्ये ही संकल्पना मांडली. 20 वर्षे स्पर्धेतून देशी उपयुक्‍त झाडांच्या बियांचे संकलन केले गेले. या दोन दशकात तब्बळ 19 लाखांवर बियांचे संकलन झाले. झाडावरून पडणाऱ्या बिया व फळे खाल्ल्यानंतर सहजपणे फेकून दिल्या जाणाऱ्या बिया पडून वाया जातात. त्यापासून फारशी रोप निर्मिती होत नाही.मात्र बिया व्यवस्थितपणे जमिनीत रुजवल्या तर रोपनिर्मिती, वृक्षानिर्मिती होऊ शकते. हे विद्यार्थी आणि सामान्य लोकांमध्ये रुजविण्याचे काम डॉल्फिन नेचर संस्थेने केले. 

2003 ते 2015 या कालावधीत 13 वर्षे सागरेश्वर या मानवनिर्मित सांगली जिल्ह्यातील अभयारण्यात बालोद्यान मनोऱ्याच्या पूर्वेस घळीत हजारो बिया दरवर्षी 'डॉल्फिन'तर्फे टोकण्यात आल्या. हरणांसाठी, तृणभक्षी प्राण्यांसाठी अन्न, वनाच्छादन वाढावे, या उद्देशाने हा प्रकल्प राबवला गेला. अनेक उपयुक्त झाडेही लावण्यात आली. 2016 पासून मिरजजवळीलदंडोबा डोंगर परिसरात तर 2018 पासून आटपाडी तालुक्यातील जकाई दरा खोऱ्यात बीजरोपणाचे कार्य 'डॉल्फिन' प्रतिवर्षी करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातल्या मजले येथेही गावालगतच्या डोंगराळ भागात लावलेली चिंच, बेल, शमीची झाडे आनंदाने बहरत आहेत. आळते वन उद्यान क्षेत्रातदेखील बिया टोकल्या आहेत. पेरणी करण्यापूर्वी काही बियाण्यांवर नैसर्गिक प्रक्रिया केली जाते. संकलित बिया राखेत मिसळून ठेवल्या जातात. स्थानिक बिया ज्या- त्या भागात टोकल्या जातात.

 शाळा- कॉलेज, सामाजिक संस्थांना बियांपासून बनवण्यात आलेले 'सिडबॉल' पुरवले जातात. वैयक्तिक भेटीसाठीही काही लोक बिया नेतात. संस्थेने 'सिडबँक' सुरू केली असून या माध्यमातून विद्यार्थ्यांना 'सिडबॉल' निर्मिती आणि रोपनिर्मितीचे कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. शालेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्यांमध्ये निसर्ग रक्षणाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्याद्वारे पर्यावरण संवर्धनाचे मोलाचे कार्य घडावे यासाठी बिया संकलन स्पर्धा आयोजित करण्यात येते. शाळकरी मुलांपर्यंत वृक्षलागवडीची ही मोहीम पोहोचवण्याचा भाग म्हणूनही ही स्पर्धा होत असते. विजेत्यांना बक्षीस आणि प्रमाणपत्र दिले जाते. चाळीस प्रकारच्या उपयुक्त अशा बियांचे संकलन होते. बेहडा, रिठा, चिंच, आवळा , बाभूळ, शमी, खैर, अंजन, बेल, आपटा, कडुलिंब, करंज, बहावा, काटेसावर आदी उपयुक्त बियांचे संकलन होते. डॉल्फिन नेचर रिसर्च ग्रुपचे संस्थापक डॉ. शशिकांत ऐनापुरे आणि सचिव पद्मजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कामकाज चालते.

No comments:

Post a Comment