Sunday, November 27, 2022

शेडयाळ गावात भरला चिमुकल्यांचा आठवडी बाजार


जत,( जत न्यूज नेटवर्क)-

 एरवी विद्यार्थ्यांना बाजाराचा कोणताही अनुभव मिळालेला नसतो. बाजार आणि मुले यांचा संबंध दूरच, परंतु हाच अनुभव शेडयाळ (ता. जत) येथील मुलांना प्रत्यक्ष बाजार भरवून मिळाला. त्यांना बाजारातून होणारी भाजीपाल्याची, फळांची, किराणा मालाची आर्थिक उलाढाल प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. यावेळी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुला-मुलींनी विविध प्रकारचा भाजीपाला, कडधान्ये, फळे आदींचा बाजार गावातल्या ग्रामपंचायतीच्या आवारात थाटला होता. यामुळे गावाला आठवडी बाजाराचे स्वरूप आले होते.

बाजारातून होणारी पैशांची देवाण घेवाण, भावातील कमी जास्त तफावत, मालाचा दर्जा आदी बाबी विद्यार्थ्यांनी समजून घेण्याबरोबर, भाजीपाला मालक व गिऱ्हाईक यांच्यात पैशांवरून होणारी घासाघीस, हमरीतुमरी, बाजारातील गर्दीचाही अनुभव घेतला.बाजार गावातच आल्याने विद्यार्थ्यांचे कुतूहल आणि उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

बाजारात कांदे, बटाटे, टोमॅटो, कोथिंबीर, मुळा, मूग, चवळी, अंडी, ऊस, नारळ, कडीपत्ता, आले, पालक, मिरची, लिंबू, दही, शेंगदाणे, हरभरा भाजी, कारले विविध प्रकारचा भाजीपाला उपलब्ध होता. दोन अडीच तासांच्या बाजारात 10 ते 12 हजार रुपयांची उलाढाल झाली. पहिल्या स्वकमाईचा आनंद यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. या उपक्रमाचे पालक आणि नागरिकांनी कौतुक केले. 

 बाजार भरविण्यासाठी मुख्याध्यापक  बाबासाहेब पांढरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कपिलदेव पारसे, गोपाळ बिराजदार, मनोहर जाधव, सुभाष मासाळ, विजय लिगाडे, अंकुश फाळके, श्री. मड्डी , श्रीमती गुगवाड , भरत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले. यासाठी पालक, ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीचे सहकार्य लाभले.



No comments:

Post a Comment