२५ वर्षापासुन जि. प. शाळांतील मुलींना दररोज एक रुपया उपस्थिती भत्ता
जत, (प्रतिनिधी)-
दारिद्र्यरेषेखालील तसेच आदिवासी क्षेत्राबाहेरील अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातीतील पहिली ते चौथी पर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रति विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन उपस्थिती भत्ता देण्यात येतो. गत २५ वर्षांपासून या प्रोत्साहन पर भत्त्यात सरकारने एका पैशाचीही वाढ केली नाही. सावित्रीबाई फुले यांच्या नावे सुरू केलेल्या योजनेतील प्रोत्साहन भत्ता वाढविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधी कडून होत नसल्याने विद्यार्थिनींचे नुकसान होत आहे.
जिल्हा परिषद शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी १९९२ ला तत्कालीन सरकारने प्रति विद्यार्थिनी एक रुपया प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय घेतला होता. मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाने ही योजना सुरू केली, परंतु २५ वर्षानंतरही सावित्रीच्या लेकींची एका रुपायावरच बोळवण केली जात आहे. आज महागाईने कळस गाठला असून शैक्षणिक साहित्याच्या किंमतीही मोठ्या वाढल्या आहेत. पेनमधील कांडीची किंमत एक रुपया पेक्षा जास्त आहे. तरीही आजपर्यंत कोणत्याच सरकारने विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला नाही. दारिद्र्यरेषेखालील अनुसूचित जाती जमातीतील पहिली ते चौथीच्या वर्गातील मुलींना उपस्थितीसाठी एक रुपया देण्यात येतो. सावित्रीबाई फुले यांच्या नावाने सुरू केलेल्या योजनेचे मागील वर्षी रैप्य महोत्सवी वर्ष होते. तेंव्हा ही भत्त्यात वाढ करण्याचे सरकारने विसरले. मुलींना आजही २५ वर्षांपूर्वी चा तेवढाच प्रोत्साहन भत्ता देण्याचा प्रकार म्हणजे तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार आहे. १९९२ पासून आजतागायत या प्रोत्साहन भत्त्यात कोणतीही वाढ झाली नसतांना हा रुपया देखील वेळेवर मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. सरकारने थट्टा थांबवावी अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे.
No comments:
Post a Comment