Friday, November 1, 2019

माडग्याळमधील वाहतूक कोंडी काही सुटेना

पोलीस चिरीमिरीत मश्गुल;ग्रामपंचायत प्रशासन सुस्त
जत,(प्रतिनिधी)-
पोलीस चिरीमिरीत गोळा करण्यात व्यस्त तर ग्रामपंचायत प्रशासन सुस्त असल्याने माडग्याळच्या आठवडी बाजारासह अन्य दिवशी जत-उमदी रस्त्यावरची वाहतूक कोंडी काही फुटेना.त्यामुळे प्रवाशांना आणि ग्रामस्थांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. राज्यात अशा प्रकारची वाहतूक कोंडी  कुठेच होत नसल्याचे सांगितले जात आहे.

    जत-उमदी हा राज्य मार्ग असून या मार्गावरच जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेले माडग्याळ गाव वसलेले आहे. राज्य मार्ग असल्याने साहजिकच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. माडग्याळी बोर आणि माडग्याळीसाठी राज्यभरात प्रसिध्द असलेल्या या गावात पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे कायम वाहतूक कोंडी होत असते. काही दिवसांपर्यंत माडग्याळ चा भाजीपाला बाजारही रस्त्यावरच भरत होता,मात्र उमदी पोलीस उपनिरीक्षक यांच्या प्रयत्नांमुळे बाजार अंकलगी मार्गाकडे हलविण्यात आला. त्यामुळे मार्ग वाहतुकीला मोकळा झाला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे ही वाहतूक कोंडी काही कमी झालेली नाही. माडग्याळ बाजारादिवशी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.
माडग्याळला पोलीस औट पोस्ट असले तरी ते कायमच बंद अवस्थेत असते. इथे नेमलेले पोलीस कर्मचारी चिरीमिरी गोळा करण्यासाठी इकडेतिकडे सतत भटकत असतात. त्यामुळे गावातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुणीच उपस्थित नसते. दर शुक्रवारी माडग्याळ चा आठवडी भाजीपाला आणि जनावरांचा बाजार भरत असतो. जनावरांच्या बाजारादिवशी सांगली,कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा, अथणी,विजापूर, इंडी या भागातील व्यापारी जनावरे खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या वाहनांकडून हफ्ते वसुली करण्यात पोलीस गुंतलेले असतात. याचा फटका ग्राहक आणि प्रवाशांना बसतो. तासंतास या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. यामुळे प्रवाशांचा यात विनाकारण वेळ वाया जातो. राज्यात अशा प्रकारे राज्य मार्गावर  वाहतूक कोंडी कुठेच होत नाही, असे प्रवाशी सांगतात.
पोलीस कर्मचाऱ्यांची बदली करा
आपले कर्तव्य न बजावता वाहनधारकांकडून चिरीमिरी गोळा करण्यात व्यस्त असलेल्या माडग्याळ औट पोस्टच्या पोलीस कर्मचाऱ्यांची या ठिकाणाहून बदली करण्याची मागणी लोकांमधून होत आहे. या ठिकाणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांच्या नेमणुका असल्याचे सांगण्यात आले. सतत याच ठिकाणी पोस्टिंग असलेल्या या कर्मचाऱ्यांचा चिरीमिरी गोळा करण्यातच अधिक वेळ जात असल्याने कर्तव्यच बाजूला पडले आहे. त्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करा, अशी मागणी होत आहे.
बायपास रस्त्यासाठी प्रयत्न करण्याची गरज
जत-उमदी राज्य मार्ग असल्याने या मार्गावर वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. हा मार्ग माडग्याळ गावातूनच जात असल्याने याठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होत असते. याची कल्पना लोकप्रतिनिधी आणि बांधकाम विभागाला असली तरी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी बायपास रस्त्याचे नियोजन करण्याचा प्रयत्न अजिबात झाला नाही. त्यामुळे सतत प्रवाशांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. नवनिर्वाचित आमदार विक्रमसिंह सावंत यांनी तरी आता याकडे लक्ष द्यावे आणि वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करावा, अशी मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment