Sunday, November 10, 2019

...अखेर माडग्याळ बाजारातील वाहतूकीची कोंडी फुटली; प्रवाशांकडून समाधान

पोलिसांनी लावली शिस्त
माडग्याळ,(वार्ताहर)-
महाराष्ट्र राज्यात शेळ्या-मेंढ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जत तालुक्यातील माडग्याळ येथे  दर शुक्रवारी भरणाऱ्या  आठवडी बाजारात जत-चडचण या राज्य महामार्गावर होणारी वाहतुकीची  सततची कोंडी सोडवण्यात  अखेर माडग्याळ  औट पोस्टच्या पोलिसांना यश आले आहे.तरुणभारतमधून याबाबत बातमी प्रसिद्ध होताच पोलिसांना लागलीच जाग आली. गेल्या  आठवडी बाजरी हवालदार बसवराज कोष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि होमगार्ड यांनी बेशिस्तपणे गाड्या लावून जाणाऱ्या चालकांना शिस्त लावली. वाहतूक सुरळीत केली. बाजारातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.लांब पल्ल्याच्या जाणाऱ्या-येणाऱ्या एसटी बसेस आणि इतर गाड्या वेगाने जात होत्या. त्यामुळे प्रवाशी वर्गातुन समाधान व्यक्त केले जात होते.

माडग्याळ आठवडी बाजारा दिवशी नेमणुकीवर असलेले पोलीस चिरीमिरीत गोळा करण्यात व्यस्त असल्याने माडग्याळच्या आठवडी बाजारासह अन्य दिवशी जत-उमदी रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या दुतर्फा बेशिस्तपणे लहान-मोठी  वाहने लावलेली असायची त्यामुळे सतत वाहतूक कोंडी होत असे. याचा प्रवाशांना आणि ग्रामस्थांना हकनाक त्रासाला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशी वर्गातून संताप व्यक्त होत असे. अन्य बाजाराच्या ठिकाणी अशा प्रकारची वाहतूक कोंडी  कुठेच होत नसल्याचे प्रवाशी सांगायचे.याबाबत दैनिक तरुणभारत मधून बातमी प्रसिद्ध होताच माडग्याळ आणि उमदी पोलिसांनी गंभीर दखल घेत गेल्या  बाजरी वाहतूक सुरळीत करण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
जत-उमदी हा राज्य महामार्ग असून या मार्गावरच जनावरांच्या बाजारासाठी प्रसिध्द असलेले माडग्याळ गाव वसलेले आहे. राज्य मार्ग असल्याने साहजिकच वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात होत असते. माडग्याळी बोर आणि माडग्याळीमेंढीसाठी राज्यभरात प्रसिध्द असलेल्या या गावात पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे कायम वाहतूक कोंडी होत असते. काही दिवसांपर्यंत माडग्याळचा भाजीपाला बाजारही रस्त्यावरच भरत होता,मात्र उमदीचे पोलीस सहाय्यक निरीक्षक दत्तात्रय कोळेकर यांच्या प्रयत्नांमुळे बाजार अंकलगी-कुलाळवाडी मार्गाकडे हलविण्यात आला होता. त्यामुळे मार्ग वाहतुकीला मोकळा झाला असला तरी नियोजनाच्या अभावामुळे ही वाहतूक कोंडी काही कमी व्हायचे नाव नसे. परिस्थिती जैसे थेच राहायचे. माडग्याळ बाजारादिवशी  नेमणुकीवर असलेल्या पोलिसांच्या दुर्लक्षामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.याला नेमणुकीवर असलेले पोलीसालाच जबाबदार धरले जायचे.
माडग्याळला पोलीस औट पोस्ट असले तरी ते कायमच बंद अवस्थेत असते. इथे नेमलेले पोलीस कर्मचारी मोठया प्रमाणात आलेल्या वाहनधारक आणि अवैध व्यावसायिकांकडून चिरीमिरी गोळा करण्यासाठी इकडेतिकडे सतत भटकत असतात. त्यामुळे  शुक्रवार बाजारादिवशी गावातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी कुणीच उपस्थित नसते. दर शुक्रवारी माडग्याळ चा आठवडी भाजीपाला आणि जनावरांचा बाजार भरत असतो. जनावरांच्या बाजारादिवशी सांगली,कोल्हापूर, इस्लामपूर, कराड, सातारा,चडचण अथणी,विजापूर, इंडी  सोलापुर या भागातील व्यापारी जनावरे व कोंबड्या खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे या वाहनांकडून हफ्ते वसुली करण्यात पोलीस गुंतलेले असतात. याचा फटका ग्राहक आणि प्रवाशांना बसतो. तासंतास या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असते. यामुळे प्रवाशांचा यात विनाकारण वेळ वाया जातो. राज्यात अशा प्रकारे राज्य मार्गावर  वाहतूक कोंडी कुठेच होत नाही, असे प्रवाशी वर्गाकडून बोलले जात होते.

No comments:

Post a Comment