Friday, November 1, 2019

बदलत्या जीवनशैलीमुळे वयोमानात घट

जत,(प्रतिनिधी)-
बदललेली जीवनशैली तसेच धकाधकीच्या जीवनात मानवाचे आपल्या आरोग्याकडे लक्ष नसल्याने वयोमान घटत चालले आहे. धकाधकीचे जीवन, फास्ट फूडसह दूषित वातावरणाचा परिणाम शारीरिक कवायतींच्या अभावामुळे सद्याच्या पिढीच्या वयोमानामध्ये घट होऊन त्यांचे आयुर्मान 60 ते 65 वर्षांवर आले आहे. दोन दशकांपूर्वीची पिढी आपल्या आरोग्याबाबत जागरूक असायची. त्याचप्रमाणे सदरची पिढी र्शमदानामध्ये स्वत:ला झोकून देत असे. त्यामुळे त्या पिढीचे आयुष्यमान 80 ते 90 वर्षांपर्यंत राहत होते. त्यावेळी मिळणारा सकस आहार आज मिळत नाही. धावपळीच्या युगामध्ये दिवसरात्र पळावे लागत असल्याने आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे.
तंत्रज्ञानाच्या युगात विविध मशिनरी उपलब्ध झाल्याने कष्टाची कामे क्वचित करावी लागत आहे. तसेच दिवस-रात्र कामधंद्यात गुंतल्याने शरीराला आराम व मनाला शांती मिळत नसल्याने अनेकांच्या जीवनशैलीवर परिणाम जाणवत आहे.
पूर्वीची पिढी शारीरिक कवायतींसह मॉर्निंग वॉक, धावणे, ज्वारी, नाचणी, बाजरी, तांदूळ यांच्यासह विविध कडधान्यांचा योग्य पोषण तसेच आरोग्याकडे विशेष लक्ष देत होती. सद्याच्या पिढीला ज्वारी, बाजरी आदिंची बनवलेली भाकरी व कडधान्याच्या क्वचितच आस्वाद घेता येतो. बदलत्या युगानुसार खाद्य पदार्थांमध्ये बदल झाला असून, आजची तरुण पिढी फास्ट फूड, चाईनीज यासारख्या पदार्थांच्या आहारी गेल्याने या तरुण पिढीची भूक क्षणीकच भागत असते. त्याचप्रमाणे कामाच्या ठिकाणी बसून काम करावे लागत असल्याने स्थूलपणा मोठय़ा प्रमाणावर वाढलेला दिसून येतो.
गेल्या काही वर्षांपासून खाद्यपदार्थांमध्ये वातावरणातील बदलही शरीरावर जाणवू लागले आहेत. हवेच्या प्रदुषणामुळे शरीरावर वाईट परिणाम होत आहे. अनेक तरुण क्रीडा क्षेत्रापासून दूर गेल्याने विविध आजारांनाही सामोरे गेले आहे. त्यातच सद्याच्या पिढीतील 90 टक्के पिढी व्यसनाधिनतेच्या आहारी गेल्याने त्याचाही परिणाम जीवनशैलीवर दिसून येत आहे. पूर्वीच्या काळी घरातून रोजच न्याहारीसाठी ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी न्यायचे. मात्र, सद्याची पिढी सकाळच्या न्याहारीसाठी फास्टफुडला पसंती देते. त्यामुळे शरीराला मिळणारे जीवनसत्वही अपुरे पडत आहे, असे ज्येष्ठ नागरिकांसह वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
वैद्यकीय अधिकार्‍यांनी तरुण पिढीची वाटचाल बदलत चालल्याने तसेच शारीरिक हालचाल, पोषक आहाराअभावी त्यांचे होणारे दुर्लक्ष, त्यांचे वयोमान कमी होत आहे. सद्याच्या पिढीने सात्विक आहारासह शारीरिक कसरतही केल्यास आयुर्मानात वाढ होण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment