Friday, November 1, 2019

बोकडाचे मटण झाले 520 रुपये किलो


दर आणखी वाढण्याची शक्यता; कातड्याला दर नाही
जत,(प्रतिनिधी)-
बोकड्याच्या कातड्याची विक्री होत नसल्याने मटणाचा व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसायात फायदा पडत नसल्याने बोकडाच्या मटणाच्या दरात तब्बल 40 रुपयांची वाढ केल्याने मटणाचा दर किलोला 520 रुपये झाला आहे. त्यामुळे मांसाहार करणाऱ्या खवय्यांची पंचाईत झाली असून नाईलाजाने त्यांचा ओढा बॉयलर चिकनकडे वाढला आहे. खवय्यांना दुधाची तहान ताकावर भागावण्याची वेळ आली आहे.

मटण तोडण्याचा धंदा परवडत नसल्याचे कारण सांगून मटण व्यावसायिकांनी गेल्या दोन वर्षांपासून सलग किलोमागे 40 रुपये मटणाचा दर वाढवला आहे. दसऱ्याच्या अगोदर मटणाचा दर 480 रुपये किलो होता. आता त्यात आणखी 40 रुपयाने वाढ केल्याने मटणाचा दर 520 रुपये झाला आहे. यामुळे मटणावर ताव मारणाऱ्या खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. मटणाचा दर भडकला असताना बॉयलर कोंबडीच्या चिकनचा दर मात्र 160 रुपये किलोच्या आसपास असल्याने खवय्यांचा ओढा आता चिकनकडे वाढला आहे. मटणाचे दर वाढल्याने खवय्यांना आपल्या आवडीला आवर घालावा तर लागलाच आहे,पण घरी पाहुणे म्हणून आलेल्या लोकांना आता चिकनचा रस्सा खाऊ घातला जात आहे.
मटण व्यावसायिक आठ ते नऊ किलो वजनाचे बोकड कापत असतात. याचे मटण रुचकर लागते. बोकडाचे वय वाढेल तसे त्याच्या मटणाला एक प्रकारचा वास यायला लागतो. तसेच मटण शिजायलाही वेळ लागतो. त्यामुळे ग्राहक असे मटण स्वीकारत नाहीत. साहजिकच मटण व्यवसाय करणाऱयांना साधारण आठ-नऊ किलो दरम्यान वजन असलेली बोकडे कापावी लागतात.नाहीतर गिऱ्हाईक  येत नाहीत,असे एका विक्रेत्याने सांगितले.विक्रेता म्हणाला की, कातडी घेणाऱ्या कंपन्या  कातडी घेत नसल्याने व्यापाऱ्यांनीही माल घ्यायचा बंद केला आहे. जीएसटी व अन्य कारणाने या धंद्यात मंदी आली आहे,ती कायमच राहिली आहे. त्यामुळे पूर्वी 100 ते 150 रुपयांना जाणारी कातडी आज व्यापारी 20 रुपयेलासुद्धा घेत नाहीत. शेवटी कातडी फेकून द्यावी लागत आहेत.मटण व्यवसाय करणे आता आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. साहजिकच मटणाचे दर वाढवावे लागत आहेत.
बोकडांचा तुटवडा
सध्या बोकडांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे. मागील खेपेला मोठा दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांनी जनावरे विकून टाकली होती. त्यातच आंध्रप्रदेश मधील व्यापारी येऊन बोकडांची खरेदी करत असल्याने बोकडांची पिल्ली मिळेनाशी झाली आहेत. त्यामुळे धंदा कमी झाला आहे,असेही मटण विक्रेत्यांनी सांगितले.
मटणाची तहान चिकनवर
या सगळ्यांत मटण खाणाऱ्या खवय्यांची मोठी पंचाईत झाली आहे. मटणाचे दर वाढल्याने आणि मटणाचा तुटवडा जाणवत असल्याने त्यांना बॉयलर कोंबडीच्या चिकनवर समाधान मानावे लागत आहे. सध्या चिकनचा दर किलो मागे 160 ते 180 रुपये किलो आहे. हा दरही अथणी,कवठेमहांकाळ, विटा, खानापूरपेक्षा अधिक आहे. जत तालुक्यात पोल्ट्री व्यवसाय नसल्याने इथल्या चिकन विक्रेत्यांना जादा दराने कोंबड्यांची खरेदी करावी लागत आहे.

No comments:

Post a Comment