नागपूर शहरातील वाढत्या अपराधावर चिंता व्यक्त होत असताना, शहरात एका २४ वर्षांच्या तरुणीवर तिचा मित्र व मित्राच्या भावाने बळजबरी अत्याचार केल्याची घटना पुढे आली आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने तरुणीला घरी बोलावून तिच्या मित्राने व त्याच्या लहान भावाने एकाच दिवशी वारंवार अत्याचार केले. आरोपीच्या कुटुंबीयांनीही आरोपींची साथ दिली. तरुणीचे अश्लील फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिला लग्नासाठी देखील बळजबरी करण्यात आली. यानंतरही पीडितेवर अत्याचार करण्यात आले. मुकेश राऊत असे आरोपीचे नाव असून, आरोपात साथ देणार्या आरोपीचा मोठा भाऊ आणि लहाण भावाला पोलिसांनी अटक केली आहे. तर तीन आरोपी अद्याप फरार आहेत.
प्राप्त माहितीनुसार, पीडित २४ वर्षीय मुलीची १३ ऑगस्ट ते २१ सप्टेंबर दरम्यान आरोपीशी सोशल मीडियावर ओळख झाली. ओळख मित्रत्वात बदलली आणि संबंध आणखी दृढ होत गेले. आरोपीच्या मनात त्याच्या मैत्रिणीबाबत विचार वेगळेच होते. आरोपीने पीडित मुलीला वाढदिवसाच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावून घेतले. मित्राचा वाढदिवस म्हणून ती आनंदाने तितक्याच विश्वासाने त्याच्या घरी जायला तयारही झाली. आरोपी मुकेशने तिला संत तुकडोजीनगर येथील एका घरी नेले. याठिकाणी तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी अत्याचार केला. या प्रकारामुळे घाबरलेल्या आणि जखमी झालेल्या या तरुणीला सावरण्याची संधीसुद्धा मिळाली नाही. आरोपी इतक्यातच थांबला नाही. त्याने त्याच्या लहान भावालाही बोलावून घेतले होते. त्यानेही पीडितेसोबत भयंकर पद्धतीने अत्याचार केला. मोबाईलवर तिचे अश्लील फोटोदेखील काढले. काढलेले फोटो सोशल मीडियावर वायरल करण्याची धमकी देऊन तिला भयंकर यातनाही दिल्या. या प्रकारामुळे अवसान गळालेल्या मुलीला त्याचदिवशी सायंकाळी मुकेशच्या वहिनीने फोन करून धमकावून घरी बोलाविले. पीडित मुलगी बदनामीच्या धाकाने आरोपीच्या घरी गेली. यानंतर आरोपी मुकेशची आई, वडील, वहिनी आणि मोठय़ा भावाने तिला आरोपी मुकेशसोबत लग्न करण्यास बळजबरी केली. नाही लग्न केल्यास तुला विकून टाकू, अशी धमकी दिली. पीडिताने आरोपी मुकेशसोबत लग्नास विरोध केला. पीडितेचा विरोध बघून आरोपीने मुकेशने तिला स्वत:च्या घरातील खोलीत नेऊन संपूर्ण कुटुंबीयांच्या संमतीने तिच्यावर पुन्हा अत्याचार केला. एकाच दिवशी दोन भावांनी तीन वेळा अत्याचार केल्यामुळे मुलगी पूर्णपणे हादरली होती.
मुकेश आणि त्याच्या लहान भावाने तिच्यावर अत्याचार केला तर मोठय़ा भावानेही तिचा विनयभंग केला. या प्रकारामुळे गलीतगात्र झालेल्या मुलीने बदनामीच्या भीतीने आणि अस्वस्थ शरीराने कसेबसे घर गाठले. काही दिवसांपूर्वी तिला पुन्हा आरोपी मुकेशने फोन करून मोबाईलमधील फोटो डिलीट करण्याच्या बहाण्याने भेटायला बोलविले. पीडितेने येण्यास नकार देताच त्याने फोटो वायरल करण्याची धमकी देऊन तिला हिंगणा मार्गावरील 'आयो कंपनी टायअप' असलेल्या हॉटेलमध्ये बोलावून चाकूचा धाक दाखवून पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. या संपूर्ण प्रकारामुळे भयभीत झालेल्या मुलीने अखेर प्रतापनगर पोलिस ठाण्यात आरोपी आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध तक्रार नोंदविली. याप्रकरणात मुकेश राऊत आणि त्याच्या दोन आरोपी भावांना अटक करण्यात आली आहे, तर मुकेश राऊतचे आई, वडील आणि वहिनी फरार झाले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
No comments:
Post a Comment