Thursday, February 11, 2016

लव्ह अथवा अरेंज मॅरेजचे घटस्फोटाला नाही वावडे
जत,(बातमीदार):जोडप्यांचे घटस्फोट होण्यामध्ये 'लव्ह मॅरेज' किंवा 'अरेंज मॅरेज'असा कोणताही भेद आता उरलेला नाही. याउलट तंत्रज्ञान तसेच कम्युनिकेशनच्या वाढलेल्या विविध साधनांमुळे जोडप्यांमधील संवाद कमी झाला असून, दुरावा वाढण्याचे व घटस्फोटापर्यंत जाण्याचे हे मुख्य कारण असल्याचे मत कौटुंबिक खटल्यांमध्ये काम करणार्‍या विधिज्ञांनी व्यक्त केले. मुळात, अद्यापही आपल्या समाजात, अरेंज मॅरेज करणार्‍यांचे प्रमाण अधिक असल्याने घटस्फोटाच्या प्रमाणाची तुलना करणे अवघड असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
काही वर्षांपूर्वी महिलांना आपल्यावर होणार्‍या अन्यायाविषयीची जाण नव्हती. जाणीव झाल्यानंतरही कायद्याबाबत अनभिज्ञता होती. त्यामुळे बहुतांश वेळा अरेंज मॅरेजमधील स्त्रिया तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत होत्या. तसेच, अनेकदा लव्ह मॅरेजमध्येच घटस्फोट घडतात, अशी धारणाही प्रचलित झालेली होती. मात्र, गेल्या काही वर्षांत हे चित्र वेगळेच झाले असून, घटस्फोटामध्ये लव्ह मॅरेजमधील असमंजसपणा हे कारण हळूहळू कमी झाल्याचे दिसत आहे. या उलट अरेंज किंवा लव्ह मॅरेज असे वावडे घटस्फोट घेणार्‍या जोडप्यांना नसल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे कायदेतज्ज्ञांचे मत आहे. 
स्त्रिया सुशिक्षित व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झाल्याने आपल्यावर अन्याय होत असल्यास त्याविरोधात पाऊल उचलण्याचे धैर्य त्यांच्यात दिसत आहे. त्याचबरोबर वाढत्या कम्युनिकेशनच्या जमान्यात जोडप्यांतील हरवलेला संवाद, अवास्तव अपेक्षा आणि नव्याने समोर येत असणारे 'एक्स्टा मॅरेटल अफेअर' ही कारणे असल्याचे दिसत आहे. त्यामुळे फक्त लव्ह मॅरेजमध्येच घटस्फोटाचे प्रमाण आहे किंवा अँरेंज मॅरेजमध्ये असा भेदाभेद उरला नसल्याचे कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. लव्ह मॅरेजमध्ये असणारा उथळपणा यामुळेही घटस्फोटाचे त्यात प्रमाण अधिक आहे. अरेंज मॅरेजमध्ये कुटुंबीयांची संमती असते. त्यामुळे पती-पत्नी सहजासहजी घटस्फोटासाठी राजी होत नाहीत. मात्र, लव्ह मॅरेज करताना आणि मोडताना अशा दोन्ही वेळेस मुले आपल्या कुटुंबीयांचे ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात.

मुरगूडच्या बाजारपेठेत जतची हलगी कडाडली
जत,(बातमीदार): मुरगूड (ता. कागल) येथील सुपरहिट तरुण मंडळाच्यावतीने गणेश जयंतीनिमित्त आयोजित हलगी वादन स्पर्धेत जतच्या सागर माने यांनी पारंपरिक पद्धतीने हालगी वाजवून मुरगूडकरांची मने जिंकली. 
तब्बल चार तासांहून अधिक काळ येथील बाजार पेठेतील गणेश मंदिराच्या प्रांगणात हलगीचा आवाज घुमला या स्पर्धेमध्ये कोल्हापूर राजारामपुरी येथील वैभव साठे याला द्वितीय, मळगे बुद्रूक येथील सुमित वाईंगडे याला तृतीय, तर कुरुंदवाडच्या रणवीर आवळे याला उत्तेजणार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले. 

इयत्ता सहावीच्या अभ्यासक्रमात संस्कृत विषय
जत,(बातमीदार):संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त असूनही या भाषेला शालेय अभ्यासक्रमांत म्हणावे तेवढे महत्त्व दिलेले नाही. सध्या राज्य शासनाच्या भाषा अभ्यासक्रमात इयत्ता आठवीपासून संस्कृत शिकविले जाते. तथापि, त्याही अगोदरच्या इयत्तांपासून संस्कृत शिकवावे, अशी मागणी संस्कृतप्रेमी व शिक्षक करीत आहेत. शासनाच्या संस्था एन.सी.ई.आर.टी., विद्यापरिषद व शिक्षण विभाग याबाबत सकारात्मक असून, येत्या शैक्षणिक वर्षापासून केवळ तोंडी स्वरूपात इयत्ता सहावीपासून ही भाषा सुरू करण्यासाठी अंतिम आराखडा तयार करीत आहेत. 
राज्यात सध्या त्रिभाषा सूत्रानुसार अभ्यासक्रमाची रचना आहे. त्यामध्ये आठवीपासूनच हिंदी विषयाला पर्याय म्हणून संस्कृत विषय अभ्यासक्रमामध्ये आहे. त्याचवेळी सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून संस्कृत हा विषय आहे. त्याला पालकांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे असतो. शिवाय अन्य राज्यांमध्ये देखील संस्कृत विषयाचे अध्यापन काही ठिकाणी प्राथमिक व उच्च प्राथमिक वर्गापासून केले जाते; पण महाराष्ट्रात आठवीपासून संस्कृतचा श्रीगणेशा होतो. त्याऐवजी पाचवीपासून संस्कृत विषय असावा, अशी मागणी गेली अनेक वर्षे होत आहे. 
२0१२ मध्ये तत्कालीन आघाडी सरकारने सहावीपासून संस्कृत सुरू करण्यासाठी आराखडा व अभ्यासक्रम तयार करून घेतले; परंतु राजकीय दबावामुळे त्याला मूर्त रूप येऊ शकले नाही. आता चार वर्षांनंतर पुन्हा सहावीपासून तोंडी स्वरूपातच असेना, पण संस्कृत भाषा अभ्यासक्रमात समाविष्ट होणार आहे.


मागासवर्गीयांच्या योजना बनल्या कुरण!
जत,(बातमीदार):मागासवर्गीयांसाठी असलेल्या योजना म्हणजे कुरण झाले असून, अनेक योजनांचा निधी इतर कामांकडे वळवून अनेकांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. तालुक्यात ही अनेक ठिकाणी असे प्रकार घडले असून, संबंधित अधिकार्‍यांवर अँट्रॉसिटी अँक्टखाली गुन्हा दाखल झाल्याची जिल्ह्यात एकही घटना नाही.
मागासवर्गीयांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक उत्तम योजना कार्यान्वित केल्या आहेत. मात्र, त्यासाठी संबंधित यंत्रणेकडून त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रशासकीय यंत्रणेकडून याबाबत मोठय़ा प्रमाणावर उदासीनता दिसून येत आहे. तालुक्यात मागासवर्गीयांच्या अनेक योजनांमध्ये हलगर्जीपणा झाला आहे. यासाठी गेली कित्येक वर्षे आम्ही जिल्ह्यात सर्व्हे करून अनेक बाबी जिल्हा प्रशासनासमोर वारंवार मांडल्या आहेत. मात्र, त्यांच्यामध्येच अंमलबजावणीबाबत उदासीनता असल्याने याबाबत कोणतीच कारवाई होत नाही.


डाळिंब सौदा: दोन महिन्यात सुमारे चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल

जत,(बातमीदार):येथील श्रीमंत विजयसिंह डफळे दुय्यम बाजार आवार समितीत नव्यानेच सुरू करण्यात आलेल्या डाळिंब सौद्याच्या माध्यमातून मागील दोन महिन्यात सुमारे चार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. यापुढील काळातही यामध्ये वाढ होत राहणार असल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष पाटील यांनी दिली.
येथील डाळिंब सौद्याचा प्रारंभ ४ डिसेंबर २0१५ रोजी करण्यात आला. मागील दोन महिन्यात त्यामध्ये वाढ होत आहे. भगवा, आरक्त, गणेश या जातीची डाळिंबे येथे विक्रीसाठी येत आहेत. सांगोला, अथणी, तिकोटा, चडचण, कवठेमहांकाळ व संपूर्ण जत तालुका आणि कर्नाटक सीमाभागातील शेतकरी येथे डाळिंबे विक्रीसाठी येत आहेत. ८0 रुपयांपासून १२0 रुपये प्रति किलो भाव शेतकर्‍यांना मिळत आहे. आठवड्यातून बुधवार, शुक्रवार, रविवार असे तीन दिवस सौदा केला जात आहे. कमी वाहतूक खर्च, जादा दर व रोख पैसे मिळत असल्यामुळे दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना त्याचा फायदा होऊ लागला आहे.
बाजार समितीने नव्यानेच येथे डाळिंब सौदा सुरू केला होता. व्यापारी आणि शेतकरी याकडे आकर्षित व्हावा म्हणून बाजार समितीने त्यांना मोफत जागा उपलब्ध करून देऊन निवासस्थान, पाणी, वीज आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.
याशिवाय या व्यापार्‍यांकडून सेस घेतला नाही. यापुढील काळात प्रति शेकडा ८५ पैसेप्रमाणे व्यापार्‍यांकडून बाजार समिती सेस घेणार आहे. या उत्पन्नातून त्यांना आवश्यक असणार्‍या सुविधा उपलब्ध करून देऊन जत बाजार समिती आर्थिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही संतोष पाटील यांनी यावेळी सांगितले.
सध्या डाळिंब सौदा शेतकरी भवन परिसरात होत आहे. तेथील जागा अपुरी पडत आहे. भविष्यातील विचार करून स्वतंत्र पत्राशेड, बांधकाम तयार करून तेथे सौदा सुरू करण्याचा प्रस्ताव आम्ही तयार केला आहे.. जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत, देयगोंडा बिरादार, रामगोंडा संती यावेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment