Wednesday, February 17, 2016

लोकसहभागातून ग्रामविकास शक्य



 जत,(बातमीदार):ग्रामीण भागात लोकसहभागातून ग्रामविकासाची संकल्पना यशस्वी होणे शक्य आहे. त्यासाठी गावागावांमध्ये प्रभावीपणे लोकसहभाग वाढविण्याची गरज आहे. विशेषत: भावी नागरिक असणार्या विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग वाढणे अपेक्षित आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नागरिक आहेत. त्यामुळे हे विद्यार्थी लहानपणापासूनच गावच्या परिपूर्ण विकासासाठी योगदान देतील. परिणामी भावी आयुष्यात देखील हे विद्यार्थी गावाचे गावपण विसरणार नाही. त्यातून खेड्याकडे चला ही चळवळ पुन्हा जोर धरेल. आधुनिक रहाणीमानाच्या हव्यासातून गावचे हरवलेले गावपण परत मिळविण्याची गरज निर्माण झाली आहे. आधुनिक रहाणीमानातून सध्या सर्वत्रच गावचे गावपण कमी होत चालले आहे. त्यातून पर्यावरणाला धक्का पोहोचला आहे. प्लॅस्टिक प्रदूषण ही समस्या केवळ शहरापुरती र्मयादित राहिलेली नाही. ग्रामीण भागातही प्लॅस्टिकचा कचरा वाढला आहे. ग्रामपंचायतींनी याबाबत ठराव करून प्लॅस्टिक मुक्त गाव संकल्पना राबवावी.
 ग्रामपंचायतीने कापडी पिशव्या शालेय विद्यार्थ्यांना द्याव्यात. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वत:च्या घरातील प्लॅस्टिक कचरा आठवड्यातून 1 दिवस शाळेत जमा करावा. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या सहभागातून या कचर्याची विल्हेवाट लावावी. त्यामुळे प्लॅस्टिकमुक्त गाव ही संकल्पना यशस्वी होईल. ग्रामस्वच्छता अभियानात सातत्य ठेवावे. सांडपाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी शोष खड्डयांचा वापर करावा. शासन विविध योजना राबविण्यासाठी अनुदान देत आहे. त्याची गावच्या कारभार्यांनी माहिती घेऊन पुढे यावे. एकूणच लोकसहभाग, विद्यार्थ्यांचा सहभाग भावी काळात आवश्यक बनला आहे. घरोघरी असणार्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ग्रामविकासाची चळवळ अधिक मजबूत होईल. यामध्ये शंका नाही.

 टँकरसाठीही पाणी मिळत नसल्याने प्रशासनासमोर अडचणी
 जत,(बातमीदार):तालुक्यातील मोठया प्रमाणावर पाणीटंचाईचे सावट उभे आहे. टँकरसाठीही पाणी मिळत नसल्याने प्रशासनासमोरील अडचणींमध्ये वाढ झाली आहे. तालुक्यातील दुष्काळी गावांना उन्हाळ्याच्या तोंडावर पाणी उपलब्ध करून देताना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागणार आहे. पाणी नसल्याने नवीन उद्भव शोधताना प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार आहे.
 येथील परिस्थिती मराठवाडा, विदर्भासारखीच दुष्काळी आहे. मागील चार ते पाच वर्षांपासून ही तीव्रता वाढत आहे. सततच्या पाणीटंचाईमुळे येथील शेती संकटात आहेच; परंतु येथील जनजीवनावरही याचे गंभीर परिणाम आता दिसून येत आहेत. तालुक्याच्या पाण्याबरोबरच जनावरांच्या चारा डेपोची मागणी होत आहे. जवळपास दीड लाखाहून अधिक जनावरांसाठी चारा उपलब्ध करण्याचे प्रशासनापुढे आव्हान आहे.
 तालुक्याच्या तप्त उन्हामुळे विहिरी आटल्या आहेत. यामुळे वाड्यावस्त्यांवर टँकरची मागणी वाढू लागली आहे. जनावरांचे पाणी व चार्‍याअभावी बिकट हाल होत आहेत. यंदा पावसाअभावी कडबा शेतकर्‍यांना कमी झाला आहे. यामुळे चारा डेपो सुरू करण्याची मागणी आहे.


 गरिबाच्या फ्रीजला वाढली मागणी
 जत,(बातमीदार): अत्याधुनिक सुविधा असलेला, महागड्या किमतीचा फ्रीज जरी घरी असला, तरी फ्रीजमधील थंड पाण्याची चव व मातीच्या भांड्यात थंड झालेल्या पाण्याची नैसर्गिक चव वेगळीच असते. त्यामुळे नागरिकांचा कल मातीचे माठ खरेदी करण्याकडे वाढला आहे. मंगळवार आणि गुरूवारच्या बाजारात माठ उपलब्ध झाले आहेत.बाजारात साधे माठ 150 रुपयांपासून ते नळ जोडलेले माठ 240 रुपये किमतीला उपलब्ध आहेत.

 डासांच्या त्रासामुळे जतकर हैराण
 जत,(बातमीदार): जत शहरात  डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांच्या उपद्रवामुळे नागरिक त्रस्त असून, त्यावर पालिकेकडून कोणतीही उपाययोजना होत नसल्याचे कॉंग्रेस सेवादलाचे मोहन माने-पाटील यांनी पालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. औषध फवारणी करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे.

 पर्यावरण वाचविण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
 जत,(बातमीदार): सध्याच्या काळात प्रत्येक जण रोज घराबाहेर पडून स्वत:च्या कुटुंबासाठी व स्वत:साठी जगतच आहे; पण त्याच्या या रोजच्या जगण्यात तो मानसिक स्वास्थ्य व मानसिक समाधान गमावून बसला आहे. आज आपण प्रगतीच्या मार्गावर आहोत; पण आपल्या आरोग्याच्या व मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने विचार केला, तर आपण निसर्गावर मात करून केलेली प्रगती आपल्यासाठीच अधोगती ठरत आहे. पर्यावरण व निसर्ग हा मानवी जीवन आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यामधील एक अदृश्य असा दुवा आहे; पण ही बाब आज काही लोकांच्या लक्षात येत नाही. प्रत्येक वेळी आपण शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. आपला निसर्ग, आपले आरोग्य, आपली शेती, आपले मानसिक स्वास्थ्य यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून आपल्याही खूप काही जबाबदार्या आहेत. पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन, निसगाश्री मैत्रीचे नाते आपण निर्माण केले पाहिजे. आपल्या परिसरात, शेतात, माळरानात प्रत्येक नागरिकाने एक तरी झाड लावून ते जगविण्याची जबाबदारी स्वयंप्रेरणेने स्वीकारली पाहिजे. आपण निसर्गाची वाट धरली, तरच आपल्या आयुष्याची वाट टिकेल. नाही तर, निसर्ग आपली वाट लावल्याशिवाय राहणार नाही. कोणत्याही आजारावर उपचार करीत बसण्यापेक्षा त्या आजाराचा प्रतिबंध केलेला कधीही चांगला. विचार करा, जागे व्हा, निसर्गावर प्रेम करा, अजूनही वेळ गेलेली नाही...!

 ग्रामीण भागाला ’स्टार्ट अप’ची खरी गरज
 जत,(बातमीदार): ग्रामीण भारत हीच देशाची खरी शक्ती आहे. नैसर्गिक साधन संपत्ती, स्वच्छ सुंदर हवा, तुलनेने अधिक निरोगी युवा पिढी, शेती, कला आणि संस्कृती हे बलशाली राष्ट्राच्या उभारणीतील महत्त्वाचे घटक आजही केवळ ग्रामीण भागात पाहायला मिळतात. परंतु, शिक्षण, पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, कौशल्य आणि बाजारपेठेअभावी हा लुप्त स्रोत वापराविनाच पडून असल्यासारखी परिस्थिती आहे.
      नवीन उत्पादनांच्या छोट्या उद्योगांना चालना देऊन रोजगार निर्माण करणे हे स्टार्ट अप इंडियाचे मुख्य उद्दिष्ट आहे. ते पूर्ण करण्यासाठी हवी तेवढी कल्पनाशक्ती, साधनसंपत्ती आणि स्रोत मावळात असूनही केवळ मार्गदर्शन लाभत नसल्याने, त्याकडे दुर्लक्ष करून आजची पिढी बेरोजगारीच्या खाईत लोटली जात आहे.
 ग्रामीण भागात  पारंपरिक असलेले भाजीपाला शेती, फुलशेती, पशुधन आणि पर्यटन हे उद्योगदेखील स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून चालना मिळून अधिक आधुनिक होऊन आर्थिक सुबत्ता व रोजगारनिर्मिती करू शकतील एवढी ऊर्जा ग्रामीण भाग  राखून आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पोषक हवामान जैविक तंत्रज्ञानदेखील विकासाचा मोठा स्रोत ठरू शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा अनुकूल परिस्थितीत नवनव्या कल्पना प्रत्यक्षात उतरवून, छोटे-मोठे उद्योग सुरू करताना संबंधिताला बाजारपेठेचे ज्ञान, ग्राहक, त्यांची मागणी जाणून घेणे गरजेचे ठरते. अशा प्रकारचे उद्योग एकमेकांना जोडल्यास त्यातून अनेक संधी निर्माण होतील. कृषी पर्यटन हाही एक उत्पन्न देणारा चांगला मार्ग ठरेल. ग्रामीण खाद्य, कला आणि संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने येऊ शकेल. थेट विक्रीसाठी बाजारपेठ खुली झाल्याने स्टार्ट अप इंडियाच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी आपसांत गट स्थापन करून,गटाच्या माध्यमातून वाहने खरेदी करून थेट ग्राहकांपयर्ंत माल विक्री करू शकतील. शेती आणि जैवतंत्रज्ञान यांच्या संशोधनासाठी छोट्या छोट्या प्रयोगशाळा स्थापन केल्यास तेथील संशोधनाचा वापर स्थानिक शेती विकासासाठी मार्गदर्शक ठरू शकतो. याद्वारे दलालीला आळा बसून तो वाटा देखील शेतकर्यांच्या पदरात पडेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी घोषणा केलेल्या आणि केवळ शहरी भागात गवगवा सुरू असलेल्या मेक इन इंडिया, त्याचप्रमाणे स्टार्ट अप इंडियासांरख्या योजना मार्गदर्शनाअभावी ग्रामीण भागात प्रभावी ठरत नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतीप्रधान भारतात स्वच्छ सुंदर पर्यावरण, कला आणि संस्कृती हा अनमोल ठेवा आजतागायत जपून ठेवलेल्या ग्रामीण इंडियालाच ’स्टार्ट अप’ची खरी गरज आहे.

 आरडी एजंट काम सोडणार?
 तुटपुंजे कमिशन : बचतीचे उत्पन्नही कमी होण्याची शक्यता
 जत,(बातमीदार): बँकेच्याही अगोदर ग्रामीण भागात सर्वसामान्यांना बचतीची सवय लावणार्या पोस्ट खात्याच्या आरडी एजंटांनी हे काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात बचतीची सेवा पुरवणारी ही यंत्रणा आता बंद होण्याची भीती व्यक्त होत आहे. आरडीव्दारे जमा होणारी रक्कम मुख्य पोस्ट कार्यालय किंवा उपडाक कार्यालयात भरण्याची सक्ती केल्याने या एजंटांनी हे काम सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
 भारतीय डाक खाते देशाच्या कानाकोपर्यात सेवा पुरवणारी शासनाचे एक महत्त्वाचे खाते आहे. पूर्वीच्या काळी या डाकसेवेने लोकांच्या घरोघरी सुख-दु:खाच्या बातम्या तसेच शासकीय पत्र पोहोचवण्याबरोबरच सामान्यांच्या आर्थिक गरजा भागवणारी मनिऑर्डरही पोहोचवली. परंतु इंटरनेट, मोबाईल, टी. व्ही., दळणवळण, वाहतूक सेवा अशा विविध आधुनिक सुविधांमुळे हे महत्त्वाचे खाते स्पर्धेत तग धरू शकले नाही. डाक सेवा बँकांइतकी सक्षम बनली नाही. त्यांनी विमा, काही वस्तू विकणे, ठेवी ठेवणे आदी बाबी चालू केल्या.
 बँकाही पोहोचल्या नव्हत्या, त्या काळात पोस्ट खात्याने आरडीव्दारे ग्रामीण भागात सामान्यांना बचतीची सवय लावली होती. ग्रामीण भागात तसेच शहरात आरडी गोळा करण्याचे काम आजही एजंट करत आहेत. आरडी गोळा करण्यासाठी महिला प्रधान एजंट तसेच पेरोल ग्रुप लीडर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
 दहा रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतची आरडी काढून लोकांना बचतीचा मार्ग दाखवला. प्रत्येक गावातील पोस्ट ऑॅफीसमार्फत अनेक महिला प्रधान एजंट तसेच पेरोल ग्रुप लीडर काम करू लागले. गोळा होणार्या रकमेवर त्यांना 2.5 ते 4 टक्के कमिशन मिळत असते. ग्रामीण भागाचा विचार करता 60 रुपयांपासून ते जास्तीत जास्त हजार रुपयांपर्यंत महिन्यातून एकदा कमिशन मिळते.
 आता उपडाक तसेच मुख्य डाक कार्यालयामध्ये कोअर बँकिंग सिस्टीम सुरु होणार आहे. यासाठी आरडी एजंटांनी उपडाकघर वा मुख्य डाक कार्यालयात आरडीचे पे रोल घेऊन जाण्याची सूचना प्रत्येक गावातील डाक कार्यालयाला देण्यात आली आहे.
 सर्व आरडी एजंटांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. डाक कार्यालयाच्या बचतीवर या नाराजीचा नक्कीच परिणाम होणार आहे. आरडीमधून मिळणारे तूटपुंजे कमिशन स्वीकारण्यासाठी उपडाकघर कार्यालय वा मुख्य डाक कार्यालयात जाण्यासाठी गाडीभाडे व संपूर्ण दिवस वाया जाणार आहे. यामुळे हे आरडी एजंट काम करण्यासाठी इच्छूक नाहीत. ज्यांनी ग्रामीण भागातील लोकांना आरडीच्या माध्यमातून बचतीची सवय लावली, तेच ग्रुप लीडर डाक कार्यालयाच्या या नव्या कारभारामुळे वैतागून काम सोडू लागले आहेत. प्रत्येक डाक कार्यालयात इंटरनेट सुविधा देऊन तेथील कर्मचार्यांना प्रशिक्षित करावे, अन्यथा अनेक वर्षे काम करणारे हे आरडी एजंट काम सोडून देतील, याकरिता शासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

 30 रुपयांना एक पेंडी
 जत,(बातमीदार): पाऊस पडल्यानंतर छावण्या बंद होतात. त्यावेळी चारा उपलब्ध होईपर्यंत 2 महिने शेतकर्‍यांना घरचा शिल्लक चारा वापरावा लागतो. त्यामुळे आताच जर चारा संपवला, तर पुढे काय करायचे? आज वैरण 3000 हजाराला 100 पेंडी म्हणजे 30 रुपयाला एक पेंडी असून तीही मिळत नाही. त्यामुळे चारा छावण्या लवकर सुरू व्हाव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.


 उगवलंच नाय तर
 चारा कुठून येणार?
 जत,(बातमीदार): तालुक्यात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडल्याने थोडा फार चारा उपलब्ध झाला आहे. मात्र, काही ठिकाणी पेरणीही झाली नाही, त्यामुळे तालुक्यात उपलब्ध आहे, असे असले तरी काही ठिकाणची पिके वाळून गेल्याने तेथे मात्र चार्‍याचा गंभीर प्रश्न आहे. त्यामुळे चारा छावणी मागणीचे काही गावांचे प्रस्तावही लवकरच सादर होणार आहेत.
 चार्याचा विचार केल्यास 68 दिवस चारा पुरेल असा शासकीय अहवाल आहे. परंतु तालुक्यात कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काही ठिकाणी बर्‍यापैकी चारा तर काही ठिकाणी 15 दिवसांचा चाराही शिल्लक नाही. त्यामुळे चारा छावण्या व्हाव्यात, अशी शेतकर्‍यांची इच्छा आहे.
 अनेक ठिकाणी लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, अशावेळी जनावरांना दोन किलोमीटरवरून पाणी आणणे शक्य नसल्याने छावण्या झाल्यास जनावरांची चारा व पाण्याची सोय होणार आहे.


 शहीद जवानाच्या बलिदानाने सोशल मीडियाही गहिवरला
 जत,(बातमीदार): सोशल मीडियावर आठवडाभरात सर्वाधिक पोस्ट झळकल्या त्या सियाचीनमध्ये हुतात्मा झालेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्या संदर्भात. जवान सुनील सूर्यवंशी सुखरूप असल्याची पोस्ट वाचता-वाचता हुतात्मा झाल्याचे समजताच अख्खा सोशल मीडिया गहिवरला अन् जनतेने या वीर जवानाला सॅल्यूट केला.
 सध्या सोशल मीडिया हा परवलीचा शब्द बनत आहे. युवा वर्गाच्या दृष्टीने त्याला मोठे महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. आज फेसबुक, व्हाट्सअँपसारखी माध्यम लोकप्रियतेच्या कळसावर पोहोचली आहेत. 14 फेब्रुवारीच्या ’व्हॅलेंटाईन डे’ च्या पोस्टही सोशल मीडियावर चांगल्याच गाजल्या. त्यातूनही ’प्रेम कर मित्रा प्रेम कर’ ही कविता प्रेमवीरांच्या डोळ्यांत चांगलीच अंजन घालणारी ठरली.
 माहितीची देवाण-घेवाण करण्यासाठी असध्याचा सोशल मीडिया प्रचंड जागृत झाला आहे. व्हाट्सअँप हे काहींना मनोरंजनाच माध्यम वाटते तर काहीजणांना माहितीची देवाण-घेवाण करून ज्ञान वाढवणारे माध्यम वाटते. सोशल मीडियावर तत्काळ माहिती मिळत असल्यामुळे सोशल मीडिया आता घराघरांमध्ये पोहोचला आहे. अगदी तरुणांपासून आबालवृद्धांपर्यंतचे ग्रुप व्हाट्सअँपवर पाहिले की सोशल मीडियाची व्याप्ती किती वाढली आहे, याची प्रचिती येते.
 अशा सोशल मीडियावर सर्वात दुर्दैवी पोस्ट ठरली ती सियाचीन येथे हुतात्मा झालेले जवान सुनील सूर्यवंशी यांच्या संदर्भातची. प्रथम हुतात्मा झालेली पोस्ट सर्वच ग्रुपवर दिसू लागली. नंतर जवान सुखरूप असल्याची पोस्ट सोशल मीडियावर समजली. त्यामुळे सोशल मीडियावर जवान सुनील सूर्यवंशी यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना सुरू झाल्या. मूळचे माण तालुक्यातील मस्करवाडी येथील हुतात्मा जवान सूर्यवंशी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होईपर्यंतच्या पोस्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचल्या.
 14 फेब्रुवारी हा ’व्हॅलेंटाईन डे’ म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी अनेकांनी आपले प्रेमसंदेश पोहोचविण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला. दिवसभर युवा वर्गांनी या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून पोस्ट शेअर केल्या; मात्र ’प्रेम कर मित्रा प्रेम कर’ या कवितेतील प्रेमाचे अवडंबर माजवणार्या प्रेमवीरांच्या डोळ्यात चांगलेच अंजन घातले.
 बारावी परीक्षेच्या अनुषंगाने जनजागृती करणारी एका पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. आपणास जर एखादा दहावी किंवा बारावीचा परीक्षार्थी प्रवासासाठी वाहनाची वाट पाहताना आढळला तर त्याला परीक्षा केंद्रापर्यंत सोडण्यास सहकार्य करावे, हा संदेश जास्तीत जास्त शेअर करावा, असे भावनिक आवाहन या पोस्टमध्ये करण्यात आले. तसेच महामार्गावर होत असलेल्या अपघातांच्या घडामोडीही या आठवड्यात सोशल मीडियावर झळकल्या.
 ’प्रेम कर मित्रा प्रेम कर’
 ’व्हॅलेंटाईन डे’ दिवशी प्रेमाचे अवडंबर माजवून हा दिवस साजरा करणार्या प्रेमवीरांसाठी दिवसभर वेगवेगळ्या ग्रुपवर ’प्रेम कर मित्रा प्रेम कर’ ही कविता सोशल मीडियावर फिरत होती. या कवितेतून प्रेम राखीवर कर, हरवलेल्या नात्यांवर कर, प्रेम कर; पण प्रेमाचे अवडंबर माजवू नकोस, असा संदेश कवितेद्वारे देऊन प्रेमवीरांच्या डोळ्यांत चांगलेच अंजन घातले.




No comments:

Post a Comment