Thursday, February 11, 2016


अंगणवाडी सेविकांवर कामांचे ओझे
 जत,(बातमीदार): चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रांमधून होते. परंतु या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक कामे लादले जात आहेत. तुटपुंज्या मानधनावर त्यांना ही सगळी कामे करावी लागत असल्यामुळे सेविकांमध्ये असंतोष वाढला आहे.
 शासनाच्या शैक्षणिक योजनेंतर्गत अंगणवाडीमध्ये लहान मुलांना बोलके करण्याकरिता अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. केंद्र व राज्य शासन मिळून अंगणवाडी सेविकेला पाच हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला 2 हजार 450 रुपये, अंगणवाडी मदतनिसांना 2 हजार 500 रुपये मानधन दरमहा दिले जात आहे. मात्र, शिकवण्याच्या कामाव्यतिरिक्त अंगणवाडी सेविकेला आरोग्य विभागाशी संबंधित सर्वेक्षणाची व अन्य कामे दिली जात आहेत.
 वेळोवेळी बाहेरगावी सभा, मेळाव्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सेविकेला मुलांना सांभाळणे व त्यांना आवश्यक असणार्या प्राथमिक शिक्षणाच्या कामात बाधा येत आहे.
 अंगणवाडीमुळे मुलांमधील कुपोषितपणा दूर करण्यास मोठी मदत होत आहे. मात्र, अंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामांव्यतिरिक्त दर महिन्याला इतर कामे करावी लागत असल्याने कुपोषणमुक्तीच्या उद्देशाला हरताळ फासला जात आहे. त्यांना मात्र पाच हजार रुपयेच मानधन देत आहे. हा एक प्रकारे शासनाचा दुजाभाव आहे.
 जि.प. कार्यालयात असणार्या परिचराला या टेबलवरची फाईल त्या टेबलवर नेण्यासाठी 15 हजार रुपये पगार मिळतो, तर अंगणवाडी सेविका ही लहान बालकांना घडविण्याचे व त्यांना बोलके करण्याचे काम करीत असूनही अल्प मानधनावरच आहे.
 गृहभेट रजिस्टर, लसीकरण रजिस्टर, माता समिती रजिस्टर, गरोदर माता रजिस्टर, स्तनदा माता रजिस्टर, वृद्धीपत्रक 1, 2, 3 साठा रजिस्टर, मालमत्ता नोंदवही, पूरक पोषण आहार, पूर्व प्राथमिक रजिस्टर आरोग्य तपासणी, वजन काटा रजिस्टर, कुटुंब पाहणी रजिस्टर, जन्म-मृत्यू नोंदणी, प्रत्येक महिन्याचा मासिक अहवाल, हजेरी पत्रक 2 अ, मासिक बिल, दवाखाना अहवाल, प्रत्येक महिन्यात संगणकाद्वारे अहवाल तयार करण्याच्या खर्चाचा अहवाल तयार करणे आदी कामे करावी लागतात. मात्र, या कामांच्या मोबदल्यात अल्प मानधन दिले जात आहे. अंगणवाडी सेविका कोणतीही आर्थिक तरतूद नसताना दर महिन्याला बैठकीला जाणे, अहवाल सादर करणे व 11 प्रकारचे रजिस्टर भरण्याचे काम करते. एवढे काम करूनही शासन अंगणवाडी सेविकेला पाच हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला 2 हजार 450 रुपये व मदतनिसांना 2 हजार 500 रुपये मानधन देऊन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करीत असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. मानधनाव्यतिरिक्त अंगणवाडी सेविकांसाठी कोणतीही आर्थिक तरतूद नाही.

 नुसता विद्यार्थ्यांचा कल बघून करणार काय..
  जत,(बातमीदार): सध्या शाळां-शाळांमध्ये दहावीची ऑनलाइन कल चाचणी घेण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. यासाठी शिक्षक व मुख्याध्यापक यांची चांगलीच धावपळ सुरू असलेली दिसून येत आहे, परंतु शासन विद्यार्थ्यांची कल चाचणी घेऊन करणार काय? हे शिक्षण विभागालाही न उलगडलेले कोडे आहे.
 या कल चाचणीच्या माध्यमातून शासनाला विद्यार्थ्याचा कल कला, संगीत क्षेत्रात आहे की, अभियांत्रिकी हे जाणून घेता येणार आहे. जर संबंधित विद्यार्थ्याचा कल अभियांत्रिकीमध्ये असेल तर त्या विद्यार्थ्याला या विभागात शासन प्रवेश मिळवून देणार का? हे ही निश्चित नाही. कारण कलानुसार शिक्षण द्यावयाचे असेल तर शासनाने सर्व विद्यार्थ्यांच्या मोफत शिक्षणाची हमी घेऊन प्रवेश मिळवून देण्याची जबाबदारी आहे, परंतु विद्यार्थ्याचा कल पाहून त्याला त्याच्या आवडीच्या क्षेत्रात प्रवेश मिळाला नाही तर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा पडल्याशिवाय राहणार नाही.
 . शाळांच्या सोयीनुसार 8 ते 25 फेब्रुवारीपर्यंत ही चाचणी घेण्यात येणार आहे. काही शाळांमध्ये ही चाचणी सुरूही झाली आहे, परंतु संगणकात वायरस शिरल्याने सिस्टिम हँग होण्याचेही प्रकार काही ठिकाणी घडल्याने शिक्षकांची डोकेदुखी वाढली आहे. दहावी बोर्डाच्या सीट नंबरवरच ही चाचणी घेण्यात येत आहे. काही शाळांमध्ये संगणक व वीज कनेक्शन नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. या अडचणी ग्रामीण भागात प्रकर्षाने जाणवत आहेत.










No comments:

Post a Comment