Saturday, December 3, 2016

तालुका स्तरावर होणार दारूबंदी समिती!


जत,(प्रतिनिधी)-
जिल्ह्यासह राज्यात मोठया प्रमाणात अवैध दारूची विक्री होते. यामध्ये देशी-विदेशी दारूसह गावठी दारूची सर्रास विक्री होते. राज्य उत्पादन शुल्क विभागासह पोलीस विभागही अवैध दारू अड्डयांवर धाडी घालून अड्डे उद्ध्वस्त करतात; परंतु काही दिवसांमध्येच पुन्हा अवैध दारूचे अड्डे उभे राहतात. त्यामुळे अवैध दारूचे निर्मूलन करण्यासाठी आता तालुका स्तरावर दारूबंदी समिती आणि गाव स्तरावर ग्राम रक्षक दल स्थापन करण्यात येणार आहे.

अवैध दारूचे सर्वाधिक अड्डे हे ग्रामीण भागातच असून त्याची अवैध दारू विक्री शहर व ग्रामीण भागात करण्यात येत असल्याचे चित्र पाहावयास मिळते. हातभट्टीच्या दारूचे अड्डेही ग्रामीण भागात दिसून येतात. हातभट्टीच्या दारूमध्ये विविध प्रकारच्या विषारी घटकाचे मिश्रण करून त्याची विक्री होत असल्याने जीवितहानी झाल्याच्या घटना सातत्याने घडतात. दारू विक्रीच्या व्यवसायामध्ये कमी श्रमात अधिक पैसा कमाविण्याची ओढ लागली असते. हातभट्टीसाठी मोठया प्रमाणात वृक्षतोड करतात. त्यामुळे अवैधरीत्या तयार होणार्या दारू निर्मितीला व विक्रीला आळा घालण्यासाठी प्रतिबंधात्मक योजना म्हणून तालुका स्तर आणि गाव स्तरावर दारूबंदी समित्या बनविण्यात येणार आहेत. या समितीच्या माध्यमातून तालुका व परिसरात अवैध दारूच्या विक्रीला आळा घालून पोलीस, राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती देण्यात येईल. गावामध्ये कुणी गावठी दारू प्राशन करणार नाही. यासाठी गाव दारूबंदी समिती प्रयत्न करेल. तालुका व गाव स्तरावर दारूबंदी समित्या नियुक्त करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने राज्यातल्या तालुक्यांच्या तहसीलदारांना आणि पोलीस अधीक्षकांना पत्र पाठविले आहे. दारूबंदी समितीमध्ये प्रतिष्ठित नागरिकांसह ग्रामपंचायतचे पदाधिकारी, पोलीस पाटील राहतील. तालुकास्तरीय समितीमध्ये ठाणेदारांसह नागरिकांचा समावेश असणार आहे.

No comments:

Post a Comment