Saturday, December 3, 2016

कोळगिरी तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्याची भाविकांची मागणी




जत/प्रतिनिधी
जत तालुक्यातील कोळगिरी येथील श्री काळभैरवनाथ हे ठिकाण प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असून याठिकाणी लाखो भाविक दर्शनाला येत असतात.इथे प्राचीन खुणा असून मंदिराचा परिसर निसर्गरम्य आहे.पर्यटनाच्यादृष्टीने या क्षेत्राचा विकास होण्याची गरज असून तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
जत तालुका दुष्काळी तालुका असून या परिसरात निसर्गरम्य, हिरवी गर्द झाडी असलेला परिसर क्वचितच ठिकाणी पाहायला मिळतो, मात्र कोळगिरी येथील काळभैरवनाथ तीर्थक्षेत्र परिसर हिरवाईने नटला आहे. हा परिसर दरीत वसला असून चोहो बाजूंनी डोंगर आहेत. पावसाळ्यात तर याठिकाणी दोन-तीन ठिकाणी धबधबे वाहताना आढळून येतात. बाजूलाच तलाव असून याठिकाणी वर्षभर पाणी असते. पिण्यासाठीही इथे मुबलक पाणी उपलब्ध आहे. या क्षेत्राला सध्या ‘क’ दर्जा प्राप्त आहे, मात्र हे ठिकाण पर्यटन क्षेत्र म्हणूनही विकास पावण्याची गरज असून त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे.
काळभैरवनाथ देवस्थान हे प्राचीन तीर्थक्षेत्र आहे. याठिकाणी बर्‍याच प्राचीन खाणाखुणा, वीरगळ, शिलालेख उपलब्ध आहेत. इथे मोठ्या प्रमाणात वीरगळ आढळून येतात. मध्ययुगीन काळात छोटीमोठी युद्धे, आक्रमणे झाली. त्यात ज्ञात-अज्ञात शूर योद्धे, सरदार, सैनिक हे देश आणि धर्मासाठी धारातीर्थी पडले. त्याच वेळी तत्कालीन स्त्रिया, त्या काळच्या रुढीप्रमाणे पतिप्रेम व अब्रुरक्षण यांसाठी त्यांचा देह अग्नीच्या स्वाधीन करून सती गेल्या. त्या सती गेलेल्या स्त्रियांची चित्रे, त्यांच्या शौर्यगाथा दगडी शिलांवर कोरल्या गेल्या. त्यांनी लोककल्याणार्थ केलेले कार्य समाजाच्या नजरेसमोर कायमस्वरूपी राहवे यासाठी ती शिल्पे उभारली गेली. याचा अधिक अभ्यास होण्यासठी गरज आहे. मंदिराच्या गाभार्‍यात आकर्षक शिवलिंग आहे. मंदिराचे खांब विविध नक्षींनी कोरलेले आहेत. या देवस्थानला लांबून भक्त येत असतात. असे असले तरी शासकीय, राजकीय पातळीवर या तीर्थक्षेत्राची म्हणावी अशी दखल घेण्यात आली नाही. हे ठिकाण उपेक्षित राहिल्याने प्राचीन काळातील असूनही याचा विकास झालेला नाही. या ठिकाणाचा विकास होण्याच्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज असून तीर्थक्षेत्राला ब दर्जा देण्यात यावा, अशी मागणी भाविकांमधून होत आहे.
श्रीक्षेत्र काळभैरवनाथ देवस्थान कमिटीने या परिसरात मोठा बगिचा फुलवला असून ऑक्टोबर महिन्यात या बगिच्याचे सिद्धेश्‍वर महाराज (विजापूर) यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. या परिसरात पूर्व बाजूला सिमेंट बंधारा झाला असून तसाच रस्त्याच्या दुसर्‍या बाजूला म्हणजे पश्‍चिमेस आणखी एक बंधारा बांधण्यात यावा, तसेच ओढा पात्राचे विस्तारीकरण करण्यात यावे आणि परिसरात आणखी झाडे लावण्यात यावीत, अशी मागणी भाविकांमधून होत आहे. 12 लाख खर्चून पाझर तलाव दुरुस्त करण्यात आला आहे, मात्र तरीही गळती होत असून त्यामुळे पाणी साठपा म्हणावासा होत नाही. याठिकाणी बोटींग व्यवस्था करण्यासारखी परिस्थिती असून याचा लाभ तीर्थक्षेत्राला होणार असून पर्यटनास वाव मिळणार आहे.
देवस्थान कमिटीतील विश्‍वस्त व प्राथमिक शिक्षक सिद्धगोंडा पाटील म्हणाले की, हा परिसर अत्यंत निसर्गरम्य आहे. चोहोबाजूंनी डोंगर, झाडी आहे. शांत असा हा परिसर असून अध्यात्म्याच्यादृष्टीने आणखी यात भर घालण्याची आवश्यकता आहे.इथे शाळांच्या सहली येत आहेत. विवाह सोहळे होत आहेत. याठिकाणी वर्षभर मोफत महाप्रसाद सुरू आहे. याठिकाणी अडीच एकरात लॉन करण्याचा मानस आहे. तलावात बोटींग करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. यासाठी निधीची कमतरता भासत असून शासनाने या तीर्थक्षेत्रास ‘ब’ दर्जा द्यावा, याचा लाभ भाविकांना आणि पर्यटकांना होणार आहे.

4 comments:

  1. भैरवनाथ मदिराच कोळगिरी यथे लग्नं.होतात भाडेच सगळ सोय आहे भडजी आचार्य हि मिळेल मडंप डिजे बी सोस आहे पानी सोस आहे

    ReplyDelete
    Replies
    1. भैरवनाथाची पुजारी श्री शिवाजी सिदांपा पुजारी गाव कोळगिरी आजोबा पजोबा पासुन आम्ही करत आहे

      Delete
  2. भैरवनाथ मंदिर एक निसर्गरम्य ठिकाण म्हणून ओळखले जाते तर तालुक्यात.

    ReplyDelete