जत,(प्रतिनिधी)-
राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाकडून राज्यभरातील शासकीय कर्मचार्यांचा माहितीकोश तयार करण्याचे काम सुरू आहे.त्यामुळे विविध खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. यासाठी कर्मचार्यांची संपूर्ण माहिती ऑनलाईन मागवण्यात आली आहे.
सध्या या माहितीच्याबाबतीत शिक्षण खाते आघाडीवर असले तरी आता शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची माहिती एकत्रितरित्या उपलब्ध आहे. शिक्षण विभागाची माहिती सरल प्रणालीसाठी भरण्यात आली आहे. मात्र आता आणखी ही माहिती सर्वंकष माहितीकोशासाठीही भरावी लागणार आहे.राज्य शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालय कार्यालयाकडून शासनाच्या सेवेत असणारे सर्व कर्मचारी तसेच सर्व जिल्हा परिषदेकडील कर्मचारांचा सर्वंकष माहितीकोश तयार केल्यानंतर तो दरवर्षी अद्ययावत केला जाणार आहे. यामध्ये नियमित आस्थापनेवरील कर्मचारी,रोजंदारी, अंशकालीन व मानसेवी तसेच तदर्थ तत्त्वावर नेमणुका करण्यात आलेल्या सर्व प्रकारच्या कर्मचार्यांच्या माहितीचा समावेश असणार आहे. हा सर्वंकष माहितीकोष (एम्प्लॉइज मास्टर्स डाटाबेस) अद्ययावत करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने 1 ऑक्टोबर 2016 या तारखेचा आधार मानून कर्मचार्यांचा सेवार्थ आयडी, भविष्यनिर्वाह निधी,डीसीपीएस खाते क्रमांक,पॅनकार्ड क्रमांक,कर्मचार्यांचे नाव, जन्मदिनांक,सेवेत रुजू झाल्याची तारीख तसेच सेवानिवृत्तीची तारीख व इतर सर्व माहिती संकलित करण्यात आली आहे. शिवाय ती ऑनलाइन भरण्यात स्थानिक स्तरावरून भरण्यातही आली आहे. शिवाय आश्वासित प्रगती योजना (पहिली 12 वर्षांनंतर व दुसरी 24 वर्षांनंतर), विभागीय परीक्षा इत्यादी माहितीही गोळा केली जात आहे.
आता ही माहिती सादर झाल्यानंतर संबंधित खात्याच्या अधिकार्याने 16 डिसेंबर 2016 ते 31 जानेवारी 2017 पर्यंत पहिले प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे.मे2017 पर्यंत संबंधित अधिकार्याने माहिती बरोबर असल्याचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे. एम्पॉइज मास्टर्स डाटाबेस सेवार्थ प्रणालीमध्ये त्याच्या कार्यालयाने भरलेली माहिती, आधारभूत माहिती म्हणून मानली जाणार आहे. यात बदली हो ऊन आलेले व नवीन नेमणूक झालेले कर्मचारी यांचीही माहिती घेतली जाणार आहे. या माहितीशिवाय जानेवारी 2017 ची देयके कोषागार कार्यालयात स्वीकारली जाणार नाहीत, असेही सांगण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment