Thursday, December 15, 2016

सावधान... सांगाल तर फसाल!


लॉटरीनंतर आता‘ एटीएम ब्लॉक ’चा फंडा; मोबाईलवरून विचारणा केल्यास क्रमांक सांगू नका
जत,(प्रतिनिधी)-
‘तुम्हाला एक लाख पौंडाची लॉटरी लागली आहे’, या फसवणुकीच्या प्रकारानंतर आता गावागावांतही  'हॅलो,तुम्हारा एटीएम ब्लॉक होनेवाला है’ असे फोन येऊ लागले आहेत... तेव्हा सावधान! तुमच्या बँक खात्यावरील पैसे लाटण्याचा हा परप्रांतीय लुटारूंचा धंदा असू शकतो.
जत तालुक्यातील अगदी खेडेगावातल्या लोकांना असे फोन येऊ लागले आहेत.गेल्या आठ दिवसांत असे अनेक फोन आले आहेत. फोन करणारे हिंदी भाषिक व्यक्ती आहेत. तालुक्यातील दरिकोणूर येथील प्राथमिक शिक्षक बाबासाहेब पांढरे यांना तसेच उटगी येथील उर्दू शाळेत कार्यरत असणारे शिक्षक पटेल यांनाही अशा प्रकारचे फोन आले आहेत.त्यांना मोबाईलवर बोलणारी व्यक्ती ‘ भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मेन ब्रँचमधून  बोलत असून तुमचे एटीएम कार्ड ब्लॉक झाले आहे. ते पुन्हा सुरू करायचे असेल तर तुमच्या क्रेडिट/ डेबिट कार्डवरील क्रमांक सांगा’ असा आग्रह करीत होते. पांढरे यांनी आपल्याला यातले काही कळत नाही.तुम्हाला नंतर सांगतो, असे सांगून फोन केला. नंतर त्यांनी एटीएममध्ये जाऊन पैसे काढले. पैसे निघाले. त्यामुळे त्यांना कुणीतरी आपल्याला फसवत आहे, असा संशय आला. त्यामुळे त्यांनी नंतर त्याचा फोन स्वीकारला नाही.
उटगी येथील पटेल यांनाही असाच अनुभव आला. मात्र पलिकडून फोनवरून बोलणारी व्यक्ती बिहारी असल्याचा संशय आला. त्याची त्यांनी फिरकी घेतली.पलिकडच्या व्यक्तीला ते लक्षात आल्यावर त्याने पटेल यांना जोराची शिवी हासडली. शिक्षकांनी त्याला शिवीगाळ केली. व फोन बंद कर नाहीत तर पोलिसांत तक्रार देतो असे सांगत त्याचे बोलणे रेकॉर्ड केल्याचेही सांगितले. मात्र त्या पलिकडील निगरगठ्ठ माणसाने खुशाल तक्रार जा, असे सांगतानाच जो तो मला असेच म्हणतो, मात्र तक्रार कोणी करत नाही, असाही निर्ल्लजपणे म्हणाला.
बँक खातेदाराला एटीएमचा क्रमांक मागून परप्रांतीय भामटे त्यांच्या खात्यातून परस्पर पैसे काढल्याच्या घटना घडल्या आहेत. आतापर्यंत शहरी भागात एटीएमच्या नावाने फसवणूक करणार्‍या भामट्यांनी शहरातील लोक जागृत झाल्याने आपला मोर्चा आता ग्रामीण भागाकडे वळवला आहे. हे भामटे मोबाईलवरून संभाषण करून कार्डवरील कार्डवरील क्रमांक घेऊन सॉफ्टवेअरच्या सहाय्याने बनावट एटीएम कार्ड तयार करून त्याद्वारे एटीएममधून खात्यावरील पैसे परस्पर काढत असल्याच्या घटना शहरी भागात घडल्या आहेत. आता ग्रामीण भागातही हे प्रकार घडू लागले आहेत.त्यामुळे अशा प्रकारच्या फसव्या कॉलपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. कोणतीही राष्ट्रीयीकृत किंवा सहकारी बँक अशा प्रकारच्या एटीएम कार्डाबाबत माहिती घेणारी वेगळी यंत्रणा नेमत नाही. त्या खातेदारांचे पासवर्ड तीच बँक देत असल्याने तो डाटा पूर्वीच बँकेत असतो, त्यामुळे बँकेच्या नावाखाली चोरटे फसवणूक करीत असल्याने अशांना कोणतेही क्रमांक सांगू नयेत, असे आवाहन बँकांनी केले आहे. शिवाय बँका आपल्या खातेदारांना अशा प्रकारचा मेसेज वारंवार करत असते. खातेदारांनी मेसेज वाचावेत, असेही सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment