(उटगी येथील जि.प.कन्नड शाळेसमोर मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली असून या ठिकाणी लोक शौचास बसत आहेत. त्यामुळे डुक्करांचा प्रादूर्भावही वाढला आहे.) छाया - मच्छिंद्र ऐनापुरे,जत
जत,(प्रतिनिधी)-
जत तालुक्यातील उटगी गावातल्या जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेसमोर भयानक स्वरूपात वाढलेल्या घाण बाभळीची झुडपे हटविण्याची मागणी शिक्षक आणि पालकांकडून होत आहे. या झुडपात नागरिक शौचास बसत असल्याने परिसरात दुर्गंधी सुटली असून डुकरांचा हौदोस वाढला आहे.त्याचा त्रास विद्यार्थ्यांना होत आहे.
जिल्हा परिषद कन्नड शाळेच्या समोर मोठ्या प्रमाणात ही झुडपे वाढली आहेत.ही झुडपे काढली नसल्याने ती मोठ्या वृक्षासारखी वाढली आहेत.गावातले लोक या झुडपाचा शौचासाठी वापर करीत असून गावातील जवळपास पन्नास टक्के लोक या जागेचा शौचासाठी म्हणून उपयोग करत आहेत. हागणदारीमुक्त होण्यासाठी गाव प्रयत्न करत असताना प्रथम दर्शनी दिसणारी ही झुडपे गावाची कळा दाखवत आहेत. ही झुडपे स्वच्छता अभियानास अडथळा ठरत आहेत. गाव हागणदारीमुक्त होण्याला अजून तीस टक्के लोकांनी शौचालये बांधलेली नाहीत. शिवाय गावाबाहेर आणि शाळेला जाणारे रस्ते शौचाने भरलेली आहेत.विद्यार्थ्यांना नाक दाबून शाळेत जावे लागत आहे.
शाळा परिसरात लोक शौचास बसत असल्याने डुकरांची संख्याही वाढली आहे.याचा त्रास दुपारच्या विद्यार्थ्यांच्या जेवणावेळी होत आहे.सगळी डुकरे शाळेच्या आवारात गोळा होत असतात.ही डुकरे मुलांना जेऊ देत नाहीत. ग्रामपंचायतीला याबाबत तक्रार देऊनही याकडे लक्ष दिले जात नसल्याने पालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. ग्रामपंचायतीने शाळा परिसरातील झुडपे तोडावीत आणि विद्यार्थ्यांना दुर्गंधीपासून मुक्त करावे,अशी मागणी पालक आणि शिक्षकांमधून होत आहे.
No comments:
Post a Comment