Thursday, December 15, 2016

ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट

ढगाळ वातावरणामुळे चिंतेचे सावट
जत,(प्रतिनिधी)-
मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान आणि अवकाळी पावसामुळे फळबागा उत्पादक शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रोगट हवामानामुळे द्राक्षबागांना सर्वाधिक फटका बसणार असल्याने द्राक्ष पट्ट्यामध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मागील दोन ते तीन वर्षांपासून अवकाळी पाऊस, गारपीट आदी नैसर्गिक अपत्तींमुळे शेतकरीवर्गाचे कंबरडे मोडले आहे. शेतमालाच्या बाजारभावाचीही नेहमी ओरड असते. त्यात नोटबंदीमुळे तेजीत असणाऱ्या भाजीपाला, फळांचे दरही मोठ्याप्रमाणात घसरले आहेत. शेतकऱ्यांची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’अशी अवस्था झाली आहे. त्यात आता खराब हवामानाचे संकट ओढवल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे.
खराब हवामानामुळे फळपिके, भाजीपाल्यावर रोग पडत आहेत. त्यामुळे उत्पादन खर्चामध्ये वाढ होत आहे. तसेच, वाढलेल्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्नाची हमी मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. शेती बेभरवशी धंदा असल्याची प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून उमटत आहे.
सध्या द्राक्ष मण्यांमध्ये पाणी उतरण्याचा काळ सुरू आहे, तर काही ठिकाणी द्राक्षबागांचे तोडे सुरू आहेत. पाणी उतरण्याच्या काळात पाऊस व हवामान ढगाळ झाल्यास द्राक्षमणी फुटण्याचा धोका असतो. अशीच स्थिती पुढील दोन दिवस राहिल्यास द्राक्ष बागांचे मोठ्याप्रमाणात नुकसान होऊ शकते. मंगळवार  रात्रीपासून  तालुक्यात ढगाळ वातावरण तयार झाले आहे, तर बुधवारी सकाळपासून परिसरात काही भागात हलका पाऊसदेखील झाला. आजही दिवसभर ढगाळ वातावरण राहिले आहे. असेच आणखी दिवस राहिले तर खराब हवामानामुळे द्राक्षबागांवर डाऊनी, भुरी, रसशोषक कीड आदींचा मोठ्याप्रमाणात प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. तसेच, भाजीपाला पिकांवरदेखील रसशोषक किडींचा हल्ला होण्याचा धोका आहे.

No comments:

Post a Comment