आम्ही चार मैत्रिणी बरीच चेष्टा-मस्करी करत असू. इंजिनिअरिंग कॉलेजचे हे शेवटचे वर्ष होते. आमची एकमेकांपासून दूर होण्याची वेळ हळूहळू जवळ येत होती. त्यामुळे आम्ही सर्वजणी या वेळी एकच प्रयत्न करत होतो की, मस्तीचा कोणताही क्षण दवडू द्यायचा नाही.
"ऐक संगीता, मी आज तुझ्याबरोबर येऊ शकणार नाही. माझी समीरबरोबर आईस्क्रीम पार्टी आहे," जुही हसत हसत म्हणाली.
"तू आम्हाला असं अनाथासारखं सोडून जाणार का?" सोनल मोठ्याने ओरडली!
"ठीक आहे, आपण सगळेच आईस्क्रीम खायला जाऊ." जुही काहीशी नाराजीनं म्हणाली.
"सोनल! लग्न झाल्यावर तूही हिच्या सासरी राहायला जा!" मस्करी करत मी सोनलला म्हणाले.
संध्याकाळी आम्ही तिघी मैत्रिणी समीरच्या आईस्क्रीम पार्टीत हजर होतो.
समीर हा महाविद्यालयाचा सर्वात हुशार मुलगा होता, अभ्यासात हुशार,हँडसम, श्रीमंत बापाचा मुलगा, खूपच मजेशीर ... म्हणजे मुलींना आकर्षित करण्यासाठी त्याच्याकडे प्रत्येक प्रकारचे तीर होते. त्याच्याकडे मैत्रिणींची लांबच्या लांब यादी होती.
मी एकदा जूहीला इशारा देखील दिला! तू त्याच्यात अडकू नको. पण जुहीला ना माझं ऐकायचं होतं, ना तिने ऐकलं. उलट, मला टोमणे मारत ती म्हणाली, "तू माझ्यावर जळत तर नाहीस ना? तू एक निव्वळ पुस्तकी किडा आहेस, तू तुझं ज्ञान पुस्तकांमध्येच पाजळत बस."
मी गप्प बसले.
तसे, आम्ही त्या दिवशी आईस्क्रीम पार्टीत खूप मजा केली. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम खाल्ले. खूप धमाल केली.
जूहीने एक सुंदर अनारकली सूट घातला होता, त्यात ती खूप सुंदर दिसत होती. सोनलने वेस्टन पोशाखात खूपच मस्त दिसत होती.
सोनल, जूही सर्व वेगवेगळ्या पोझसह सेल्फी काढण्यात व्यस्त होत्या. मी काही अंतरावर उभी होते आणि त्यांना न्याहाळत मस्तपैकी आईस्क्रीम चाटत होते.
"संगीता! अगं जरा इकडे ये! सेल्फी घे!" जुही म्हणाली. मी हसत हसतच त्यांच्यात जाऊन मिसळले.
परीक्षा संपताच जुहीने एक चांगली बातमी आम्हाला ऐकवली, "संगीता! मी समीरशी लग्न करतेय."
"खरोखर? अभिनंदन!" पण मला आश्चर्य वाटले नाही कारण ते किती जवळ आले होते हे मला माहित होते.
सहा महिन्यांनंतर लग्न होते. आम्ही सर्व खरेदी एकत्रित केल्या. लग्नाच्या प्रत्येक विधीमध्ये आम्ही भाग घेतला. लग्नाच्या दिवशी आम्ही सर्वांनी त्याच डिझाइनची मेहंदीही लावली. संध्याकाळी सर्वजण मिरवणुकीत नाचलो. लग्न मोठ्या उत्साहात पार पडले.. सकाळी निरोप घेण्याची तयारी सुरू झाली. पण जुहीच्या खोलीचा दरवाजा बंद होता! दरवाजा ठोठावला, पण आतून कसलाच आवाज आला नाही. माणसं गोळा झाली. शंकेची पाल चुकचुकली. दरवाजा तोडला गेला. ... बेडवर जुही निपचित पडली होती.. मीही धावत धावत खोलीत गेले. जुही नवरीच्या वेषात राजकुमारीसारखी पलंगावर पडून होती, गळ्याजवळ काहीसे रक्त लागले होते. कुणी तरी जुहीचा "खून" केला होता. माझी विचारशक्ती सुन्न झाली.
पोलिस आले, मृतदेह पोस्टमार्टमसाठी नेण्यात आला. पोलिस सर्वांची चौकशी करून निघून गेले. संध्याकाळी स्मशानभूमीत जुहीला "निरोप" देण्यात आला.
आम्हा सर्वांची रडून रडून अवस्था खूप वाईट झाली होती. जुहीची आई आणि सोनल तर पुन्हा पुन्हा बेहोश होत होत्या. प्रत्येकजण समीरला दोष देत होते. मीही समीरला वाईट बोलले. नेमके काय झालं आहे माहीत नाही, पण समीरचा एक शर्ट रक्ताने माखलेल्या अवस्थेत जुहीच्या खोलीत सापडला होता.
पोलिसांनी समीरला चौदा दिवस न्यायालयीन कोठडीत ठेवले होते. गळ्याजवळ लाल डागदेखील आढळले. पण सखोल चौकशी करूनही काहीच निष्पन्न झालं नाही.
एक महिना उलटला. मला एका कंपनीकडून नोकरीची ऑफर आली होती.सोनल मला भेटायला आली होती. बोलत बोलत ती मला तिच्या मोबाईलमधील लग्नाचे फोटो दाखवू लागली. . बर्याच बाबतीत तिने माझ्या मोबाईलवरून मला लग्नाचे अनेक फोटो दाखवायला सुरवात केली. अचानक मला तो फोटो दिसला, ज्यामध्ये सोनल रात्री पुन्हा मेहंदी लावत होती.
अचानक त्या रात्रीची एक घटना माझ्या डोळ्यांसमोरून फिरू लागली. लग्नानंतर जेव्हा मी झोपायला जात होते, तेव्हा मला वाटले की मी जरा बाथरूममध्ये जाऊन फ्रेश व्हावे, मग मी बाथरूमकडे वळले,तेवढ्यात सोनल हात धुवून बाहेर येताना मला धडकली. मला पाहून जरा हडबडली . मग म्हणाली, "बघ ना! माझी मेहंदी नाचल्याने खराब झाली. असं म्हणत दोन्ही हात माझ्यासमोर पसरले.असे वाटत होते की दोन्ही हात एकमेकांवर रगडले आहेत. मी काही बोलणार तोच ती निघूनही गेली.
पोलिसांनी सांगितले होते की, जूहीच्या मानेवर डाग होता. पण माझया लक्षात आले की,तो डाग फक्त "मेहंदी" चा होता!
पुढे सोनलने पोलिस ठाण्यात आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. तिला समीरशी लग्न करायचं होतं. त्याने समीरच्या शर्टने जूहीच्या नाकातून वाहणारे रक्त पुसले होते. मेहंदीने आपला रंग दाखविला होता.
समीर सुटला. मी त्याची माफी मागितली.
No comments:
Post a Comment