Wednesday, April 22, 2020

चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी

जत,(जत न्यूज वृत्तसेवा)-
तयार कंपन्यांच्या चप्पल बाजार मोठ्या प्रमाणात फोफावला असताना  चर्मकार समाज आपला पारंपारिक व्यवसाय कसा बसा टिकवून ठेवत व्यवसाय करीत आहेत. मात्र आता लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे चर्मकार समाजाला आर्थिक मदत देण्याची मागणी हराळे समाजाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे यांनी केली आहे.
महाराष्ट्र राज्यात चर्मकार समाजातील असंख्य मजूर, कामगार, कारागीर,बूट पॉलिश करणारी, गटई कामगार हात मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत. परंतु आजघडीला कोरोनाने संपूर्ण विश्वाला विळखा घातला आहे व त्याचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी शासनाच्या वतीने लॉक डाऊन घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ज्यांचे हातावरचे काम आहे असे गोरगरीब चप्पल-बूट बनविणारे कारागीर, रेल्वे,बसस्थानक,बाजारपेठमध्ये फिरून बूट पॉलिश करणारी मंडळी, बुट आणि बुटाचे सोल विकणारे कामगार तसेच रस्त्याच्या कडेला ऊन,वारा,छत्री धरून चप्पल व बूट दुरूस्तीचे काम करणारे सर्वच गटई कामगार यांची लॉकडाउन मध्ये मोठ्या प्रमाणात पावसात नुकसान होत आहे, उदरनिर्वाह करण्याचे साधन ठप्प झाले आहे. तसेच जवळ असलेला थोडाफार पैसा ही आजमितीला संपलेला आहे. परंतु २० एप्रिल नंतर लॉक डाऊनच्या  नियमात काही प्रमाणात  शिथिलता दिली असली तरी  पुन्हा मजुरीसाठी भांडवल नसल्यामुळे समाज बांधवमोठ्या संकटात सापडलेला आहे.. म्हणून या अत्यंत कष्टाळू व प्रामाणिक समाजाला पुनः आपला परंपरागत व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच लॉकडाऊन काळात झालेल्या आर्थिक नुकसानातून सावरण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व कामगारांना किमान १५ हजार आर्थिक मदत कुटुंब प्रमुखाच्या खात्यावर जमा करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जत तालुका चर्मकार संघटनेचे नेते व हराळे समाजाचे माजी अध्यक्ष किरण शिंदे यांच्यावतीने करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment