Friday, April 10, 2020

मृत्यूंपैकी ८0 टक्के मधुमेह व उच्च रक्तदाबाचे पेशंट

सांगली,(प्रतिनिधी)-
आपल्यासाठी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी बनली असून कोरोनाच्या महामारीचा मोठा फटका मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना बसलेला दिसतो. प्रामुख्याने मुंबई-पुण्यात कोरोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूंमध्ये जवळपास ८0 मधुमेह व उच्च रक्तदाबाचे रुग्ण असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

मुंबई व पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रोज जवळपास शंभराहून अधिक रुग्ण राज्यात आढळून येत असून यात मुंबई व पुण्याच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. मुंबई व पुण्यात मरण पावलेल्या एकूण रुग्णांपैकी ८0 टक्के रुग्णांना मधुमेह व उच्च रक्तदाब असल्याचे राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. देशातही कोरोना मृत्यूंपैकी बहुतेकांना मधुमेह व रक्तदाबाचा त्रास असल्याचे त्यांचे निरीक्षण आहे.
महाराष्ट्रात कालपर्यंत ९७ जणांच्या मृत्यूची नोंद झाले, त्यात मुंबईतील मृतांची संख्या ५४ एवढी आहे. प्रश्न केवळ मरण पावलेल्यांचाच नाही तर जे कोरोना रुग्ण गंभीर आहेत त्यातही मधुमेहाच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. कोरोना आला म्हणून नव्हे तर एरवीही मधुमेहाच्या रुग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह व रक्तदाब असलेल्या रुग्णांनी संतुलित आहार व योग्य व्यायाम करून आपला आजार नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. अन्यथा त्याच्यातील प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच त्यांना मज्जासंस्थांचे आजार, ह्रदय विकार, डोळ्याचे तसेच मूत्रपिंड विकारापासून अनेक गंभीर आजार होऊ शकतात.
हे सर्व आजार कमालीचे त्रासदायक असून खर्चिकही आहेत. प्रामुख्याने मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये राहाणार्‍या लोकांची लाइफस्टाइल म्हणजे जीवनशैली मनमानी पद्धतीची असते. वेळी अवेळी झोपणे व जेवणे, खाण्यात तेलकट पदार्थांचे प्रमाण जास्त असणे तसेच पिज्झा-बर्गर आदी जंक फूड मोठ्या प्रमाणात खाणे यातून मधुमेह होतो. तसेच उच्च रक्तदाबही याच प्रकारच्या जीवनशैलीतून होते. देशात आज जवळपास आठ कोटी लोकांना मधुमेह असून उच्च रक्तदाबाचे रुग्णही पाच कोटीच्या घरात आहेत. मुंबई व पुण्यात कोरोना मुळे जे मृत्यू झाले आहेत त्यात मधुमेह व उच्च रक्तदाबाच्या रुग्णाचे प्रमाण जास्त आहे. कारण अशा रुग्णांमध्ये प्रतिकारशक्तीच कमी असते.
प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे हे रुग्ण कोरोनाच्या विषाणूचा सामना करण्यात कमी पडतात. परिणामी अशांचा मृत्यू होतो, असे डॉ. लहाने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment